Next
ऐ दिल मुझे बता दे...
BOI
Sunday, November 26, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने १५०हून अधिक चित्रपट गाजवणाऱ्या जुन्या काळातील अभिनेत्री श्यामा यांचे १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा आणि त्यांनी अभिनय केलेल्या ‘ऐ दिल मुझे बता दे...’ या सुंदर गाण्याचा रसास्वाद घेणारा लेख पाहू या आजच्या ‘सुनहरे गीत’ सदरामध्ये...
...............
अभिनेत्री श्यामाचे १४ नोव्हेंबरला निधन झाले! ८२ वर्षांची श्यामा चित्रपटसृष्टीपासून केव्हाच दूर गेली होती; पण आता ती या जगापासूनही दूर गेली! वृत्तपत्रांनी एक त्रोटक बातमी छापली! तिच्या मृत्यूनंतर तिच्यावर मृत्युलेख लिहिण्यासाठी तिचे कर्तृत्व माहिती असायला हवे ना? तसे पाहायला गेले तर चित्रपटसृष्टीतील कोणत्याही नायिकेचे अस्तित्व दहा नाही तर पंधरा वर्षांचेच असते. नंतर ती सहनायिका, चरित्र नायिका बनते! सगळ्या जणी तशा बनतात असेही नाही! बघा, वैजंतीमाला, सायरा बानू गेल्या वीस वर्षांत किती वेळा पडद्यावर दिसल्या? आणि अशा परिस्थितीत एखादी नायिका जेव्हा तिच्या पडद्यावरच्या निवृत्तीनंतर २५-३० वर्षांनी या जगाचा निरोप घेते, तेव्हा फास्ट काळातील रिपोर्टर ‘गेली एक नटी’ एवढेच म्हणू शकतात.
...पण अशा व्यक्तिमत्त्वांना चित्रपटप्रेमी विसरू शकत नाहीत. भारतीय चित्रपटाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. इथे असंख्य कलावंत येतात, अभिनयच नव्हे, तर संगीत, गायन, छायाचित्रण, दिग्दर्शन या आपल्या कलांचे ठसे मागे ठेवून महायात्रेला निघून जातात. ही वारशाची परंपरा पुढे नेण्यात त्या त्या कलावंतांचे योगदान असते. आणि श्यामा ही अभिनेत्रीही असेच योगदान देणारी होती. 
सैराटच्या नायिकेबद्दल सध्या चर्चा होते ना, त्याप्रमाणेच श्यामाचेही एक वैशिष्ट्य आहे, जे सध्याच्या पिढीला भावू शकेल. तिचा नवीन चित्रपट, तिला असलेली मागणी याचपुरता विचार करायचा झाल्यास ‘बेबी खुर्शीद’ या नावाने चित्रपटात बालकलाकार म्हणून वावरणाऱ्या श्यामाने आपल्या ऐन तारुण्यात, नव्हे तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना एवढी लोकप्रियता मिळवली होती, की वयाच्या अठराव्या वर्षी तिच्या हातात पंधरा चित्रपटांचे करार होते. ते चित्रपटही नामांकित चित्रसंस्थांचे होते व त्यामधील तिचे नायक टॉपचे हिरो होते.

श्यामाने अभिनयाचे शिक्षण कोणत्याही संस्थेत घेतले नव्हते; पण मोतीलाल, सुरैया, नूरजहाँ यांच्यासारख्या बुजुर्ग कलावंतांचे अवलोकन करीत, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तिने स्वतःला परिपूर्ण अभिनेत्री बनवले होते. संवाद पाठ करणे, नृत्याचा सराव करणे या बाबतीत आळस न करता ‘कडी मेहनत’ हे तिचे ब्रीद ठरले होते. आणि हाच प्रकार भूमिका निवडण्याच्या बाबतीत ती करायची. ‘मीच प्रमुख नायिका! मला दुय्यम भूमिका नकोत!’ ही विधाने तिच्या तोंडी कधीच नव्हती. त्यामुळे ती प्रेक्षकांपुढे कधी प्रमुख नायिका म्हणून आली, कधी मीनाकुमारीबरोबर दिसली (शारदा), तर कधी नंदाबरोबर दिसली (छोटी बहन). शाहू मोडक यांच्याबरोबर तिने पौराणिक चित्रपटांतही काम केले होते. पार्श्वगायक तलत मेहमूद ‘लाला रुख’ चित्रपटात तिचा नायक होता. तिच्याकडे बघून तो गातो व तिला सांगतो, ‘प्यास कुछ ऐसी भडका दी झलक दिखला के...’

श्यामाची झलक होतीच तशी! तिचे डोळे बोलके होते आणि चेहरा सुंदर होता! या चेहऱ्यावरच तर छायाचित्रकार फली मिस्त्री भाळला! ‘सजा’ चित्रपटाचे दिग्दर्शन तोच करत होता. त्या वेळी त्याने तिला मागणी घातली. श्यामा मुस्लिम होती (खुर्शीद अख्तर असे तिचे नाव). फली मिस्त्री पारसी होता; पण दोघांच्या प्रेमात धर्म आडवा आला नाही. ईद, ख्रिसमस पारशी नवीन वर्ष, दिवाळी असे सारे सण साजरे करत दोघांचा संसार सुखाचा झाला.

