Next
मुरुड येथे पद्मदुर्गपूजन सोहळा उत्साहात
हजारो शिवभक्तांची उपस्थिती
BOI
Wednesday, December 26, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this story

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करताना रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर.मुरुड : कोकण कडा मित्रमंडळ, पद्मदुर्ग जागर समिती आणि मुरुड-जंजिरा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्मदुर्ग किल्ल्यावर २५ डिसेंबर २०१८ रोजी पद्मदुर्ग जागर हा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात पार पडला.

या कार्यक्रमाला मुरुडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, आगरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, ‘कोकण कडा’चे अध्यक्ष सुरेश पवार, दीपक शिंदे, अशील ठाकूर, शेखरमामा फरमान, मनोज वगेर, अमृत पाटील, आबा नाईक, स्वप्नील जंगम, शाहीर वैभव घरत, नगरसेविका वंदना खोत, मुग्धा जोशी, नीलेश पोवळकर, रोहित पवार, संजय करडे, ओम जंगम यांसह कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी सात वाजल्यापासून मुरुड कोळीवाड्यातून पद्मदुर्गावर होडीतून जाण्यासाठी शिवभक्तांच्या मोठ्या रांगा मुरुड चौपाटीवर लागल्या होत्या. १५ ते २० मोठ्या लाँचच्या माध्यमातून हजारो नागरिक सकाळी ११ वाजेपर्यंत पद्मदुर्गावर दाखल झाले. शिवशाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक संभाजी महाराज आणि दर्यासारंग मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलतखान यांच्या शौर्याचे पोवाडा गाऊन वातावरण भारावून टाकले.

गडपूजनाचा सोहळा रायगडहून आलेले संत प्रकाश महाराज यांच्या पौरोहित्याखाली मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने खोल समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर शिवशाही अवतरली होती.

गडपूजन सोहळ्याला उपस्थित शिवभक्त

या प्रसंगी बोलताना रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे कीर म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांमुळे साडेतीनशे वर्षांनंतर ही आज आपल्याला सन्मान मिळतोय. महाराजांनी अठरापगड जातींच्या शिलेदारांवर विश्वास ठेऊन आरमाराची उभारणी केली. बौधकालीन लयास गेलेल्या आरमाराचे मायनाक भंडारी आणि दौलतखान यांच्या मदतीने आरमाराची पुनर्बांधणी केली; पण या दिक्षीमंत कर्तबगारीची दखल इतिहासकारांनी घेतली नाही. सिद्धीच्या अजिंक्य जंजिऱ्यावर चाचाल करून तो सर करण्याची रणनिती मायनाक भंडारी यांनी आखली होती. त्याप्रमाणे शिवरायांचे आरमार रात्रीच्या काळोखात नौकांमधून शिड्या लावून किल्ल्यात घुसून सिद्धीच्या सैन्यावर तुटून पडले आणि किल्ला ताब्यात घेण्याचा महापराक्रम करण्याच्या तयारीत होते; परंतु शेवटच्या क्षणी पुण्याहून शिवरायांच्या आदेश असतानाही रसद पुरविली गेली नाही अन्यथा जंजिऱ्यावर यशस्वी स्वारी झाली असती आणि देशाचा इतिहास बदलला गेला असता. १८ सप्टेंबर १६७८ रोजी खांदेरी उंदेरीच्या बेटांजवळ जगज्जेत्या ब्रिटीशांचा दारुण पराभव करणाऱ्या मायनाक भंडारी यांचे आपण सर्व वंशज आहोत. आपण इतिहास विसरता कामा नये.’

‘आज गड-किल्ल्यांची जी भग्न अवस्था झाली आहे ती या राज्यकर्त्यांमुळेच. महाराज स्वराज्य चालविताना रयतेचे कल्याणकारी कार्य करीत होते; परंतु आजचे हे सरकार रयतेचे कल्याण न करता स्व:ताच्या स्वार्थाचे राज्य करीत आहे. म्हणूनच आपण शिवशाही साकारण्यासाठी एक झालो पाहिजे आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचे कार्य करून घेतले पाहिजे,’ असे आवाहन कीर यांनी केले.

आगरी प्रबोधिनीचे अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘अतिशय देखणा असा हा सोहळा कोकण कडा मंडळाने आयोजित केला आहे. आगरी, कोळी, भंडारी यांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष देणारा हा कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम प्रत्येक गड-किल्ल्यांवर झाले पाहिजेत.’

कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शिवप्रेमींचे अध्यक्षा माई पाटील यांनी आभार मानले. शिवज्योत घेऊन आलेल्या मावळ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. पद्मदुर्गची मालकिण देवी कोटेश्वरीच्या मंदिरात महाराजांची पालखी नेऊन तेथे आरती करण्यात आली. प्रार्थना दापोलीच्या जंगम यांच्याकडून करण्यात आली. चार वाजता कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर सर्व नागरिकांना होड्यांच्या सहाय्याने मुरुड-जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर आणण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link