Next
चालुक्यांची राजधानी - बदामी
BOI
Wednesday, December 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story

एके काळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी. ‘करू या देशाटन’ सदरात आज सैर करू या त्याच ठिकाणाची...
.............
एके काळी दक्षिण भारतात वैभवाच्या शिखरावर असलेल्या चालुक्य राजांची बदामी ही राजधानी. चालुक्यांनी दक्षिण भारतावर इ. स. ५४० ते इ. स. ७५७पर्यंत आणि कल्याणी चालुक्यांनी ११व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत राज्य केले. भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रंगांचे व प्रकारांचे खडक आढळतात. पिवळा, गुलाबी, सफेद दुधी, हिरवा, काळा, तांबडा, तपकिरी अशा अनेक प्रकारचे पाषाणाचे रंग फक्त भारतातच पाहायला मिळतात. बदामी रंगाच्या मऊ वालुकाश्मांमध्ये कोरलेल्या गुंफा व शिल्पांमुळे बदामी हे नाव रूढ झाले. 

बदामीला वातापी म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक संदर्भ असलेली बदामी जैन, बौद्ध व हिंदू संस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे. अगस्त्य ऋषींनी वातापी नावाच्या असुराला येथे ठार केले. कर्नाटकातील बागलकोटजवळील चालुक्यांची राजधानी बदामी या नावाने ओळखली जाते. कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात दक्षिण बाजूला हा परिसर आहे. ही सुमारे १५०० वर्षांपूर्वीची पुरातन स्मारके आहेत. पाषाणयुगातील (अश्मयुगातील) डोलमेन्स (Dolmens) येथे सापडल्या आहेत. ही आदिमानवाची वसतिस्थाने म्हणून ओळखली जातात. यात त्याचे राहण्याचे ठिकाण असून, काही ठिकाणी त्याचा दफनासाठी उपयोग केलेला असू शकतो. बदामी, पट्टदकल व ऐहोळे या तीन ठिकाणी चालुक्यांनी बांधलेली मंदिरे व गुंफा आजही पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरल्या आहेत. गुजरातमधील सोळंकी, तसेच महाराष्ट्रातील साळुंखे घराणी चालुक्य वंशातील समजली जातात. 

शिलालेख

बदामीची थोडी माहिती...
इ. स. ५४०मध्ये चालुक्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर राजा पुलकेशी याने इथे किल्ला बांधला व तसा शिलालेखही येथे आहे. पुलकेशी पहिला याने येथे किल्ला बांधून वातापीला राजधानी म्हणून घोषित केले. आज जगभरात बदामी चालुक्यांच्या पुरातत्त्वीय स्मारकांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. येथे बहुतेक रचना तयार करण्यासाठी विशिष्ट द्रविड वास्तुशास्त्रीय शैली वापरली गेली आहे. 

अगस्त्य तलाव

भूतनाथ मंदिर :
बदामी येथील अगस्त्य तलावाच्या काठावर आलेले हे मंदिर वालुकाश्माचे आहे. अगस्त्य तलाव हा पुराणातील अगस्त्य ऋषींच्या संदर्भातील आहे. त्यांनी वातापी नावाच्या असुराला ठार केले, अशी आख्यायिका आहे. त्यावरून बदामीला वातापी हे नाव तर मिळालेच, शिवाय तलाव अगस्त्य तलाव म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या काठावरच भूतनाथ मंदिर आहे. हे शिवमंदिर उत्तर व दक्षिण वास्तुशिल्प शैलीत बांधलेले आहे. साधारण सातव्या शतकात याची निर्मिती झाली असावी. 

मल्लिकार्जुन आणि काशीविश्वनाथ मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर :
हे मंदिरही सातव्या शतकात बांधले गेले; मात्र याची बाह्य रचना आणि विस्तार कल्याणी चालुक्य राजवटीत ११व्या शतकात झाला. 

बदामीला चार गुंफांचा समूह आहे. 

