Next
‘मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून मतदान प्रक्रिया पार पाडा’
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या सूचना
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्‍या.  

पुणे जिल्ह्यातील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. दोन सत्रांत झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक हरी किशोर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हाधिकारी समीक्षा चंद्राकार आदी उपस्थित होते.

‘यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या अडचणी आल्या होत्या, त्याचा अभ्यास करून त्याबाबत खबरदारी घेण्यात यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणूकविषयी लागणारे आवश्यक साहित्य तपासून वेळेवर ताब्यात घेऊन त्याचा अहवाल तात्काळ द्यावा. नियोजित वेळेतच आपापल्‍या मतदान केंद्रांवर पोहोचावे. मतदानस्थळावर पोहोचताना काही अडचणी आल्यास तात्काळ संबधित अधिकाऱ्यांना संपर्क करावा. काही समस्या आल्यास त्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा,’ अशा सूचना देऊन डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या; तसेच मतदानपूर्व व प्रत्यक्ष मतदानादिवशी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘मतदानयंत्राबाबत काही अडचणी उद्भवल्यास संबधित तंत्रज्ञांची मदत घ्यावी व जे अहवाल तातडीने पाठविणे आवश्यक आहेत,  त्याबाबत वेळेवर काटेकोरपणे अंमलबजावणी करावी,’ असेही त्यांनी सांगितले.


‘क्षेत्रीय अधिकाऱ्याला स्वत:च्या कामाची जबाबदारी सांभाळून त्यांच्या सहाय्यकांना मदत करावी लागते. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, सर्व प्रकारचे अहवाल, प्रपत्रे विहीत वेळेत भरून त्याची माहिती तात्काळ देण्यात यावी. मतदारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,’ असे मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग यांनी सांगितले. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पुणे जिल्ह्यातील पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. उर्वरित मतदासंघामध्ये असेच नियोजनबद्ध काम होईल, असा विश्वास व्यक्त केला. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापरासंबंधी दिलेल्या प्रशिक्षणाची त्यांनी उजळणी घेतली. निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून मॉकपोलच्या दरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत चर्चा केली.

‘मतदान केंद्रांमध्ये गर्दी होऊ देऊ नये, केंद्रात मतदारांना मोबाइलचा वापर करू न देणे, उर्वरित कालावधीमध्ये मतदान स्लिपांचे वाटप करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपले लक्ष अजिबात विचलित होऊ न देता तांत्रिक बाबींसंदर्भात दिलेल्या प्रशिक्षणामधील सूचनांप्रमाणेच कार्यवाही करावी. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी पाठवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, ‘मतदानादिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील सर्व आस्थापना बंद राहतील याकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे; तसेच परिसरामध्ये खाजगी वाहने नेऊ देऊ नये. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या दंडात्मक कार्यवाहीच्‍या अधिकाराबाबत सजग राहून काही गोंधळाची परिस्थिती आल्यास नजीकच्या पोलीस अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा. यासाठी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिले जातील.’ 

या वेळी समन्वय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापरासंबंधीचे दृकश्राव्य माध्यमाद्वारे प्रशिक्षणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकाचे निरसन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search