Next
‘आधुनिक आणि प्राचीन ज्ञानाचा संगम घालणारं गुरुकुल’
BOI
Thursday, July 05, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story

बस्तर भागातील आदिवासी

‘आपल्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि मग आधुनिक आणि प्राचीन यांची सांगड घालून शिक्षण द्यावं. आणि गुरुकुलाची सुरुवात झाली...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे.... आरती आवटी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा पाचवा भाग...
..........
पारधी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करावे लागले का? उपेक्षित घटकांना न्याय म्हणजे समतेसाठी विद्रोह असा पायंडा पडत असताना, समरसतेची नवी वाट कशी चोखाळली? त्यात कितपत यश मिळालं आहे, असं तुम्हाला वाटतं. या मार्गक्रमणातील महत्त्वाचे म्हणता येतील, असे टप्पे कोणते? त्यातून स्थायी स्वरूपाचं कोणतं काम उभं राहिलं?
आता समरसतेचा एक मुद्दा घेऊ. या भटक्या जाती-जमातींचा प्राचीन काळात गावाशी संबंध चांगला होता. म्हणजे मला निमगाव म्हाळुंगेला जो अनुभव आला होता, की एका ठरावीक ठिकाणी बंधारा बांधला, तर वाहून जाईल, हे अगदी गांवढळ, अशिक्षित असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं होतं. हे त्याचं स्वतःचं ज्ञान होतं. आम्ही त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नंतर या कामामध्ये मी लक्षात घेतलं, की यांच्याकडे वनौषधीचं ज्ञान आहे. ही उत्तम प्रकारे पळू शकतात. आम्ही जी पहिली सहल नेली होती, त्या सहलीमध्ये पंचवीसच मुलं होती आणि आम्ही पाच कार्यकर्ते होतो. प्रत्येकाने सरासरी पाच जणांकडे लक्ष द्यावं, अशी रचना होती. एवढं त्या मुलांना सांभाळणं कठीण असायचं. नळदुर्गचा किल्ला हा अत्यंत प्राचीन आणि वैज्ञानिकदृष्ट्या बांधलेला असा तीन स्तरांचा आहे. तो किल्ला पाहायला आम्ही मुलांना नेलं होतं. तिथला एकेक खंदक वीस-बावीस फुटांचा आहे. आम्ही किल्ल्याच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यात (वर) पोहोचलो, तेव्हा पाच-सात मुलं आमची नजर चुकवून आधीच तिथे पोहोचलीही होती. आम्ही धापा टाकत मार्गाने चाललो होतो आणि ती मुलं तीन बुरुजांवरून चढत-चढत अजिबात दम न लागता तिथे पोहोचली होती. ही त्यांची कौशल्यं आहेत. मग त्यांचा शिक्षणात उपयोग झाला पाहिजे. चाळीसगावच्या जवळ बेल्हारवाडी म्हणून एक गाव आहे. पाच-दहा हजार लोकसंख्या असे. बेल्हार हा एक समाज आहे. 

समरसता मंचाचे अध्यक्ष मोहनराव गवंडी बेल्हार समाजाचे. (तोपर्यंत माहितीच नव्हतं, की बेल्हार म्हणजे काय?) गवंडी म्हणजे काय? गवंडी म्हणजे गवंडी. चाळीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील विभाग संघचालक होते. मोहनराव म्हणाले, ‘आम्ही गवंडी. शनिवारवाडा बांधायच्या वेळेला आम्हाला पेशव्यांनी इकडे आणलं. आम्ही राजस्थानातले. गवंडी म्हणजे बेल्हार.’ अशी ती बेल्हारवाडी. तिथे गेलो. एक जख्ख म्हातारी बसलेली होती. मला एक अनुभव आला, की तरुणांना काही विचारलं, तर त्यांना काही माहितीच नसायचं. अभ्यास करत नाहीत, वाचन नाही. जे आहे ते सगळं आंधश्रद्धा, रुढी, आमुक-तमुक म्हणून सोडून दिलेलं. म्हाताऱ्यांनाच विचारलं, की कळायचं. त्या म्हाताऱ्या बाईला विचारलं, ‘काय हो आजी तुमचं वय किती?’ तिनं लगेच सांगितलं, ‘पाचईसा तीन.’ मला काही कळेना. माझ्याबरोबर तिथले तीन-चार संघचालक, कार्यवाहक होते. मग त्यांनी तिला विचारलं, की ‘पाचईसातीन म्हणजे काय बाई?’ तर म्हणाली, ‘हे पाच, हे पाच.’ म्हणजे हाताची बोटं पाच आहेत. ती बाई कधी शाळेत गेली असेल असं नाही. तरीसुद्धा तिला पाच कळतात. ‘पायाचे पाच-पाच. हे वीस झाले.’

