Next
‘संत विचारांपासून दूर गेल्यानेच दुष्ट प्रवृत्ती वाढली’
पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे मत
BOI
Saturday, July 13, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this article:

‘घन अमृताचा’ कार्यक्रमादरम्यान पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ‘हेरीटेज क्लब’चे उद्घाटन केले. या वेळी (डावीकडून) डॉ. योगेश चांदोरकर, सावनी रवींद्र, पं. हृदयनाथ मंगेशकर व संतोष पोतदार.

पुणे : ‘संत कमी शब्दांत बरेच काही सांगून जातात. त्यांच्या साहित्याचा, वचनांचा आणि विचारांचा प्रभाव खूप मोठा असतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांनी त्यांच्या विचारांनी बराच काळ माणसातील पशूप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत,’ असे मत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांवर आधारित गीतांचा ‘घन अमृताचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हेरीटेज द आर्ट लीगसी’ आयोजित व अनाहत निर्मित या कार्यक्रमात सावनी रवींद्र यांचे सुरेल सादरीकरण झाले, तर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी निरुपण करीत त्या गीतांच्या निर्मिती प्रक्रियेतील आठवणी सांगितल्या. विघ्नेश जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

या वेळी ‘हेरीटेज द आर्ट लीगसी’ या अकादमीद्वारे ‘हेरीटेज क्लब’चे उद्घाटन पं. मंगेशकर यांच्या हस्ते झाले. या वेळी क्लबचे संचालक डॉ. योगेश चांदोरकर उपस्थित होते. ‘देशाचा सांस्कृतिक वारसा जपत हा क्लब दर महिन्याला एक असे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे,’ असे क्लबचे संचालक संतोष पोतदार यांनी सांगितले.

सावनी रवींद्र
‘जय जय रामकृष्ण हरी... ‘म्हणत पखवाज, तबला, टाळ यांच्या निनादात आसमंतात भक्तीरस भरला आणि संत रचना, मन मोहून टाकणारी चाल व संगीत आणि त्याच्या निर्मितीतील आठवणी यांनी हा कार्यक्रम उत्तोरोत्तर रंगतच गेला. या वेळी सुंदर ते ध्यान.., मोगरा फुलला.., वृक्षवल्ली आम्हा सोयरे.., विश्वाचे आर्त.., घन वाजे घुणघुणा.., अवचित परिमळू... अशा अवीट गोडीच्या अनेक रचनांचे सादरीकरण झाले. सावनी रवींद्र यांचा मधाळ आवाज आणि सुरांचा साज याला रसिकांनी भरभरून दाद दिली. या वेळी प्रसन्न बाम (संवादिनी), नितीन शिंदे (तबला), नागेश भोसेकर (पखवाज), प्रतिक गुजर (तालवाद्य), मिहीर भडकमकर (कीबोर्ड), प्रशांत कांबळे (साउंड), दर्शन कुलकर्णी, इंजमाम बारगीर,  सुप्रिया स्वामी, सुवर्णा कोळी   (गायन) यांनी साथसंगत केली.

या रचनांविषयी आठवणी सांगताना पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले,  ‘संत ज्ञानेश्वरांच्या रचनेला चाल लावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा असतो, पण चाल लावताना मीटरमध्ये बसविण्यासाठी काही स्वातंत्र्य घ्यावे लागते. माझे मराठीचे ज्ञान जरा बरे असल्याने कोणता शब्द वगळल्याने अर्थ बदलणार नाही याचा विचार करून त्याला चाल लावली. यासाठी अनेक अभ्यासक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अर्थ समजून घेतला. मोगरा फुलला हे माझ्या आयुष्यातील उत्तम गाणं आहे;पण त्याला दुःखाची झालर आहे. संत ज्ञानेश्वरांच्या दु:खांच्या अनुभवातून हे गाणं आले असावे असे मला वाटते’. 

‘साहित्यावर अनेक आक्रमणे झालीत. त्यामुळे मूळ कोणते आणि अपभ्रंश झालेले कोणते हे सांगणे तसे कठीण आहे;पण संतांचे प्रत्येक वचन गहन असते. त्यावर शंका घेऊ नये. कारण त्यांच्यासारखे शब्दप्रभुत्व, भाषाप्रभुत्व नंतर क्वचितच कोणात आले असावे’, असेही ते म्हणाले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 37 Days ago
What was the world like Before this this group of Saints came into existance ?
0
0

Select Language
Share Link
 
Search