Next
‘लोकमान्यांनी स्वकर्तृत्वातून टिळक युग निर्माण केले..’
साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन
BOI
Thursday, August 01, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, यांनी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना लोकमान्यांचा पुतळा भेट दिला. प्रा. मिंलिद जोशी यांनी तो स्विकारला.

पुणे : ‘स्वातंत्र्याच्या चळवळीतील इतर नेते राजमान्य होते. मात्र टिळक हे लोकमान्य होते. टिळक फक्त राजकीय पुढारी नव्हते, तर लोकांचे सुख-दुःख समजून घेणारे नेते होते. त्यामुळे ते लोकांना आपले वाटले. त्यातून टिळक युग निर्माण झाले. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील युगप्रवर्तक नेते म्हणजे लोकमान्य’, अशा शब्दांत साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी लोकमान्यांचा गौरव केला.

लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र साहित्य परिषदेत ‘टिळक युग’ या विषयावर डॉ. मोरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिंलिद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर यांच्यासह सभागृहात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, ‘देशपातळीवरचे पहिले नेतृत्व म्हणून देशाने लोकमान्यांना स्विकारले. त्यांनी स्वातंत्र्य ही सामान्यांची चळवळ केली. त्यातून स्वातंत्र्याची ज्योत पेटली. टिळक कोणाचे शिष्य नव्हते. त्यांना कोणी गॉडफादरही नव्हता. त्यांना कोणीही घडविले नाही, त्यांच्या मागे कोणाचाही वरदहस्त नव्हता. ते स्वतः घडले, म्हणून टिळक युग आहे. स्वातंत्र्य लढ्याचे देशपातळीवरचे पहिले नेतृत्व टिळकांनी केले. म्हणून ब्रिटिश टिळकांना घाबरत होते. टिळक खऱ्या अर्थाने लोकांचे नेते होते. गांधीजींनी लोकमान्यांचे बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे विचार पुढे नेले. टिळकांनी जो मार्ग अवलंबला होता, तोच मार्ग एका अर्थाने गांधीजींनी पुढे स्वीकारला होता. केसरी आणि मराठा वृत्तपत्रे सुरू झाली. त्यातून लोकमान्यांनी जे विचार मांडले. ते देशहिताचे होते. स्वातंत्र्य लढ्याच्या मध्यभागी महाराष्ट्राला ठेवण्यासाठी टिळकांनी त्याग केला.’

डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘लोकमान्यांच्या प्रत्येक विचारामागे देश आणि लोकहित होते. बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षणाचा संपूर्ण आराखडा त्यांच्याकडे तयार होता. त्यांनी फक्त देशाचे नव्हे, तर मानवाचे स्वातंत्र्य मागितले होते. जन्मत: जे जे मिळायला हवे, ते मागितले होते. त्यामुळे त्यांच्या विचारात लोकशाहीचे बीज होते. काळ बदलला तरी लोकमान्यांचे विचार कालातीत वाटतात.’    

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘लोकमान्यांनी समाज आणि देशहिताची पत्रकारिता केली. त्यांचे विचार समाजाला नवी दृष्टी देणारे होते, म्हणूनच आजच्या तरूणाईत टिळक विचारांचे आकर्षण आहे. त्यांना मातृभाषेविषयी आस्था होती. त्यांनी भाषेविषयीही आग्रलेख लिहिले. कोसळणाऱ्या आभाळाला सावरणारा नरकेसरी असेच लोकमान्यांचे वर्णन करावे लागेल.’

दीपक करंदीकर यांनी सुत्रसंचालन केले, तर सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search