नटराजगुंफा क्रमांक एक : ही गुंफा नटराज स्वरूपातील शिवाच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. १८ हातांची ही मूर्ती १८ नाट्यमुद्रा दर्शविते. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला त्रिदंडधारी शिवद्वारपाल असून, बाजूला हत्ती व बैलाचे शिल्प आहे. आत आल्यावर हरिहराची साडेसात फूट उंचीची मूर्ती दिसते. उजवीकडे, भिंतीच्या दिशेने शिव आणि पार्वतीचे अर्धनारीश्वरी रूपाचे शिल्प आहे. पंख असलेली अप्सरा, तलवारधारी यक्ष अशी अनेक शिल्पे येथे पाहायला मिळतात. सर्व शिल्पे अलंकारांनी सुशोभित केलेली आहेत. येथे पशु-पक्ष्यांची शिल्पे आहेत, तसेच मिथुनशिल्पेही आहेत. 

गुंफा क्रमांक २ : विष्णूला समर्पित असलेली ही गुंफा सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात खोदण्यात आली. प्रवेशद्वारावर विनाशस्त्र द्वारपाल आहेत. त्यांच्या हातात फुले आहेत. मंदिराच्या आत भागवत पुराणासारख्या हिंदू ग्रंथांमधील कथा दर्शविल्या आहेत. सातव्या शतकातील भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शविणारी ही गुंफा आहे. समुद्रमंथन, कृष्णजन्म आणि कृष्णलीला यात दाखविल्या आहेत. छतावरील आणि दरवाजाच्या वरील शिलाखंडामध्ये लक्ष्मी, स्वस्तिक प्रतीक, उडणारी जोडपी, ब्रह्मा, विष्णू आदींच्या प्रतिमा आहेत. छताला चौरस फ्रेममध्ये एका चक्रावर सोळा मासे दिसून येतात. शेवटच्या भागामध्ये आकाशात विहार करणारे एक जोडपे आणि गरुडावर विष्णु आहे. साधारणतः वेरूळसारखीच शिल्पकला येथे पाहायला मिळते. देव-देवता, त्यांचे अवतार, पौराणिक संदर्भ येथे दिसून येतात. 

गुंफा क्रमांक तीन

गुंफा क्रमांक ३ :
ही गुंफाही श्री विष्णूला समर्पित आहे. या समूहातील ही सर्वांत मोठी गुंफा आहे. या गुंफेत त्रिविक्रम, अनंतसायण, वासुदेव, वराह, हरिहर आणि नरसिंहाच्या विशाल मूर्तींचा आणि राक्षसांच्या मूर्तीचाही समावेश आहे. येथे फ्रेस्को पेंटिंगही दिसून येते; मात्र ही चित्रे थोडी फिकट झाली आहेत. परंतु त्या काळी असलेल्या चित्रकलेचा नमुनाही येथे पाहायला मिळतो. सहाव्या शतकातील संस्कृती, सौंदर्यप्रसाधने आणि कपड्यांचे दृष्टिकोन या गोष्टी गुहेतील शिल्पकलेतून दिसून येतात. अनेक स्तंभांच्या खांबावर, खांबांच्या चौकटीत स्त्री व पुरुष प्रेम मिथुनशिल्पे आहेत. शिलालेखावर ही गुंफा पौर्णिमेच्या दिवशी (एक नोव्हेंबर ५७८ रोजी) पूर्ण झाल्याचे दिसून येते. 

गुंफा क्रमांक तीन

चौथ्या गुंफेतील बाहुबली यांची प्रतिमागुंफा क्रमांक ४ : ही गुंफा जैन धर्मातील श्रेष्ठ तीर्थंकरांना समर्पित आहे. गुंफा क्रमांक तीनच्या पुढेच पूर्वेस ही गुंफा आहे. साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ही गुंफा तयार केली गेली असावी. त्यात अकराव्या व बाराव्या शतकातही सुधारणा झाल्या असाव्यात. महावीरांना यक्ष आणि अप्सरा चवऱ्या ढाळत आहेत, असेही शिल्प आहे. तसेच जैन तीर्थंकरांच्या २४ प्रतिमाही येथे आहेत. ही जैन गुंफा महाराष्ट्रामधील वेरूळ येथील जैन गुंफेप्रमाणेच दिसते. मस्तकावर पाच फणे असलेल्या पार्श्वनाथाची, तसेच सिंहावर आरूढ झालेली महावीराची मूर्तीही येथे आहे. 

