Next
‘समाजाला निर्भय करण्यासाठी शिक्षक निश्चित मदत करतील’
ज्ञानेश पुरंदरे यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, August 18, 2018 | 03:15 PM
15 0 0
Share this story

'कुमार बिल्डर्स फाउंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्ह्ज'तर्फे शाळा आणि शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.या वेळी कृती जैन, ललितकुमार जैन, ज्ञानेश पुरंदरे, डॉ. प्रदीप आगाशे  आदि मान्यवर उपस्थित होते.

पुणे : ‘शिक्षक हे आपल्या सहवासातून विद्यार्थ्यांच्या ठायी धैर्य आणि निर्भयता निर्माण करत असतात. त्याप्रमाणे समाजालाही संकुचितता आणि भीतीच्या भावनेतून बाहेर काढण्यासाठी शिक्षक निश्चित मदत करू शकतील’, असे मत ‘स्वरूपवर्धिनी’चे कार्यवाह ज्ञानेश पुरंदरे यांनी व्यक्त केले.

केसरीमल जैन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कुमार बिल्डर्स फाउंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्ह्ज’तर्फे महाराष्ट्रातील आदर्श शाळा व शिक्षकांना पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रस्ता) येथील देवीदास झोगडे यांना या वेळी ‘उपक्रमशील शिक्षक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर ‘सत्त्वशील शिक्षक’ या पुरस्काराने मेरू विद्या मंदिर (वाघेश्वर) येथील वनिता बैताडे यांचा गौरव करण्यात आला. संगमनेरमधील एकलव्य सेवाभावी संस्थेचे ‘ज्ञानगंगा विद्यानिकेतन’ हे प्रथम क्रमांकाची आदर्श शाळा ठरले.

‘कुमार बिल्डर्स फाउंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्ह्ज’चे अध्यक्ष ललितकुमार जैन, कृती जैन, संस्थेच्या सर्वांगीण विकास योजनेचे परीक्षक डॉ. प्रदीप आगाशे, प्रभाकर कठाळे, योजनेच्या समन्वयक सोनिया मोडक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी विद्याकल्प ग्रामीण व आदिवासी सेवा समिती (पिंपळनेर) संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेस द्वितीय क्रमांकाचा, तर शिरवळ येथील 'ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालया'स तृतीय क्रमांकाचा आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरंदरे पुढे म्हणाले,‘आपल्या हाताखालून गेलेले विद्यार्थी देश, समाज व सृष्टीसाठी काही करत असतील, तर ती एका शिक्षकासाठी कृतार्थतेची भावना असते. शिक्षक विद्यार्थ्यांचा मित्र आणि मार्गदर्शक तर असतोच, परंतु तो विद्यार्थ्याची दुसरी आईच असतो. शिक्षकाच्या या भूमिकेची जाणीव आपण नेहमी मनात ठेवायला हवी.’

‘माझे मार्गदर्शक ठरलेले प्र. द. पुराणिक, पु. ग. वैद्य आणि जयंत कुमार त्रिभुवन हे खरोखरच आदर्श, उपक्रमशील आणि सत्त्वशील शिक्षक होते आणि त्यामुळेच त्यांच्या नावे दरवर्षी शाळा आणि शिक्षकांना हे पुरस्कार दिले जातात’, असे ललितकुमार जैन यांनी सांगितले. 

‘विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच उद्यमशीलतेची वृत्ती निर्माण करण्यसाठी कसे प्रयत्न करता येतील, याविषयी नजिकच्या भविष्यात काम करण्याची योजना आहे’, असेही ते म्हणाले.

आगाशे यांनी आदर्श शाळा व शिक्षकांची निवड करताना केल्या जाणाऱ्या परीक्षणाच्या पद्धतीविषयी; तसेच संस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.

‘उत्तम शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या वापराने आपल्या शिकवण्याचे व्हिडिओ तयार करून, इंटरनेटवर उपलब्ध करून दिल्यास खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी ते खूप फायदेशीर ठरेल’, असे मत कृती जैन यांनी व्यक्त केले. 

आदिती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.    
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link