म्हणजे पाच चोक वीस. म्हणजे तिला गुणाकार आला किंवा बेरीज आली. पाच, पाच, पाच, पाच वीस. म्हटलं ‘पाच पाचईसातीन म्हणजे काय?’ तर ‘असे वीस, असे पाच.’ विसा पाचा शंभर आणि वरती तीन. एकशे तीन वय आहे. आता तिच्या जन्मापासून एकशे तिनाव्या वर्षापर्यंत ती मोजत आलेली आहे आणि तिला हे सगळं समजतंय. बेरीज करते ती. लक्षात राहतंय तिच्या. तिनं चटकन सांगितलं. म्हणजे गेल्या वर्षी विचारलं असतं तर पाचईसादोन सांगितलं असतं तिनं. म्हणजे हे तिला गणिताचं ज्ञान आहे. आमच्यापैकी एकाने विचारलं, ‘बाई कुठल्या शाळेत गेलात तुम्ही? कितवी शिकलात?’ ती म्हणाली, ‘शिकले कुठली, शाळेतच गेले नाही. मी वडार, बेलदार समाजातली. आमी मातीकाम करणारे. तिनं इतकं ज्ञान दिलं आम्हाला.’ हे वेरुळ, अजिंठा खोदणारे कोण असणार? कुठल्या शाळेत शिकलेले असणार? इंग्रज तर आता आले. अजिंठा-वेरुळची लेणी तर सातव्या-आठव्या शतकातली आहेत. अंधारामध्ये खोदलं आहे त्यांनी. वेरुळच्या कैलास लेण्यामध्ये प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. पूर्ण कैलास लेणं एका खडकात खोदलं आहे. म्हणजे त्यांना वास्तुशास्त्र माहिती आहे, शिल्पशास्त्र माहिती आहे, खनिजशास्त्र माहिती आहे. शिवाय त्याच्यामध्ये जे खोदलंय, ते तत्त्वज्ञान आहे. म्हणजे पुराण माहितेय आणि खोदणारा तर ब्राह्मण नक्कीच असणार नाही. कारण ब्राह्मण पूजा-अर्चा किंवा पोथ्या, पुराण, वेद, शास्त्रसंपन्न. मग ही खोदणारी जात कुठली? 

मग हे वडार असणार. या जमातींकडे ज्ञान आहे, गणित आहे, भूमिती आहे. म्हणजे एखादी वडारीणबाई पाटा-वरवंटा तयार करते. चौकोन बरोबर कसा करते? ठोके मारून मारून ती बरोबर लंबगोलाकृती वरवंटा आणि चौकोनी पाटा तयार करते. म्हणजे तिला भूमितीतले काटकोन त्रिकोण, काटकोन चौकोन सगळं अवगत आहे. अजिंठा-वेरुळमध्ये तर हे सगळं ज्ञान-विज्ञान भरलेलं आहे. आपल्याकडे जाती-जातींचे व्यवसाय पक्के आहेत. सुताराचा मुलगा सुतार, लोहाराचा मुलगा लोहार, असं दहा हजार वर्षांपासून आहे. याचा अर्थ या जमातींमध्ये शिक्षण आहे. वैदूचा मुलगा वैदू होतो, वडाराचा मुलगा वडार होतो. तो शाळेत न जाता शिकतो. मग त्याला भूमिती येते. तो गुण्या बरोबर लावतो. माझ्याबरोबर एक आर्किटेक्ट होता. तो म्हणाला, की मला ही इमारत बांधता नाही येत. मी जमिनीवर आखून देईन; पण खोदणारा पुन्हा असाच कुठल्यातरी वडाराचा पोरगा असतो. बांधणारा गवंड्याचा मुलगा असतो. तो बरोबर खोदतो किंवा बांधतो. त्याला गणित कळत नाही; पण त्याला सांगितलेलं माप बरोबर काढून तो त्याच काम करतो. सेंट्रिंगच्या कामांचंही तेच. आता हा वाडा आम्ही उभा केला, त्यातला दगड अन्‌ दगड तो अडाणी वडारांनी रचलेला आहे. पाहिजे त्या योग्य मापात दगड काढले, मापात पायऱ्या केल्या. लाकडाचं सगळं काम सुतारानं केलं. हे सगळे निरक्षर होते. मग त्यांना कसं काय कळलं हे? याचा अर्थ आमच्या प्राचीन परंपरेत विज्ञान होतं आणि ते घराघरापर्यंत गेलेलं होतं. घराशी विद्यापीठ जोडलेलं होतं. आता विद्यापीठात जाऊन शिकावं लागतं. तिथे तिथली जी आई आहे, आजीबाईचा बटवा आहे, तो ज्ञान देत होता. सुईणींचीही परंपरा असलेली कुटुंबं असायची. असं प्रत्येक जातीमध्ये ज्ञानाचं भांडार आहे. 

