Next
संमेलनात बरसल्या काव्यधारा!
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
BOI
Wednesday, September 26, 2018 | 12:21 PM
15 0 0
Share this article:

जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित काव्यसंमेलनात व्यासपीठावर सहभागी झालेल्या निमंत्रित कवींमध्ये डॉ. स्वप्नजा मोहिते, नितीन देशमुख, देविदास पाटील, रश्मी कशेळकर, जयश्री बर्वे.

रत्नागिरी :
मालवणी भाषेचं सौंदर्य दाखवणाऱ्या.. गावाकडच्या आठवणी जागवणाऱ्या.. शाहिरीतून प्रबोधन करणाऱ्या.. नांदीतून विनाशकारी विकासाचं वास्तव मांडणाऱ्या.. संस्कृत.. विनोदी अशा विविध प्रकारच्या कवितांच्या सादरीकरणाने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाचे काव्यसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. निमंत्रितांसह सहभागी कवींनी या संमेलनाला स्वरचित कवितांचा साज चढविला.

जनसेवा ग्रंथालयाच्या ३४व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रंथालयातर्फे काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला निमंत्रित कवी म्हणून देविदास पाटील, वैशाली हळबे, जयश्री बर्वे, रश्मी कशेळकर, डॉ. स्वप्नजा मोहिते, नितीन देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘जनसेवा’च्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाची जनसेवा समितीकडून झालेली स्थापना आणि आजपर्यंत चालू असलेली वाटचाल, विविध उपक्रम-कार्यक्रम यांचा आढावा कार्यकारिणी सदस्य अमोल पालये यांनी घेतला. अध्यक्षस्थान देविदास पाटील यांनी भूषविले.

काव्यसंमेलनाची सुरुवात कवयित्री जयश्री बर्वे यांच्या ‘नांदी’ या कवितेने झाली. कोकणात येणारे विनाशकारी प्रकल्प आणि त्यातून निसर्गाची होत असलेली हानी या कवितेत त्यांनी जिवंतपणे मांडली. 

शोषून घेतलं तुडुंब तळ्यांना... 
अन् जमिनीखालच्या निवांत झऱ्यांना..
खूप मागं हटवलं अथांग सागराला..
झुळझुळ वाहणाऱ्या नद्यांना वळवलं..अडवलं..
काँक्रिटच्या महाकाय बंधाऱ्यात बंदिस्त केलं..
वेठीला धरलं पंचतत्त्वांना..
अन् फिरवित राहिलो सृष्टीचक्र आमच्या मर्जीनुसार.. 

ललित लेखिका रश्मी कशेळकर यांनी चिंतन करायला लावणारी ‘कोकणचो आंबेवालो’ ही मालवणी कविता सादर केली.
 
आतासो सांज-सकाली कलमातच असता..
पालेली कलमा बगून डोकीक हात लावता..
गुदस्ता आंबो बरो व्हतो, या बोलाची सोय नाय..
दरवरसा ताच म्हनी, सरकार पाटीशी नाय..
खताची झाली माती, नी फवारनीचा पानी..
खयसून फेडू करजं? नी यजा लोकाची देनी..?

यानंतर कवयित्री वैशाली हळबे यांनी दोन मजेशीर कविता सादर केल्या. यातील ‘बायोडाटा’ या कवितेतून त्यांनी आपली वेगळी ओळख सर्वांसमोर मांडली. 

मेंदूचा करीत आटापिटा.. 
लिहिला मी बायोडाटा..
पण त्यात काय लिहावं, 
हा प्रश्न पडला मोठा..
जशी सर्व स्त्रियांची.. 
तशीच माझी स्त्री जन्माची कहाणी..
मी आपली ठरलेय वासरात लंगडी गाय शहाणी!

‘सौंदर्यस्पर्धा आणि मी’ या कवितेत त्यांनी विनोदी पद्धतीने, ऐंशी वर्षांच्या सौंदर्यवतीचे मनोगत मांडले.

सतराव्या वर्षी सौंदर्यस्पर्धेत सहभागी मी झाले..
केवढे हे धाडस..? काही लोक हळूच म्हणाले!
चेहऱ्यावर हास्य ठेवून मी छान कॅटवॉक केले..
सर्वांचे लक्ष माझ्यावर खिळले, असे आपले मला वाटले!

कवी नितीन देशमुख यांनी ‘श्रावण’ व गावाकडच्या आठवणी जागविणाऱ्या सुरेख कविता गीतबद्ध सादर केल्या. त्यांची ‘श्रावण येतो आहे..’ ही कविता - 

करीत सुस्मित ठुमकत नाचत.. 
श्रावण येतो आहे..
सरसर सरींच्या संगे वेडा उन्हात भिजतो आहे..
नाचत श्रावण येतो आहे..

डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सीता आणि द्रौपदी या दोन स्त्रियांच्या माध्यमातून स्त्री प्रतिमा कवितेतून रेखाटली. त्यांची कविता शेवटी म्हणते -

अन्यायाला वाचा फोडण्या
सोडा मौन सीतेचे
संसाराच्या पलीकडे
अस्तित्व जपा द्रौपदीचे

डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी ‘तू पावसात जाऊ नकोस..’ ही आणि अध्यक्ष देविदास पाटील यांनीही आपल्या कविता सादर केल्या. या निमंत्रित कवींबरोबरच ठिकठिकाणांहून अनेक कवी या काव्यसंमेलनात सहभागी झाले होते. 

यामध्ये शरद बागवे यांनी ‘मी मराठी.. महाराष्ट्र माझा..’, डॉ. अमेय गोखले यांनी ‘नाते’, भाग्यश्री संसारे यांनी ‘आई’, संपत पाटील यांनी ‘लगीन झाल्यावर..’, देवानंद पाटील यांनी ‘अनिष्ट प्रथा’, भरत इदाते यांनी ‘कोकण आमुचे आहेच छान’, जुई दाबके यांनी ‘असा हा पाऊस’, अंजली पिळणकर यांनी ‘बरस रे मेघा’, रवींद्र मेहेंदळे यांनी ‘श्रावणधारा’, हृषीकेश मेहेंदळे यांनी ‘हल्ली म्हणे भारतात..’ निपुण लांजेकर यांनी ‘एकदा भेटला तरस’ या कविता सादर केल्या. काव्यसंमेलनात सहभागी कवींना प्रशस्तिपत्र आणि निमंत्रित कवींना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात डॉ. प्रा. चित्रा गोस्वामी यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांची भेट ग्रंथालयाला दिली. या कार्यक्रमाला जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्षा सुमित्रा बोडस, कार्यवाह राहुल कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य, वाचक, सभासद, हितचिंतक, कर्मचारी, रसिक उपस्थित होते.

काव्यसंमेलनाला उपस्थित काव्यरसिक, ‘जनसेवा’चे पदाधिकारी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
amol palye About 264 Days ago
सुरेख! धन्यवाद!!
0
0

Select Language
Share Link
 
Search