Next
सकारात्मकता : मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली
BOI
Saturday, August 11, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


शारीरिक आरोग्याबाबत जागरुक असणारे आपण आताशा मानसिक आरोग्याबाबतही काहीसे जागरुक होत आहोत. मानसिक आरोग्य हे तुमच्या मानसिकतेवर आणि एकूणच मनस्थितीवर अवलंबून असतं. जसं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचा असतो, तसं मानसिक स्वास्थासाठी काय महत्वाचं असतं? या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘सकारात्मक विचार’... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सकारात्मकतेबद्दल...
...................................
समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करताना लोकांकडून अनेकदा काही प्रश्न वारंवार विचारले जातात. त्यातलाच एक म्हणजे मानसिक आरोग्य सदृढ कसं ठेवायचं? निकोप मानसिक आरोग्य कसं मिळवायचं? जसं शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचा असतो, तसं मानसिक स्वास्थासाठी काय महत्वाचं असतं? या प्रश्नाचं उत्तर आहे, ‘सकारात्मक विचार’.

सकारात्मक विचार किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ही मानसिक आरोग्याची जणू गुरुकिल्ली आहे, असं म्हणता येईल. बघा ना, जेव्हा आपण अस्वस्थ असतो, दु:खी असतो, उदास असतो, ताण, चिडचिड अनुभवत असतो, तेव्हा आपले कोणते विचार कार्यरत असतात? आणि जेंव्हा आनंद, सुख, समाधान अनुभवत असतो, तेव्हा कोणते विचार असतात? आपण दिवसभर ज्या कृती करतो, भावना अनुभवतो त्या सगळ्याच्या मागे आपले विचार असतात. विचारांमुळेच प्रेरित होऊन आपण कृती किंवा काम करत असतो. त्यामुळे हे विचार जितके सकारात्मक तितक्या कृती आणि भावनाही सकारात्मकच असणार हे अगदी साधं समीकरण आहे. त्यामुळे तुम्हाला जर मानसिक आरोग्य सांभाळायचं असेल, आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर सकारात्मक विचार करायला शिका. हे सकारात्मक विचार आपल्याला काम करण्याची, ध्येय्य साध्य करण्यासाठी धडपडण्याची, कष्ट करण्याची आणि संकटातही खंबीरपणे, न डगमगता उभं राहण्याची प्रेरणा देतात. या सकारात्मक विचारांनाच बोली भाषेत 'इच्छाशक्ती' असं म्हंटल जातं आणि कितीही संकटं आली, तरी केवळ या इच्छाशक्तीच्या जोरावर त्या संकटांवर मात करून यश मिळवलेली अनेक माणसं आपण आजूबाजूला पाहतो. आपण त्यांच कौतुकसुद्धा करतो, पण ती इच्छाशक्ती स्वतःमध्ये रुजवायला मात्र विसरतो आणि मग छोट्या छोट्या अपयशांनी, अडचणींनी खचून जातो. नकारात्मक विचार आपलं मन झाकोळून टाकतात आणि परिणामी आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं.

जर आपले विचार सकारात्मक बनवायचे असतील, तर अगदी सोपा उपाय म्हणजे स्वतःच स्वतःशी होणार बोलणं ज्याला मानसशास्त्रीय भाषेत आत्मसंवाद किंवा सेल्फ टॉक म्हटलं जात, ते सकारात्मक, आशावादी ठेवा. मला हे येईल का? मला जमेल का? हे करायला मी असमर्थ आहे? असे विचार करण्यापेक्षा मी प्रयत्न करेन, मला जमेल. मी हे निश्चित शिकून घेईन, यातूनही काहीतरी चांगला मार्ग नक्की सापडेल. असे विचार करायला शिका. वाक्य नीट वाचली, तर आपल्या लक्षात येईल, की सकारात्मक वाक्य कृती करायला प्रेरणा देणारी आहेत. यातून कळत-नकळत तुमच्या मेंदूपर्यंत जाणारी प्रत्येक सूचना सकारात्मक आहे आणि त्यामुळे भावना आणि कृतीही सकारात्मकच.

अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केला, तर लक्षात येईल, की आध्यात्मही आपल्याला सकारात्मकता बाळगा, हाच संदेश देते. म्हणून तर असं म्हणतात ना, की ‘चांगल काम करा, चांगलचं फळ मिळेल’, ‘चित्त प्रसन्न ठेवा, यश आपोआप मिळेल’, ‘चांगला विचार करा, तुमच्या बाबतीत चांगलचं घडेल’. 

या साऱ्याचा मतितार्थ एवढाच की सद्विचार आणि सत्कर्म करा यश आपोआप मिळेल. म्हणजे सकारात्मक विचार आणि कृती. तुमच्यापैकी काही जणांनी ‘द सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं असेल. त्यात लेखक असं म्हणतात, की ‘तुम्हाला जे नको आहे त्याचा नाही, तर तुम्हाला जे हवं आहे त्याचा विचार करा. जे तुम्हाला हवंय ते तुमच्याकडे आत्ता आहे अशी कल्पना करत जगा म्हणजे ब्रम्हांड ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवते.’ म्हणजे मला आजारपण नको, असं म्हणण्यापेक्षा 'आजपासून माझं आरोग्य उत्तम राहणार आहे असं म्हणा आणि आरोग्य खरचं उत्तम राहील. ब्रम्हांड त्यासाठी कार्यशील होईल. याचाच अर्थ 'सकारात्मक विचार'. 

हे सकारात्मक विचार म्हणजे जादूची काठी आहे. या सकारात्मक विचारांवर म्हणजेच इच्छाशक्तीवरंच तर अनेक जण दुर्धर व्याधी, असाध्य रोग किंवा आयुष्यातल्या आडचणींवर मात करत आयुष्य जगतात आणि उत्तुंग यश मिळवतात. तर मग आता तुम्हीही सकारात्मक विचार करण्याचा निश्चय करा आणि ‘मला सुदृढ मानसिक आरोग्य लाभेलच आणि मी ते मिळवेनंच’, असं स्वतःला सांगा...

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link