Next
डॉ. वसंतराव पटवर्धनांचा ‘मसाप’तर्फे सत्कार
BOI
Monday, April 23 | 06:44 PM
15 0 0
Share this story

डॉ. वसंतराव पटवर्धन यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी (डावीकडून) सुधीर गाडगीळ, प्रकाश पायगुडे, ‘सिम्बायोसिस’चे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. वसंतराव पटवर्धन, सौ. पटवर्धन,  साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद ज

पुणे : ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष, अर्थतज्ज्ञ, उत्तम लेखक, कवी, संस्कृतचे गाढे अभ्यासक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. वसंतराव पटवर्धन मंगळवारी, २४ एप्रिल रोजी नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त शनिवारी, २१ एप्रिल रोजी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता पवार उपस्थित होत्या. ‘सिम्बायोसिस’चे अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. 

‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये क्लार्क म्हणून रुजू झाल्यापासून अध्यक्षपदाची सूत्रे घेईपर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक अनुभव, विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींच्या भेटीतून घेतलेली प्रेरणा, सतत नावीन्याच्या शोधात राहण्यासाठी लेखनातून मिळालेल्या ऊर्जेचे किस्से गप्पांमधून उलगडत गेले अन् नकळत नव्वद वर्षे वयाच्या डॉ. वसंतराव पटवर्धन या उत्साही तरुणाने उपस्थितांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक विचार दिला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुधीर गाडगीळ यांनी डॉ. पटवर्धन यांची मुलाखत घेतली. सहज-सोप्या गप्पांमधून, आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आलेल्या अनुभवांच्या कथनातून ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.

बँकेत रुजू झाल्यापासून ते तेथे राबविलेल्या विविध योजना, नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पटवर्धन यांनी दिली. बँकेच्या विस्तारीकरणादरम्यान माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांसह विविध राजकीय, उद्योजक मंडळींबरोबर आलेले अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत सांगितले. 

अर्थकारण, सामाजिक, ललित लेखनाचे दाखलेही त्यांनी दिले. बँकेतील जबाबदाऱ्या चोख पार पाडताना केलेली तारेवरची कसरत, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तडजोड न करण्याची वृत्ती, सतत नावीन्याच्या शोधात राहून जगणे अधिकाधिक परिपूर्ण करण्याची धडपड पटवर्धन यांच्या बोलण्यातून जाणवत होती. वयाच्या नव्वदीतही त्यांच्या बोलण्यातील उत्साहाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

मुजुमदार म्हणाले, ‘पटवर्धन केवळ बँकर नसून, ते उत्तम लघुकथालेखक, कवी, कादंबरीकार असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व आहे. आयुष्याला लांबीबरोबरच खोली असावी लागते. ही खोली पटवर्धन यांनी प्राप्त केली आहे.’ 

जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link