मग लक्षात आलं, की इथे आपण ‘मेकॉले’ घेऊन चाललोय. आपण हे शिक्षण देणार आणि जाणार, त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जे ज्ञानाचं भांडार आहे, त्याच्यात आपण आधुनिकतेची भर घालावी आणि मग आधुनिक आणि प्राचीन याची सांगड घालून शिक्षण द्यावे. नाही तर जो वडार आहे, तो दगडातनं बाहेर येणार आणि मग नोकरीकरिता ‘सर मी बीए पास आहे, नोकरी द्या,’ म्हणत बसणार. नोकरी मिळणार नाही. त्याच्यापेक्षा त्याला जे ज्ञान आहे, त्याच कलेमध्ये तो आधुनिकता आणेल आणि अधिक चांगलं करेल. अधिक चांगल्या इमारती बांधेल, मग आर्किटेक्ट होण्यासाठी त्यालाच प्रवेश मिळेल. वैदूला पहिल्यापासूनच वनौषधींचं ज्ञान दिलं, प्रक्रिया उद्योगाचं ज्ञान दिलं, तर तो अधिक चांगला डॉक्टर होऊ शकतो. म्हणजे वैदूतनं डॉक्टर झाला. वडारातनं आर्किटेक्ट झाला, इंजिनीअर झाला. ओताऱ्यातनं एखादा चांगला फर्नेस करणारा इंजिनीअर झाला, असं होऊ शकतं. 

बस्तरमध्ये आदिवासी आहेत. तिथल्या महिला खाणीतनं माती आणतात, एवढ्याशाच भट्टीत ती माती टाकतात, ती खालनं पेटवतात. मातीतच त्यांचं भांडं असतं. ते लालबुंद होतं. फुटत नाही. आतल्या मातीचा रस व्हायला लागतो. त्यातनं ते गाळून रस काढतात आणि तो वेगळ्या भांड्यात ओततात. त्याचीच मग मूर्ती तयार करतात. हे वैज्ञानिक आहे. म्हणजे सारनाथचा आणि दिल्लीचा जो लोहस्तंभ आहे, तो यांनी अडीच हजार वर्षांपूर्वी केलेला आहे. तरी म्हणे हे अडाणी आणि मूर्ख... आणि आताचा जो इंजिनीअर असेल, त्याला फर्नेसवर काम करायला कोणतरी दुसराच लागतो. तो गार्ड किंवा इंजिनीअर असतो, तो कोळसा नाही टाकत. तिथं काम करणारा वेगळाच असतो. त्यालाच ते गणित बरोबर जमतं. असं सगळं आहे. 

या प्राचीन ४०-४२ जाती-जमाती, त्यांच्याकडच्या ज्ञानाच्या आधारावर पाठ्यपुस्तक तयार करायचं आणि त्याच्या आधारावर त्यांना शिक्षण द्यायचं. असं सगळं डोक्यात आल्यामुळे यमगरवाडीचा पुढचा टप्पा म्हणून इथं (चिंचवडमध्ये) एक गुरुकुल सुरू केलं. इथे शहर जवळ असल्यामुळे शहरातनं तज्ज्ञ मंडळी मिळायला लागली. आणि त्यातनं पुनरुत्थान म्हणजे समाजाचं पुनर्निर्माण करायचंय, समरसता आणायची आहे. म्हणून मग इथे आता या चाफेकरांच्या वाड्यात काम चालू आहे. ही संपूर्ण गल्ली आहे, ती ब्राह्मण आळी आहे, मध्यमवर्गीयांची गल्ली आहे; पण वाड्यात जी मुलं आहेत, त्यापैकी ७५ टक्के पारधी आहेत, कैकाडी आहेत, वडार आहेत, बौद्ध आहेत, मातंग आहेत, धनगर आहेत.

