Next
‘राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे’
डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, August 09, 2018 | 06:17 PM
15 0 0
Share this story

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ. श्रीपाल सबनीस, या वेळी किरण गित्ते व इतर मान्यवर.

पुणे : ‘राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. काही लोक भ्रष्टाचारी असू शकतात. मात्र, त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वानी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

विकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे व कमलाकांत वडेलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अभियंता मित्रच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते, संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ, मुख्य अभियंता प्रवीण किडे, ठाणे शहर अभियंता अनिल पाटील, लक्ष्मण व्हटकर, माजी सैनिकी अधिकारी विष्णुपंत पाटणकर, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलाकांत वडेलकर आदी उपस्थित होते  या वेळी विष्णुपंत पाटणकर लिखित ‘भारतीय युद्धकथा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘देशात राष्ट्रभक्ती अजून जिवंत आहे. अभियंत्यांच्या मनामध्ये ती अजूनही पाहायला मिळते. अभियंता मित्र मासिकामुळे अभियंत्यांमधील सर्जनशील लेखक, कवी घडविण्याचे काम झाले आहे. अभियंत्यांच्या कथा व व्यथा मांडण्यासाठी आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी वडेलकर अभियंता मित्रच्या माध्यमातून करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.’

किरण गित्ते म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकारी आणि अभियंता यांचा खूप जवळचा संबंध आहे. अभियंत्यांना तंत्र माहिती असते, तर अधिकाऱ्यांना लोकांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य माहित असते. तांत्रिक प्रश्न सामान्य भाषेत रूपांतरित करून सांगणे आवश्यक असते. अभियंत्यांनी पर्यावरणपूरक काम करण्यासह सामाजिक आर्थिक विकासाचे भान राखायला हवे;तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढवायला हवी.’

पंडित गाडगीळ, प्रवीण किडे, कमलाकांत वडेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वसंत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कदम यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link