Next
मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...
BOI
Sunday, August 13, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

वैजयंतीमालानृत्यकुशल अभिनेत्री वैजयंतीमाला यांना आज, १३ ऑगस्ट रोजी ८१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांच्यावर चित्रित झालेले ‘मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...’ हे एक वेगळे गाणे...
.............
१३ ऑगस्ट! चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून हा एक सोन्याचा दिवस! कारण याच तारखेने चित्रपटसृष्टीला वेगवेगळ्या वर्षांत अनमोल हिरे-माणके दिलेली आहेत. निर्माते, दिग्दर्शक, लेखक आचार्य अत्रे याच तारखेला सन १८९८मध्ये जन्मले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला मराठी चित्रपटसृष्टीचा नायक आणि उत्कृष्ट चित्रकार गोपाळ तुकाराम मांडरे ऊर्फ ‘चंद्रकांत’ यांचा जन्म १३ ऑगस्ट रोजी १९१३मध्ये झाला होता. १९१३मध्ये याच तारखेला दिग्दर्शक वसंत पेंटर यांचाही जन्म झाला होता. निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक विश्राम बेडेकर यांची जन्मतारीख १३ ऑगस्ट १९०६ ही आहे. 

...आणि या सर्वांबरोबर अप्रतिम सौंदर्याने चित्रपटप्रेमींना ‘पागल’ करणाऱ्या वेगवेगळ्या पिढ्यांतील दोन सौंदर्यवती याच १३ ऑगस्टने आपणाला दिलेल्या आहेत. तिसरीही तारका याच तारखेला जन्मलेली आहे. मी तुम्हाला फारच कोड्यात टाकत आहे, असं तुम्हाला वाटण्याआधीच हे सांगतो, की १९३६ या वर्षात वैजयंतीमाला, १९५२ या वर्षात योगिताबाली आणि १९६३ या वर्षात श्रीदेवी या तिघींचा जन्मदिवस म्हणजे १३ ऑगस्ट होय! वैजयंतीमाला व श्रीदेवी यांचे चाहते अनेक आहेत; पण ते वेगवेगळ्या पिढीचे! वैजयंतीमालासारखी रूपवती झाली नाही व होणार नाही हे तिच्यावर फिदा झालेल्या चित्रपटप्रेमींचे मत. परंतु परमेश्वर प्रत्येक पिढीत सौंदर्यवती निर्माण करतच असतो, हे वास्तव दुर्लक्षून ‘वैजयंतीमाला काय मस्त दिसायची’ हे विधान करणाऱ्या ‘ज्येष्ठ’ चित्रपट चाहत्यांसाठी ‘आज’, ‘मधुमती,’ ‘बहार,’ ‘पटरानी,’ ‘नागीन’च्या गोष्टी!

गोल चेहरा, मोठ्ठे-मोठ्ठे डोळे, मंजुळ आवाज, साजेशी नासिका आणि आकर्षक देहयष्टी या संपन्न सौंदर्यखुणांसह १९५१च्या एव्हीएम चित्रपटसंस्थेच्या ‘बहार’ चित्रपटाद्वारे वैजयंतीमालाचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. तिचा पहिला नायक करण दिवाण होता. ती नृत्यात निपुण व अभिनयातही प्रभावी असल्याने म्हणता म्हणता तिने चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले. चित्रपटात तिच्या नृत्याच्या दृष्टिकोनातून खास प्रसंग लिहिले जाऊ लागले. ‘नई दिल्ली’मधील ‘तुम संग प्रीत लगायी रसिया’, तसेच ‘पटरानी’ चित्रपटातील ‘अरे कोई आओ रे’ या गीतांच्या वेळी तिने केलेल्या नृत्यांमुळे १९५१ ते १९६० या काळातील चित्रपट निर्माते तिच्या घरापुढे रांगा लावू लागले. 

त्या काळातील ‘दिलीप-राज-देव’ ही त्रिमूर्ती तिच्यामुळे संमोहित झाली. नागीन, कठपुतली, सितारोंसे आगे, देवदास, जिंदगी, सूरज, गंगा-जमुना अशा चित्रपटांमधून तिने साकार केलेल्या प्रेक्षकांना भावत होत्या. अंगभर साडी लपेटून, साजेशी केशरचना करून, दंड उघडे न टाकणारा ब्लाउज घालून तिने साकारलेल्या सोज्वळ नायिका पाहणे हा एक वेगळ्या नेत्रसुखाचा अनुभव होता. ते एक शालीन सौंदर्य होते. 

राजकुमारच्या मोहजालात फसून ती ‘बुढ्ढा मिल गया’ असे त्याला हिणवत उत्तान पोशाखात नाचली; पण नवऱ्यावर नितांत प्रेम करूनही तो संशय घेतो या विचाराने अस्वस्थ झालेल्या ‘राधा’ची भूमिकाही तिने तोलामोलाने साकार केली. राजेंद्रकुमारबरोबरचे तिचे चित्रपट, विशेषत: साथी, सूरज, आस का पंछी म्हणजे सुखद अनुभवाचे होते, तर ‘नजराना’मधील राज कपूरबरोबरची शोकांतिका चटका लावणारी उरली. ‘तेरे हुस्न की क्या तारीफ करू?’ असे ‘लीडर’मध्ये दिलीपकुमार तिला गाण्यातून विचारतो तेव्हा असे वाटते, की खरोखरच हे गाणे वैजयंतीमालासाठी लिहिले आहे. 