यमगरवाडीतनं अशी मुलं आणि मुली इथे आणली. सातवीच्या पुढचा टप्पा इथे. हे करत असतानाच आम्ही आता असं ठरवलंय, की इथेच पहिली इयत्ता सुरू करू. आणि अगदी सुरुवातीला मी जे सांगत होतो, की सगळं आहे तरी समस्या का आहे? मग या समस्यांना उत्तर कसं शोधायचं? बाँबस्फोट झाला, तरी त्याच्यावर उत्तर नाही. स्त्रियांवर अत्याचार झाले, तरी उत्तर नाही. आणि शिक्षण तर उत्तम आहे. शिकूनही लोक अत्याचार करत आहेत. म्हणजेच या शिक्षणातनं त्यांचं मन तयार नाही झालंय. मग हे शिक्षण काय आहे? या पाठ्यपुस्तकांमध्ये अध्यात्म नाही, त्याच्यात मनाची तयारी नाही, शरीराची तयारी आहे. कला-कौशल्य शिकतात; पण त्यांचं मन रानटीच राहिलेलं आहे. ते जातीयवादीच राहिलेलं आहे. ब्राह्मण तो ब्राह्मण, मराठा तो मराठा, बौद्ध तो बौद्ध, दलित तो दलित. तसंच तयार होत ते मोठे होतात. इंजिनीअर दलित असला आणि इंजिनीअर ब्राह्मण असला, तरी दोघांच्या जाती तिथे शाबूत असतात. जाती जात नाहीत. मग त्या घालवायच्या असतील आणि त्यांना हिंदू म्हणून जगवायचं असेल, तर लहानपणापासूनच तसं करायला हवं. आम्ही इथं आता हे सगळं काढण्याचा प्रयत्न करतो. पहिलीला आम्ही संस्कृत, इंग्रजी शिकवतोय. पुढच्या दोन-तीन वर्षांत त्यांना दोन्ही भाषा बोलता-लिहिता-वाचता याव्यात. आत्ता इंग्रजी बोलणारा जो बारावीच्या पुढचा एक वर्ग आहे, तो इंग्रजी काय बोलतो, हे त्याचं त्याला कळतं नाही. इंग्रजी भाषेचं सखोल नव्हे, तर कामचलाऊ ज्ञान असतं. त्याचा इंग्रजी साहित्याचा काही अभ्यास नसतो. त्याचं मराठीही धड नसतं. आणि आता इंग्रजीचं आक्रमण लिपी या रूपानं आलेलं आहे. जाहिराती, होर्डिंग्ज पाहिले, की त्यातील मजकूर असतो हिंदीमध्ये, पण तो लिहिलेला असतो इंग्रजी लिपीत. त्यामुळे धेडगुजऱ्या भाषेप्रमाणे काहीतरी विचित्र अशी पुढची पिढी तयार झालेली आहे. ना ती इंग्रजी आहे, ना ती मराठी आहे, ना ती हिंदी आहे.
त्यामुळे या पिढीला योग्य ज्ञान, योग्य संस्कृती माहितीच नाही. म्हणजे पुढचा भारत हा असेल कसा? हिंदू तरी रहिल कसा? नावाने हिंदू असेल पण आचरणाने तो हिंदू राहणार नाही. पोषाखाने राहणार नाही. कुठल्याच गुणधर्माने राहणार नाही. निदान तो संस्काराने हिंदू रहावा, म्हणून या मुलांना आम्ही संस्कृत, हिंदी, इंग्रजी, मराठी चारही भाषांचे धडे देतो. त्यांची जी भाषा आहे, तिचाही शब्दकोश आम्ही तयार करत आणलेला आहे. म्हणजेच पारधी भाषेचा शब्दकोष. त्यामुळं ती भाषा लुप्त होणार नाही. नवीन गोष्टींची सांगड घालताना, गेली दहा हजार वर्षे त्यांच्यापर्यंत जे पोहोचलं नाही, ते संस्कृतही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आधुनिक इंग्रजी त्याला येतेच आहे. संगणकाचं शिक्षणही त्यांना दिलं जात आहे. पॉटरी ट्रेनिंगसारख्या वेगवेगळ्या व्होकेशनल विषयांचं प्रशिक्षणही दिलं जात आहे.

(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link