अन्य गुंफा : या गुहांच्या व्यतिरिक्त छोट्या गुंफाही येथे आहेत. त्या साधारणतः सातव्या व आठव्या शतकातील असून, यात बौद्ध गुंफांचाही समावेश आहे. 

बनशंकरी रथ

बनशंकरी देवी मंदिर :
हे मंदिर बदामीपासून जवळ चोलचगुड येथे आहे. स्कंद पुराण आणि पद्म पुराण या ग्रंथातील कथेप्रमाणे स्थानिक लोकांना त्रास देणाऱ्या असुराला बनशंकरीच्या रूपात पार्वतीने ठार केले व शांतता प्रस्थापित केली. त्यामुळे तिच्या स्मरणार्थ हे देऊळ बांधले गेले, असे सांगितले जाते. हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. हे मंदिर बदामी चालुक्यांनी इ. स. ७००मध्ये बांधले. येथे मोठा वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. 

दुर्गा मंदिर, ऐहोळे

दुर्गा मंदिरातील मिथुनशिल्पऐहोळे : ऐहोळे येथे प्रामुख्याने लाडखान मंदिर, हुचप्पायगुडी मंदिर, दुर्गा मंदिर, मेगुति जैन मंदिर, रावणपडी गुंफा मंदिर, गौडा मंदिर, सूर्यनारायण मंदिर व संग्रहालय आणि कलादालन बघण्यासारखे आहे. ऐहोळे ही चालुक्यांची पहिली राजधानी होती. मलप्रभा नदीच्या पश्चिमेस ऐहोळे, तर पूर्वेकडे पट्टाडक्कल आहे. ऐहोळेमध्ये चालुक्यकालीन सुमारे १२५ मंदिरे आहेत. सहाव्या शतकात पहिले मंदिर बांधले गेले. ‘बदामी चालुक्य’ हे राजघराणे कला व संस्कृतीचे चाहते होते. त्यांनी एकापेक्षा एक सुंदर मंदिरे उभारली. त्यामुळे ऐहोळे वेगळेपणामुळे ठळकपणाने लक्षात राहते. चालुक्य राज्यकर्त्यांनी ऐहोळे हे वास्तुकलेचे सर्वोत्तम केंद्र बनवले. आज भारताच्या गौरवमयी इतिहासातील हे सोनेरी पान आहे. 

ऐहोळे हे गावाचे नाव ‘अय्या वोळे’शी संबंधित असल्याचे मानले जाते. कोणे एके काळी या भूमीत ज्ञानी-विद्वानांची वस्ती होती. त्यामुळे या गावाला आर्यकुळाचा लौकिक प्राप्त झाला होता. पुराणकथेनुसार परशुरामाने रक्ताने माखलेला आपला परशू मलप्रभा नदीत धुतला, तेव्हा नदीचे पाणी लाल भडक झाले. ते पाहून नदीवर आलेल्या स्त्रियांनी ‘ऐ... होळे... ऐ... होळे...’ असे आश्चर्योद्गार काढले. तेव्हापासून गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

रावणपडी गुंफा मंदिर, ऐहोळे

रावणपडी गुंफा मंदिर :
नैर्ऋत्य बाजूला तोंड असलेली गुंफा एका विशाल चबुतऱ्यावर असून, अनेक पायऱ्या चढून जावे लागते. महादेवाचे मंदिर असल्याने नंदी हवाच. येथे नटराजसा गणेश, कुबेर, वराह यांची शिल्पे पाहायला मिळतात. हॉलमधील छतावर सुंदर नक्षीकाम केले आहे. ही गुंफा वेरूळसदृश आहे. 

