Next
विल्यम शेक्सपिअर, धनंजय कीर, सिसिलिया कार्व्हालो
BOI
Monday, April 23 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’, ‘सम आर बॉर्न ग्रेट, सम अचिव्ह ग्रेटनेस अँड सम हॅव ग्रेटनेस थ्रस्ट अपॉन देम’ यांसारखी हजारो चमकदार वाक्यं सहज लिहून जाणारा सर्वश्रेष्ठ इंग्लिश नाटककार विल्यम शेक्सपिअर, उत्कृष्ट चरित्रकार धनंजय कीर आणि कवयित्री, लेखिका सिसिलिया कार्व्हालो यांचा २३ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.... 
विल्यम शेक्सपिअर 

२३ एप्रिल १५६४ रोजी स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हनमध्ये जन्मलेला शेक्सपिअर म्हणजे इंग्लिश भाषेतला सर्वश्रेष्ठ, महान लोकप्रिय कवी आणि नाटककार!! त्याच्याइतकं यश कुठल्याच नाटककाराला मिळू शकलं नाही. त्याच्या नाटकांच्या कथानकांची लोकप्रियता, भाषेचा लहेजा, डौल आणि मोहिनी आज चारशे वर्षं उलटली तरी रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. तो स्वतः नाटकात कामं करत असे. त्याच्या नाटकातली इंग्लिश भाषा अत्यंत स्टायलिश होती आणि त्याची स्वतंत्र शैली घेऊन आली होती. त्याच्या बहुतेक नाटकांची जगातल्या बहुतेक सर्वच भाषांमध्ये रूपांतरं झाली आहेत. 

वयाच्या २५व्या वर्षी त्याचं ‘हेन्री सिक्स्थ’ हे नाटक प्रसिद्ध झालं आणि पाहतापाहता पुढच्याच दोनेक वर्षांत त्याची रिचर्ड-थर्ड, दी कॉमेडी ऑफ एरर्स, टायटस अँड्रॉनिकस यांसारखी नाटकं लोकांसमोर आली आणि लोकांची पसंती मिळत गेली. १५९६ सालच्या आसपास त्याची रोमिओ अँड ज्युलिएट, लव्हज लेबर्स लॉस्ट, दी टेमिंग ऑफ दी श्रू यांसारखी नाटकं आली आणि तो प्रसिद्धीच्या शिखरावर गेला. कहर म्हणजे सोळावं शतक संपता संपता त्याची हॅम्लेट आणि ज्युलियस सीझर ही नाटकं आली आणि ती तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्याची लोकप्रियता कळसाला जाऊन पोहोचली. 

सतराव्या शतकाच्या पहिल्याच दशकात (१६१० पर्यंत) त्याच्या पोतडीतून ऑथेल्लो, अँटनी अँड क्लिओपात्रा, किंग लिअर, मॅक्बेथ यांसारखी रत्नं बाहेर आली आणि पाठोपाठच हेन्री-एट्थ!...एव्हाना त्याला सर्वश्रेष्ठ नाटककाराचा किताब जगभरच्या लोकांनीच उत्स्फूर्तपणे बहाल केला होता. आपल्या ३९ नाटकांव्यतिरिक्त त्याने १५४ सुनीतंही लिहिली होती.
 
वयाच्या ५२व्या वर्षी २३ एप्रिल १६१६ रोजी त्याचा स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हनमध्येच मृत्यू झाला.

(ज्येष्ठ अनुवादक, साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी लिहिलेला ‘आंग्लमुनी विल्यम शेक्सपिअर’ हा लेख वाचण्यासाठी https://goo.gl/Fpc22u येथे क्लिक करा. शेक्सपिअरची मूळ पुस्तकं, अनुवादित साहित्य, तसंच ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी https://goo.gl/b5guBC येथे क्लिक करा.)
.........

अनंत विठ्ठल कीर
 
२३ एप्रिल १९१५ रोजी रत्नागिरीमध्ये जन्मलेले अनंत विठ्ठल ऊर्फ धनंजय कीर हे चरित्रकार म्हणून साहित्य जगतात मानाचं स्थान मिळवलेले लेखक! 

ब्रिटिश राजवटीत नोकरी करत असताना स्वातंत्र्यवीरांची चरित्रं किंवा शब्दचित्रं लिहिणं तसं जोखमीचं होतं. म्हणून ‘अनंत विठ्ठल’ऐवजी धनंजय कीर असं भिडे गुरुजींनी सुचवलेलं सुटसुटीत नाव घेऊन त्यांनी लेखन सुरू ठेवलं आणि पुढे तेच नाव त्यांना कायमचं चिकटलं. 

भारताच्या प्रबोधनाला साह्यभूत ठरलेल्या थोर पुरुषांच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाची उकल करणारी उत्कृष्ट चरित्रं त्यांनी लिहिली. एकेका व्यक्तीचं चरित्रं लिहिण्याआधी ते सात-आठशे पुस्तकांचं वाचन करत असत. त्यांनी लिहिलेली चरित्रं त्यांच्या अशा सखोल अभ्यासामुळे ऐतिहासिक दस्तऐवजाइतकीच मोलाची मानली गेली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर, लोकमान्य टिळक, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, स्वातंत्र्यवीर सावरकर, कृतज्ञ मी कृतार्थ मी, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

भारत सरकारतर्फे त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. 

१२ मे १९८४ रोजी त्यांचं निधन झालं. 

(धनंजय कीर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
...........

सिसिलिया फ्रान्सिस कार्व्हालो 

२३ एप्रिल १९५६ रोजी जन्मलेल्या सिसिलिया कार्व्हालो या कवयित्री आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचं बालसाहित्य, लोकसाहित्यसुद्धा प्रसिद्ध आहे. 

२०१६ साली बेळगावात झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. 

त्यांना महाराष्ट्र राज्य सरकार, कोकण मराठी साहित्य, भीमाबाई आंबेडकर, कविवर्य प्रा. कृ. ब. निकुम्ब, इंदिरा संत, प्रणव प्रतिष्ठान अशा अनेक मान्यवरांच्या नावाचे आणि नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

आयदान : सांस्कृतिक ठेवा, धागा, माणूस उकरून काढावा लागतोय..., दारातल्या रांगोळीचे रंग, मातीची हाक, मोगऱ्याचा मांडव, पालखी, ऋतुचक्र, सूर्य किरणात आला, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

(सिसिलिया कार्व्हालो यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link