Next
रोपं वाटतोय रिक्षावाला...
BOI
Friday, July 28, 2017 | 06:21 PM
15 0 0
Share this article:

आज २८ जुलै, जागतिक निसर्गसंवर्धन दिन. त्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत अशा एका रिक्षावाल्याची गोष्ट, की ज्याने आपल्या छोट्याशा कृतीतून निसर्ग संवर्धनाला खूप मोठा हातभार लावला आहे. तो चक्क रोपांचे मोफत वाटप करतो आणि अशा प्रकारे त्याने आतापर्यंत आठ हजार रोपे वाटली आहेत. 
..............
समाजोपयोगी उपक्रम एखाद्याला करायचा असेल, तर फक्त इच्छाशक्ती हवी, मग तो उपक्रम प्रत्यक्षात येऊ शकतो, हे महेश शेवडे यांच्या उदाहरणाने ठळकपणे स्पष्ट होते. ४२ वर्षांचे महेश कोल्हापुरात रिक्षा चालवतात. फावल्या वेळेत ते रोपे तयार करतात. या रोपांचे ते मोफत वाटप करतात आणि ती लावण्याचे, त्यांची देखभाल करण्याचे आवाहनही करतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल आठ हजार रोपे मोफत वाटली आहेत. 

रस्त्याच्या आजूबाजूला कोठे, कसल्या बिया पडल्यात का, कचऱ्यात कोठे पिशव्या टाकून दिलेल्या आहेत का, याकडे महेश यांचे लक्ष असते. रिक्षा ठिकठिकाणी थांबवून ते झाडांखाली पडलेल्या बिया गोळा करतात. या बिया ते रुजत घालतात. पंधरा दिवसांत त्या अंकुरल्यावर माती भरलेल्या लहान पिशव्यांमध्ये ती रोपे हलविली जातात. अमित अलवणे हा कॉलेजला जाणारा युवक महेश यांना या कामी मदत करतो. बियांपासून रोपे तयार होईपर्यंत त्यांचे खत-पाणी पाहावे लागते. महेश ज्या स्टँडवर रिक्षा लावतात, तेथे त्यांचा हा उद्योग सतत सुरू असतो. परिसरातील मुलेही त्यांच्या या उपक्रमाकडे आकर्षित झाली. त्यांच्याशी गोड बोलून महेश यांनी त्यांनाही या कामासाठी प्रेरित केले. काजू, बदाम, सीताफळ, फणस, आंबा, लिंबू, पिंपळ, तुळस अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया गोळा करून ते त्यांची रोपे तयार करतात. गरजूंना ही रोपे महेश मोफत पुरवतात. ते सांगतात, ‘निसर्गाने आपल्याला बरेच काही दिले आहे. त्याची परतफेड म्हणून मी हे काम करतो. आधी मी दिलेल्या रोपांची नोंद ठेवत असे; पण आता मी तसे करणे थांबविले आहे.’ 

महेश शेवडे‘रोपे तयार करण्यासाठी पैसे लागत नाहीत. तुम्ही तुमचा काही वेळ दिलात, तर ती आपोआप तयार होतात. हा वेळ मात्र तुम्ही मनापासून आणि रोज द्यायला हवा,’ असे महेश स्वानुभवावरून सांगतात. महेश यांनी कोल्हापुरातील वालावलकर हायस्कूलला २०१० ते २०१२ दरम्यान अनेक रोपे दिली. याचबरोबर ते शहरातील अनेक शाळांना आणि सामाजिक संघटनांना मोफत रोपे देत असतात. कोल्हापूरच्या वन विभागालाही त्यांनी एप्रिल २०१७मध्ये ५०० रोपे दिली. रिक्षा स्टँडनजीकच्या रोपांची देखभाल महेश जातीनिशी करतात. 

महेश यांनी जागतिक तापमानवाढ हा विषय समजून घेतला आहे. ते म्हणतात, ‘पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यातून विनाशकारी संकट कोसळण्याआधीच प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने किमान चार झाडे लावली पाहिजेत आणि त्यांना दररोज पाणी दिले पाहिजे. ही झाडे घराच्या आसपास वा जेथे मोकळी जागा दिसेल तेथे लावावीत. जास्तीत जास्त झाडे लावली जावीत आणि त्यांची देखभाल केली जावी, हाच माझा उद्देश आहे.’ 

महेश गेली वीस वर्षे कोल्हापुरात ऑटो रिक्षा चालवतात. उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत असतानाच ते हा सामाजिक उपक्रम राबवतात. त्यासाठी ते वेगळा वेळ काढत नाहीत. निसर्गाच्या संवर्धनाचे काम किती सहजतेने करता येते याचे हे ठळक आणि प्रेरक उदाहरण आहे. 

(फोटो आणि माहिती स्रोत : https://goo.gl/T2uB6F)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search