मुंबई : आगामी ‘टोटल धमाल’ या विनोदी चित्रपटात धक धक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असून या चित्रपटाच्या कलाकारांसोबत तिने नुकतीच ‘कपील शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. या वेळी माधुरीने आपण सेलिब्रिटी झाल्याची जाणीव करून दिलेल्या चाहत्याची आठवण सांगितली. ही चाहत्यांबद्दलची पहिली आठवण असल्याचे तिने सांगितले.

‘कपिल शर्मा शो’मध्ये माधुरीला तिचे करिअर आणि त्याची सुरुवात याबद्दल बऱ्याच गोष्टी विचारल्या गेल्या त्यांची तिने दिलखुलास उत्तरे दिली. तिच्या चाहत्यांचा विषय निघाला आणि माधुरीने आपल्या चाहत्यांच्या पहिल्या आठवणीला उजाळा दिला. ‘‘तेजाब’ चित्रपट येण्यापूर्वी एका चित्रपटात मी आणि आणखी काही मुली डान्स मध्ये होतो. अर्थात तेव्हा मी तेवढी प्रसिद्ध नव्हते, म्हणून डान्समध्ये मला मागच्या रांगेत उभे केले जायचे. ‘तेजाब’ चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा मी भारतात नव्हते. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मी अमेरिकेत गेले होते. तिथून परत आल्यानंतर विमानतळावर गाडीतून जाताना काही मुले गाडीसमोर आली आणि माझी गाडी पुसायला लागली. त्यांना पाहून मी बाहेर आले. मला पाहताच त्यांच्यातल्या एकाने बाकी सगळ्यांना बोलवत सांगितले, ‘हे हिरोईन हिरोईन..’ त्यातल्याच एकाने परत आठवून दुसऱ्याला सांगितले, ‘ये मोहिनी है मोहिनी...’ आणि त्यांनी माझ्याकडे ऑटोग्राफ मागितला. मी ‘एम’ असा ऑटोग्राफ साईन करून दिला. तो पाहत समोरचा मुलगा दुसऱ्याला लगेच म्हणाला, ‘देखा मैने कहा था ना.. ये मोहिनी है.. एम साईन किया है...’, त्यांचे ते संभाषण ऐकून मला हसू आले. मी सेलिब्रिटी झाले आहे, याची जाणीव करून देणारा तो प्रसंग होता’, हे सांगत असताना ही आपली पहिली चाहत्याची आठवण असल्याचे माधुरीने सांगितले.