Next
मातरभाषा...... मैतरभाषा
BOI
Thursday, February 21, 2019 | 11:25 AM
15 0 0
Share this story

२१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. २१ फेब्रुवारी २०००पासून हा दिवस साजरा केला जातो. मातृभाषेची गोडी आणि महिमा काही औरच असतो. या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या अभ्यासक सुनीला गोंधळेकर यांचे विचार आणि कविता...
.........
जागतिकीकरणाची लाट पसरत असताना संस्कृती, रीतिरिवाज, सवयींची सरमिसळ होत आहे. आणि त्याबरोबरच अपरिहार्यपणे भाषांचीसुद्धा. माणूस आईच्या उदरातून जन्म घेतो आणि तिचा आवाज ऐकतच भाषेला सामोरा जातो. आई ही फक्त जन्मदात्री नसते, तर ती भाषादात्रीदेखील असते. बरे-वाईट, गोड-कडू, चांगले-वाईट कळते आणि सांगता येते ते मातृभाषेतून. जसजशी जगाची ओळख बदलते, वाढते, घडते तशी भाषा वापरण्याची तऱ्हा बदलते. शब्द बदलतात. आज तंत्रज्ञानाच्या काळात संपर्क करण्याच्या अनेक पद्धती सहज उपलब्ध असताना तर भाषांचा एकमेकांशी आदानप्रदानाचा वेग वाढणं साहजिकच. 

असा वेग वाढला आणि अनेक बोलीभाषा, अनेक समूहांच्या छोट्या भाषा लुप्त व्हायला लागल्या. पुढच्या पिढीला स्वतःची भाषा समजेनाशी, आवडेनाशी, रुचेनाशी झाली. त्यांनी आपली भाषा बोलणं, वाचणं हळूहळू सोडून दिलं. तर दुसरीकडे खेडोपाडी राहणाऱ्या अनेकांना जगाच्या भाषेची ओळखच नाही. त्यामुळे त्यांचं जग, त्यांचा संपर्क आकसत चालला आहे. ह्या दोन टोकांच्या भाषिक प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. जगात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. या भाषांमधले अनेकविध शब्द आणि अर्थ आपल्याला एकत्र जोडतात, घडवतात. त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस.

मातृभाषा टिकवण्याची गरज आज अधिक वाढती आहे. भाषिक विविधता वाढत असताना आपलं, मूळचं ते टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच ‘युनेस्को’ने ह्या दिवसाची सुरुवात केली. आज ह्या दिवसाच्या निमित्ताने आपल्या संपर्कातल्या लोकांना आपल्या भाषेतून काही तरी लिहून पाठवू. जुन्या म्हणी, जुने वाक्प्रचार असणारी आईची, आजीची भाषा परत ओठामध्ये रुळवू. 

मातरभाषा...... मैतरभाषा

माय तुझिया कुशीत जपली

गुजगोष्टीची खातरभाषा.....

ही माझी मैतरभाषाबोल बोबडे साद घालती

माझ्या हृदयी कातरभाषा...

ही माझी मैतरभाषाअजुनि आठवे पाटीवरची पांढररेषा

ओठी आणखी रुजत ग नाही दुसरी भाषा

ही तर माझी मैतरभाषाजिव्हेवरती विरघळलेली

सायस्वरांची साखरभाषा

ही तर माझी मैतरभाषा 

- सुनीला गोंधळेकर
ई-मेल : sunila.gondhalekar@gmail.com

(मराठी भाषेच्या विकासाच्या टप्प्यांचा आढावा घेणारा सुनीला गोंधळेकर यांचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link