Next
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड
विधानपरिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती
BOI
Monday, June 24, 2019 | 06:08 PM
15 0 0
Share this article:

डॉ. नीलम गोऱ्हेमुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.

काँग्रेस पक्षाने उपसभापतिपदावरील दावा सोडल्याने आणि आरपीआयचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे गोऱ्हे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होते. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसने या पदावर दावा केला होता. मात्र, राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून बाहेर पडल्याने त्यांच्या जागी काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केले. मात्र, उपसभापतिपदाचा दावा केल्यास विरोधी पक्षनेतेपद देणार नाही, असा पवित्रा शिवसेना-भाजप युतीने घेतल्याने काँग्रेसची कोंडी झाली. त्यामुळे नाईलाजाने काँग्रेसने उपसभापतिपदावरचा हक्क सोडला; तसेच आरपीआयचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे सोमवारी, २४ जून रोजी नीलम गोऱ्हे यांची या पदी बिनविरोध निवड झाली.  

विधान परिषदेच्या उपसभापतींची आणि विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीची घोषणा एकाच दिवशी करण्यात आली. विधानसभेत हरिभाऊ बागडे यांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसने वडेट्टीवार यांना पाठिंबा दिला. यानंतर थोड्याच वेळात विधान परिषदेमध्ये सभापती रामराजे निंबाळकर यांनी नीलम गोऱ्हे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३, शिवसेनेचे १२, लोकभारती, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रत्येकी एक तर, सहा अपक्ष आमदार आहेत. 

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या असून, शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. २००२पासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचे  प्रतिनिधित्व करत आहेत. आतापर्यंत तीन वेळा त्या विधान परिषदेवर निवडून गेल्या आहेत. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख असून, राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवत असतात. राज्य सरकारच्या विशेष हक्क समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. आता विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती बनण्याचा मान डॉ. गोऱ्हे यांना मिळाला आहे.  

डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपसभापती म्हणून निवड झाल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search