दुर्गा मंदिर : दुर्गा मंदिरात दुर्गेचे शिल्प असले, तरी हे मंदिर विष्णू किंवा शिव यांना समर्पित आहे. किल्ल्याच्या तटबंदीसारखे असलेले दुर्गमंदिर (दुर्गा मंदिर) हे ऐहोळे येथील एक मुख्य आकर्षण आहे. हे मंदिर सातव्या व आठव्या शतकादरम्यान चालुक्य राजवंशाने बांधले होते. मंदिराची वास्तुकला मुख्यतः द्रविडी असून, नागारा शैलीदेखील काही ठिकाणी वापरलेली दिसून येते. मराठा शैलीतील तटबंदी या मंदिराभोवती केलेली दिसून येते. देवळातील भिंती, तसेच खांब सुंदर शिल्पांनी नटलेले आहेत. 

योगिनारायण ग्रुप : गौरी मंदिराच्या जवळील या मंदिरसमूहात चार जैन मंदिरे आहेत. ही मंदिरे साधारणतः ११व्या शतकातील कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत बांधली गेली. पाच फण्यांच्या नागाचे छत्र असलेली पार्श्वनाथाची मूर्ती, तसेच महावीरांची मूर्तीही येथे पाहायला मिळते. 

कुंतीगुडी मंदिर समूह : या मंदिरसमूहात चार मंदिरे आहेत. ते ऐहोळे येथील मार्केट मार्गाच्या मध्यभागी वसलेले आहे. हे सहाव्या शतकातील मंदिर आहे. मिशेल यांच्या मते ते आठव्या शतकातील असावे. मुख्य मंदिर वैष्णव, शैव आणि शक्तिवादी परंपरेला धरून आहे. शिव-पार्वती-विष्णू- लक्ष्मी यांची शिल्पे येथे आहेत. विष्णूचा अवतार नरसिंह, अर्धनारीश्वर, नटराज, गजलक्ष्मी, गणेश, शिव, मोती यज्ञोपवीत, शिव, वैदिक देव अग्नी, इंद्र, कुबेर, इशाना, वायू आणि इतर शिल्पेही येथे आहेत. 

त्र्यंबकेश्वर मंदिरसमूह : या समूहात पाच हिंदू मंदिरे आहेत. या गटाचे मुख्य मंदिर दक्षिण दिशेला एका मोठ्या चबुतऱ्यावर आहे. पूर्व आणि पश्चिमेला देसीयार मंदिर आणि रचिगुडी मंदिर ही दोन मंदिरे आहेत.

गळगनाथ मंदिरसमूह : या समूहात मलप्रभा नदीच्या काठावरील सुमारे तीस मध्ययुगीन मंदिरे आहेत. गळगनाथ मंदिरे सातव्या आणि बाराव्या शतकातील आहेत. दुर्गा, हरिहर, महेश्वरी, सप्तमात्रिक, पौराणिक मकार, पाने आणि फुले, पक्षी आणि इतर अनेक प्रकारच्या शैलींचा समावेश आहे. 

वेनियार मंदिरसमूह : या समूहात त्यात दहा मंदिरे आहेत. ही मंदिरे गावाच्या दक्षिणेस रामलिंगा मंदिराजवळील नदीच्या जवळ आहेत. ही मंदिरे ११व्या शतकातील असून, भग्नावस्थेत आहेत. 

रामलिंग मंदिरसमूह : याला रामलिंगेश्वर मंदिर असेदेखील म्हटले जाते. हे पाच मंदिरांचे संकुल मलप्रभा नदीच्या काठावर आहे. दुर्गा मंदिर परिसराच्या दक्षिणेला सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हा समूह आहे. हे प्रामुख्याने शिवसमर्पित मंदिर आहे. येथे रथोत्सव साजरा केला जातो. 

मल्लिकार्जुन मंदिरसमूह : मल्लिकार्जुन मंदिर परिसरात पाच मंदिरे आहेत. साधारण सातव्या शतकात याची निर्मिती झाली. 