वैजयंतीमालातिच्या भूमिका, तिचे चित्रपट याबद्दल खूप काही सांगता येईल; पण तिचे वैशिष्ट्य हेच होते, की वाढत्या वयाचा विचार करून ती योग्य वेळी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडली. राजेंद्रकुमारबरोबरचा ‘गँवार’ हा तिचा शेवटचा चित्रपट! त्यानंतर १९७९-८०च्या सुमारास मनोजकुमारने ‘क्रांती’ चित्रपटासाठी तिला पाच लाखांची ऑफर दिली होती, तर गुलशन रॉयनी ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभच्या आईच्या भूमिकेसाठी कोरा चेक तिच्याकडे पाठवला होता. परंतु पुन्हा चित्रपटसृष्टीत न येण्याचा तिचा निश्चय डळमळीत झाला नाही. तो कायम राहिला. उर्वरित जीवनात ‘नृत्यशाळा’ हे तिचे विश्व बनले. आज ती वयाची ८१ वर्षे पूर्ण करत आहे. कौटुंबिक नातेसंबंधांत त्या ८१ वर्षांच्या आजी आहेत; पण चित्रपटप्रेमींच्या नजरेपुढे ती ‘सूरज’ची राजकुमारी अनुराधा आहे. 

‘सुंदर के खातिर आए तो मेरे खातिर चले जाओ’ असे राजेंद्रकुमारला सुनावणारी ‘संगम’मधील राधा डोळ्यांपुढून जात नाही. ‘मांग के साथ तुम्हारा’ गाणारी ‘नया दौर’मधील स्वच्छंदी प्रेयसी मनाला भुरळ घालते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिची एक वेगळी अदाकारी असलेले, नृत्य नसलेले एक मधुर गीत आपणापुढे ठेवतो.

१९५५ सालातील ‘यास्मिन’ हा ए. आर. कारदार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट तसा वेशभूषाप्रधान होता. अरेबियन कथानक, ओघानेच त्या अनुषंगाने संगीत! तसा हा चित्रपट फार यशस्वी ठरला व स्मरणीय होता असे नाही. या चित्रपटाचा नायक ‘सुरेश’ होता म्हणजे तोही आठवणीत राहावा असा नाही; पण हा चित्रपट दोन गोष्टींसाठी लक्षात राहतो तो म्हणजे याचे संगीत सी. रामचंद्र यांचे होते. ओघानेच १० गीतांत लता मंगेशकर यांचा स्वर्गीय स्वर! एके ठिकाणी तलत मेहमूद साथीला आणि तलतचे एक सोलो गीत! हर प्रकारचे संगीत देणारे सी. रामचंद्र येथे कथानकानुसार अरेबिक संगीताचा बाज गीतांना देतात. 

या चित्रपटाची दुसरी लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे नायिका वैजयंतीमाला! ऐन तारुण्यातील ही सुंदरी आणि प्रेमकथेतील तिच्या अभिनयाचा आविष्कार! जाननिसार अख्तर प्रेमानं दु:ख वाट्याला आलेल्या तरुणीच्या भावना व्यक्त करताना एक इशाराही देतात तो म्हणजे – 

कदम जो उठाना संभलकर उठाना

प्रीतीच्या राज्यात पहिले पाऊल टाकू इच्छिणाऱ्या प्रेमिकांनो, पुढील वाटचाल करताना जे पाऊल टाकाल, ते प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. कारण - 

है उल्फतमें बरबादियों के सिवा क्या?
मुहब्बत में सबकुछ लुटाके मिला क्या?
कही दिल की बातो में तुम भी न आना
 
या प्रेमामध्ये सर्व जीवन उद्ध्वस्त होण्याव्यतिरिक्त काय होते? (माझं हे सांगणं खोटं वाटत असेल तर माझी दु:खद प्रेमकहाणी ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की मी) प्रेमात माझे सर्वस्व उधळले; पण त्या बदल्यात मला काय मिळाले? (चार दिवस सुखाचे राहिलेच बाजूला) उलट फक्त दु:खच दु:ख मिळाले. प्रेमात सौख्य असतं. या असल्या गोड भूलथापांना भुलू नका.) या हृदयाच्या गोष्टीत अडकू नका. 

वफा की पशेमानीया कुछ न पूछो 
मेरे दिल की नादानिया कुछ न पूछो
कभी आपने कातिल को कातिल न माना

(मी त्यांच्यावर प्रेम केलं, निष्ठा ठेवली त्या) निष्ठेपायी मला किती पश्चात्ताप (पशेमानिया) करावा लागला ते विचारू नका. माझ्या हृदयाने केलेला नादानपणा विचारू नका. (ते पण आपल्यावर प्रेम करत आहेत या समजुतीने मी वागले. माझ्या त्या वागण्याला नादानपणाव्यतिरिक्त दुसरे काम नामाधिमान आहे?) (मी एका भ्रमात होते) त्यामुळे मी कधीही माझ्यावर हल्ला करणाऱ्याला, माझी हत्या करणाऱ्याला खुनी समजले नाही. (ही माझी फार मोठी चूक होती.)

फक्त दोन कडव्यांचे हे गीत; पण अत्यंत सूचक शब्दात व्यक्त केलेले दु:ख! त्या अनुषंगाने वैजयंतीमालाचा अभिनय! तिच्या अनेक चित्रपटांतील नृत्यगीते आपण बघतो, ऐकतो; पण हे एक वेगळे गीत तिच्यातील ‘अभिनेत्रीचे’ दर्शन घडवणारे! आणि स्वरसम्राज्ञींचा मधुर स्वर व सी. रामचंद्र यांचे संगीत यामुळे ‘सुनहरे’ बनलेले!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(‘सुनहरे गीत’ हे सदर दर रविवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search