Next
क्लासमेट्स झाले भाजीवाले...
शहापुरातील उच्चशिक्षित तरुणांनी थाटली भाजीची दुकाने
दत्तात्रय पाटील
Saturday, October 27, 2018 | 06:13 PM
15 0 0
Share this article:शहापूर :
नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याची, जोखीम पत्करण्याची मराठी तरुणांची मानसिकता नसायची. अलीकडे मात्र ही मानसिकता बदलू लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. वेगवेगळ्या कल्पना कोणतीही लाज न बाळगता अंमलात आणणारा तरुणवर्ग काही प्रमाणात का होईना, पण दिसू लागला आहे. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील क्लासमेट्स या ग्रुपमधील तरुण त्या मोजक्या लोकांपैकीच. ग्रामीण भागातील, परंतु उच्चशिक्षित असलेले हे तरुण आठवडी बाजारांमध्ये भाजीपाल्याची दुकाने थाटतात. बेरोजगारांसमोर त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

आपला देश तरुणांचा म्हणून नावारूपाला येत असला, तरी या तरुण वर्गाच्या नोकरीचा प्रश्न कायम आ वासून उभा असतो. अनेक उच्चशिक्षित तरुण आजही रोजगारासाठी वणवण भटकंती करताना दिसतात, तर काही उच्चशिक्षित तरुणांनी कोणतीही तमा न बाळगता छोटे-मोठे व्यवसाय थाटून बेरोजगारांसमोर आदर्श ठेवला आहे. हाच कित्ता गिरवत ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील या उच्चशिक्षित तरुणांनी कोणतीही लाज न बाळगता भाजीपाल्याचे दुकान थाटून नवे पाऊल टाकले आहे. ‘ताजी भाजी घ्यायला विसरू नका हां,’ अशी आरोळीही ते ठोकत आहेत. योगेश दवणे (सावरोली), अशोक गोडांबे (हेदवली), योगेश दळवी (अल्याणी), विशाल ठाकरे (वालशेत), मयूर तिवरे (साठगाव), हरेश निमसे (पडवळपाडा), वैभव धेंडे (धसई), अशरफ शेख (साकडबाव), सुभाष शिंदे (आवळपाडा) अशी या तरुणांची नावे आहेत. यांच्यापैकी काही जण बारावी, डीएड, बीए, एमएपर्यंत शिकलेले आहेत.

शहापूर तालुक्यात बुधवारी शेणवा, शुक्रवारी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रविवारी सापगाव व किन्हवली या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. सध्याच्या महागाईमुळे या आठवडा बाजारात खरेदीला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कारण तेथे तुलनेने स्वस्त माल उपलब्ध असतो. त्या-त्या परिसरातील नागरिकांना कमी दरात भाजीपाला, किराणा समान, घरात लागणाऱ्या सर्व वस्तू तेथे मिळतात. या आठवडा बाजाराच्या माध्यमातून व्यावसायिक होण्यासाठी या उच्चशिक्षित तरुणांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीचे दुकान थाटले आहे. हे तरुण भाजीवाले आवाज देऊन भाजीपाल्याला ग्राहकही मिळवतात. अन् हे सारे सहजतेने आणि निःसंकोचपणे करतात. त्यांना यत्किंचितही त्यांच्या व्यवसायाबद्दल खेद वाटत नाही. ही बाब यशस्वी व्यावसायिक होण्याची पहिले पाऊल आहे. हे सर्व तरुण तालुक्याच्या ग्रामीण भागातील असून, काही जण उच्चशिक्षित असून कंपनीत  नोकरीही करणारे आहेत. व्यवसायाचा अनुभव हवा, म्हणून ते या व्यवसायात उतरले आहेत.

या युवकांचा आदर्श मांडताना शहापुरातील कवी संजय गगे-खरीडकर यांनी आपल्या कवितेच्या भाषेत ‘अन हो मंडळी! येत्या रविवारी किन्हवलीच्या बाजारात क्लासमेट ताजी भाजीवाल्यांकडून भाजी घ्या/ला विसरू नका हां..!!’ असे आवाहनही केले आहे. सध्या अनेक ठिकाणी हा चर्चेचा विषय झाला आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Namdev farde About 325 Days ago
Mitrano tumcbya jivnat tumhi 100% success ahat. Yashviteche pahile paul takale tumhi barch kahi karta yeu 👍👍👍👍👍👍
1
0
संजय गगे खरीडकर About 327 Days ago
आपण घेतलेली दखल प्रेरणादायी..
3
0
Roshan About 330 Days ago
Nice
2
0

Select Language
Share Link
 
Search