ज्योतिर्लिंग मंदिर समूह : हा १६ मंदिरांचा समूह आहे. यात शिवाबरोबरच गणेश, कार्तिकेय, पार्वती यांच्या प्रतिमाही आहेत. 

अंबिरगुंडी मंदिरसमूह : यात तीन मंदिरांचा समावेश आहे. अंबिरगुंडी मंदिरसमूह पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजला जातो. यातील दोन मंदिरे सहाव्या व सातव्या शतकातील असावीत, तर तिसरे कल्याणी चालुक्यांच्या काळातील अकराव्या शतकांतील असावे. 

बौद्ध मंदिर : मेगुटी टेकडीवर ऐहोळेमधील एकमेव बौद्ध स्मारक आहे. येथे एक बुद्ध प्रतिमा असून, हे दोन मजली मंदिर आहे, साधारण सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात याचे काम झाले असावे. 

पट्टदकल मंदिरसमूह

पट्टदकल :
या ठिकाणास पट्टदकल्लू अथवा रक्तपुरा असेही म्हणतात. कलेच्या इतिहासकारांची ही स्वप्ननगरी आहे. भारतातील विविध शैलीतील मंदिरे येथे आहेत. यातील चार मंदिरे दाक्षिणात्य पद्धतीची, तर चार मंदिरे उत्तर भारतीय नागरशैलीतील आहेत. पापनाथ मंदिर, काडसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गळगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशीविश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वीरुपाक्षझा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, ही मंदिरे येथे आहेत. 

विरूपाक्ष मंदिर

विरूपाक्ष मंदिर :
हे मंदिर सर्वांत सुंदर समजले जाते. दाक्षिणात्य पद्धतीचे हे मंदिर कांचीच्या कैलासनाथ मंदिराप्रमाणे आहे. इ. स. ७३५मध्ये कांचीच्या पल्लवांच्या विरुद्ध झालेल्या लढाईतील विजयाच्या सन्मानार्थ विक्रमादित्य दुसरा याने हे मंदिर बांधले. विरूपाक्ष मंदिराचे तोंड पूर्वेकडे मलप्रभा नदीकडे आहे. मुखमंडपातील १८ खांबांमध्ये पुराणांमधील दृश्ये दर्शविली आहेत. रावणानुगृह मूर्ती, नरसिंह, गजेंद्रमोक्षम, शिवाची नृत्येदेखील त्यात आहेत. पंचतंत्रातील कथाही येथे दाखविल्या आहेत. 

विरूपाक्ष मंदिरातील नंदी

पापनाथ मंदिर :
विरूपाक्ष मंदिराच्या दक्षिणेस सुमारे अर्धा किलोमीटरवर हे मंदिर आहे. साधारण आठव्या शतकाच्या मध्यात हे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर द्रविड, नागारा शैलीसाठी प्रसिद्ध आहे. शैव व वैष्णव पंथांच्या देव-देवतांची शिल्पे यात कोरलेली आहेत. रामायण, किरातार्जुन कथा, तसेच मिथुनशिल्पेही येथे दिसून येतात.

काशी-विश्वनाथ मंदिर : हे मंदिर काशीविश्वेश्वर म्हणूनही ओळखले जाते. काशी-विश्वनाथ मंदिर पट्टदकलच्या लहान मंदिरांपैकी एक आहे. साधारण सातव्या शतकाच्या उत्तरार्धात याचे बांधकाम झाले असावे. 

संगमेश्वर मंदिर

संगमेश्वर मंदिर :
याला विजयेश्वर मंदिर असेही म्हणतात. चंद्रशेखर मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या या मंदिरात सातव्या आणि आठव्या शतकातील शिलालेख आहेत. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सदाशिव पाटील About 55 Days ago
परवाच विजापूर,बदामी,ऐहोले,हंपी,पट्टकल,बनशंकरी या स्थळांना भेटी देऊन आलो .अप्रतिम अप्रतिम, अप्रतिम
0
0
जयश्री चारेकर About 96 Days ago
सुंदर माहिती .परत एकदा सर्व या माहिती मुळे अनुभवले.🙏
1
0

Select Language
Share Link