Next
१०१ रुपयांच्या त्या ‘अनमोल’ भेटीने मुख्यमंत्री भारावले!
BOI
Wednesday, July 24, 2019 | 11:52 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होणे, ही दर वर्षीचीच गोष्ट; पण यंदाच्या वाढदिवशी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळालेल्या विशेष भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारावून गेले आहेत. ती भेट फक्त १०१ रुपयांची आहे; मात्र तिचे मूल्य अनमोल आहे.

राज्यातील अगदी शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असणे, हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य. याच शेवटच्या घटकाकडून मुख्यमंत्र्यांना एक वैशिष्ट्यपूर्ण भेट प्राप्त झाली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात आलेल्या मदतीमुळे कॅन्सरग्रस्त बालकाला जीवनदान मिळाल्याने मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या पालकांनी कृतज्ञभावनेने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १०१ रुपयांची मदत पाठविली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील कनकोरी (ता. गंगापूर) येथील वेदान्त भागवत पवार हा पाच वर्षांचा मुलगा पित्ताशयाच्या कर्करोगाने पीडित होता. वेदान्तचे वडील वाळूज औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात, तर आई शेतात मजुरी करते. अशा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलाच्या उपचाराचा खर्च पालकांना पेलवणे शक्य नव्हते. त्याच्या पालकांसह नातेवाईकांनी आपल्यापरीने मदत करून त्यावर उपचार सुरू केले; मात्र या उपचाराचा मोठा खर्च भागविणे अवघड होऊ लागले. 

पालकांची सारी पुंजी त्यासाठी खर्ची पडली. त्यामुळे पवार कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. या बालकाची आत्या श्रीमती रेणुका सुनील गोंधळी नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. नेवासा) येथे राहते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठविला. या संदेशाची दखल घेऊन या मुलावरील उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून तात्काळ एक लाख ९० हजार रुपयांची मदत करण्यात आली. या मदतीमुळे मुंबईतील एसआरसीसी चिल्ड्रन रुग्णालयात वेदान्तवर उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे त्याला नवजीवन मिळाले.

मुख्यमंत्र्यांच्या संवदेनशीलतेमुळे वेदान्तचे कुटुंबीय भारावून गेले. मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीमती रेणुका गोंधळी यांनी आपल्या मजुरीच्या पैशातील १०१ रुपये मनिऑर्डरने मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठविले. त्यासोबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊन म्हणतात... ‘आपण माझ्या मोबाइलवरील संदेशाची दखल घेऊन माझ्या भाच्याला जीवनदान दिले. अशीच सेवा आपल्या हातून इतर सामान्यांची घडो, यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या मजुरीतील अल्प स्वरूपातील रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी पाठवीत आहे. आपणास परमेश्वर मोठे आयुष्य देवो, या राष्ट्राची सेवा करण्याचे भाग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.’ (संपूर्ण पत्र बातमीच्या शेवटी दिले आहे.)

हे पत्र वाचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. जन्मदिनानिमित्त त्यांना समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या संख्येने शुभेच्छा प्राप्त झाल्या; मात्र ज्या घटकाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध असतात. त्याच शेवटच्या घटकाचा प्रतिनिधी असणाऱ्या एका सर्वसामान्य नागरिकाकडून शुभेच्छांसोबत प्राप्त झालेली ही छोटीशी, परंतु खूप मोलाची असणारी मदत आल्याचे पाहून मुख्यमंत्री सद्गदित झाले. 

मुख्यमंत्री सहायता निधीला १.७५ कोटी रुपयांची देणगी
‘आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या आवाहनाचा सन्मान राखून विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे एक कोटी ७५ लाख रुपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
नीता आंबेगावकर About 29 Days ago
खूप हृदयस्पर्शी ! देणारा आणि घेणारा दोघांनाही उदंड आयुष्य लाभो !
1
0
Dr. Muralidhar Prabhudesai About 29 Days ago
खूपच हृद्य आणि माणुसकीचे दर्शन देणारा प्रसंग..... दान देणारा आणि दान घेणारा दोघेही ग्रेट....
1
1
Madhavi sapre About 29 Days ago
Sarvani prerna gheoun ashi madat karavi. Jenekarun asha anekana jeevdan milel..
1
1

Select Language
Share Link
 
Search