देव आनंद, राज कपूर, दिलीपकुमार, बलराज साहनी अशा नामवंत नायकांबरोबर, तसेच भारत भूषण, महिपाल, प्रदीपकुमार अशा सुमार नटांबरोबर आणि शम्मी कपूरसारख्या नवथर नायकालाही सांभाळून घेत श्यामाने अनेक भूमिका उत्तमपणे साकार केल्या. ‘छोटी बहन’सारख्या चित्रपटात तर ती प्रेमळ कुटुंबात कलह उत्पन्न करणारी स्वार्थी स्त्री म्हणून दिसली. त्या चित्रपटातील तिचा नायक रेहमान सुरुवातीला तिच्या सौंदर्यावर पागल होऊन ‘ओ कली अनार की’ असे तिला संबोधतो, तर अखेरीस तिच्या वागण्याने त्रस्त होऊन ‘चांदनी आयी घर जलाने....’ असे गाऊन तिला दूषणे देतो. (या गीताबद्दलचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

श्यामावर चित्रित झालेली गाणी ही एक वेगळीच पर्वणी आहे. ‘हम लोग’मध्ये ती नूतनबरोबर होती. ‘छुन छुन बाजे पायल मोरी...’ या गीतावर तिने सुंदर नृत्य केले होते. ‘आरपार’मधील ‘ये लो मैं हारी पिया...’ हे गीत गीता दत्त, ओ. पी. नय्यर यांच्यासाठी लक्षात राहते, तसेच ते श्यामाचे गीत म्हणूनही लक्षात राहते. ‘भाभी’मधील तिने पडद्यावर गायलेले ‘कारे कारे बादरा...’ आणि ‘छुपाकर मेरी आँखों को...’ हे लता-रफीचे द्वंद्वगीत मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. आशा भोसलेंनी गायलेले ‘ठोकर’मधील ‘ए गमे दिल क्या करू...’ हे गीत श्यामाने पडद्यावर साकार केले होते. ‘जबक’मधील ‘तेरी दुनियासे दूर’ या रफी-लताच्या द्वंद्वगीतातील विषाद मनाला अस्वस्थ करून सोडतो.

श्यामाच्या अशा अनेक सुनहऱ्या गीतांपैकी एक गीत आपण आज पाहू या. ते गीत १९५६च्या ‘एव्हीएम प्रॉडक्शन’च्या ‘भाई भाई’ या चित्रपटातील आहे! त्याचे संगीत मदनमोहनचे होते, तर काव्य राजेंद्रकृष्ण यांचे! प्रेमात पडलेल्या एका आनंदी मन:स्थितीतील तरुणीचे मनोगत गीता दत्त गाते आणि ते पडद्यावर साकार करताना श्यामा म्हणते...

वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है

हे माझ्या हृदया/मना, मला तू जरा हे सांगशील का, की तुला कोण भावले आहे. (माझे मन कुणावर जडले आहे.) (आणि असा) तो कोण आहे, ज्याचीच स्वप्ने मला पडत आहेत....

मस्तीभरा तराना क्यों रात गा रही है
आँखो में नींद आकर क्यूँ दूर जा रही है 
दिल में कोई सितमगर अरमान जगा गया है...

प्रेमाच्या प्राप्तीने आनंदी झालेली ती एक एक प्रश्न उभे करून स्वतःच्या भोवतालची स्थिती सांगताना म्हणते, की ही रात्र बघा कशी आनंदित गात आहे (आणि त्यामुळे) माझ्या डोळ्यावर आलेली झोपही निघून जात आहे. हे का घडत आहे? माझ्या हृदयातील इच्छा कोणी अत्याचारी (सितमगर) जागृत करून गेला आहे. (इथे प्रेम करणाऱ्याला लडिवाळपणे अत्याचारी म्हटले आहे.) प्रेमरसात न्हाऊन गेल्याने हे सर्व घडत असताना तिला हेही जाणवते, की

भीगी हुई हवायें, मौसम भी है गुलाबी 
क्या चाँद, क्या सितारें, हर चीज़ है शराबी 
धीरे से एक नग्मा कोई सुना गया है...

ही (प्रेमरसाने न्हालेली) ओलसर हवा, हा (प्रेमाच्या रंग ल्यालेला) गुलाबी ऋतू! (या मोहक) चंद्र आणि चांदण्यांबद्दल तर काय बोलावे? या सर्वच गोष्टी मला (प्रेमरस प्यालेल्या) मद्यधुंदासारख्या वाटत आहेत. हळुवारपणे एक प्रेमगान कोणी मला ऐकवून गेले आहे. 
प्रेममय वातावरणातील या गीतात ‘श्यामा’ पुढे सांगते -

बेताब हो रहा है, ये दिल मचल मचल के 
शायद ये रात बीतें करवट बदल बदल के 
ऐ दिल जरा संभल जा शायद वो आ गया है...

(या प्रेमप्राप्तीमुळे माझे) हे हृदय, मन प्रेम देणे-घेणे या विचारांनी व्याकूळ होत (आणि त्यामुळेच) बहुधा माझी ही रात्र या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यात (ओघानेच जागे राहण्यात) जाणार आहे. हे माझ्या हृदया/मना (तू आता स्वतःला) सांभाळ (बाबा! कारण प्रीतीचा तो सुखद काळ देणारा माझा प्रेमिक) बहुधा तो आला (नव्हे तोच आला आहे.)

एका प्रेमिकेच्या भावना व्यक्त करणारे हे एक आनंदगीत मदनमोहनच्या चालीमुळे, संगीतामुळे, गीता दत्तच्या स्वरामुळे मनाला आनंद देते. राजेंद्रकृष्ण यांचे साधे-सोपे शब्द सहजपणे गुणगुणता येतात. श्यामाच्या स्मृती तिच्यावर चित्रित झालेल्या अशा अनेक गीतांमधून व तिने काम केलेल्या चित्रपटांमधून आपल्या मनात सदैव राहणार आहेत, जरी ती हे जग सोडून गेली असली तरीही! तिला आदरांजली!!!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search