Next
‘तुम तो दिल के तार छेडकर...’
BOI
Sunday, May 20, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

तलत मेहमूदहिंदी चित्रपटसृष्टीत ज्याच्या आवाजातील गाण्यांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आजही आहे, असा गायक कलावंत म्हणजे तलत मेहमूद. नऊ मे रोजी त्यांचा स्मृतिदिन होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तलत मेहमूद यांच्या आवाजातील ‘तुम तो दिल के तार छेडकर...’ या गीताचा...
..............
रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणारा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम १९५२मध्ये सुरू झाला. त्यावरून १९५१ आणि १९५२ची लोकप्रिय गीते ऐकवली गेली. पुढे हा कार्यक्रम चालूच राहिला आणि त्यामध्ये पुढील काळात १९५३, १९५४, १९५५ची लोकप्रिय गीते ऐकवली गेली. बिनाकाच्या त्या सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांच्या काळात जी लोकप्रिय गीते ऐकवली गेली, त्यामध्ये पुरुष गायकांची गीते पाहिली, तर तलत मेहमूद या पार्श्वगायकाच्या गीतांची संख्या जास्त होती. 

पुढे मोहम्मद रफी, मुकेश, किशोर असे पार्श्वगायक लोकप्रिय झाले. तलत फिल्म इंडस्ट्रीच्या चलनी नाण्यात मागे पडला; पण तो रसिकांच्या स्मृतीत अग्रभागी राहिला. प्रथम त्याच्या रेकॉर्डस् (गैरफिल्मी गाण्यांच्याही), नंतर कॅसेट्स (यातही प्रकार, तलत इन ब्ल्यू मूड वगैरे वगैरे) आणि नंतर सीडी रसिकांच्या संग्रहात आवर्जून ठेवल्या गेल्या. त्याचे गायनाचे खासगी कार्यक्रम १९८० ते १९९०पर्यंत होत राहिले. त्याची ती जुन्या चित्रपटांतील गीते पुन्हा पुन्हा ऐकवण्यासाठी आग्रह होऊ लागले.

खरे तर त्या गीतांमध्ये काय होते? तलतच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचा आढावा घेतला, तर त्याने जी गीते गायली, त्यातील बरीच गीते दुःखी आशयाचीच आहेत. तो ‘पतिता’मधील गीतातून सांगून गेला आहे, की ‘है सबसे मधुर वो गीत जिसे हम दर्द के सुर में गाते है।’ आणि मग नंतर आपण त्याच्या अन्य गीतांकडे वळलो, तर ‘अश्कों में जो पाया है, वो गीतों में दिया है...’ असे गाऊन तो अंतःकरणाला हात घालतो. ‘जली तो शाख ए चमन बागबाँ भी जला’चा त्याचा विषाद मनात कालवाकालव करतो. ‘तेरी आँख के आँसू पी जाऊ...’मधील त्याची असहायता ही आपलीच असहायता वाटते. ‘ए मेरे दिल कहीं और चल...’ असे जरी तो म्हणाला असला, तरी ‘जाए तो जाए कहाँ...?’ हा सवाल सवालच राहतो... कारण ‘प्यार का जो दुख उठाया तेरा कोई दोष नहीं...’ असे सांगून ‘अपना जहाँ तो अपने हाथों बरबाद है...’ ही आत्मपरीक्षणातून दिलेली कबुली सुन्न करते. ‘दो-चार कदम जब मंझील थी किस्मतने ठोकर खायी है’ हे वास्तव टाळता येत नाही. ‘हम से आया न गया, उन से बुलाया न गया, प्यार का फासला दोनों से मिटाया न गया’ हे शल्य घेऊन आयुष्य जगायचे असते.

...आणि ही सारी दुःखे असह्य झाली, की त्या परमेश्वराला सांगायचे, की ‘जिंदगी देनेवाले सुन, तेरी दुनियासे दिल भर गया.’ म्हणूनच ‘अब यहाँ हमको जीना नहीं, जिंदगी अब तेरे जामसे एक कतरा भी पीना नहीं’ हीच अखेरची प्रार्थना, म्हणणे, मागणे, कबुली ठरते. तलतने ही अशी अनेक गीते गायली आणि ती ‘दर्दभरी’ असूनही रसिकांना आवडली. 

सैगलप्रमाणे गायक-नट होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून चित्रपटसृष्टीत आलेल्या तलतने ‘दिले नादान’, ‘वारिस’, ‘एक गाँव की कहानी’, ‘सोने की चिडिया’ अशा काही चित्रपटांतून नायक म्हणून कामे केली; पण ते चित्रपट फारसे चालले नाहीत. आपल्याला लोक नायक म्हणून पसंत करत नाहीत; पण आपल्या कातर, दर्दभऱ्या आवाजातील गीते लोकांना आवडतात, हे त्याने जाणले आणि मग तो पार्श्वगायक म्हणूनच वाटचाल करू लागला. 

ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांचा हा लाडका गायक! पण त्याच्या आवाजाला साजेशी गीते देऊन सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, सलील चौधरी अशा संगीतकारांनीही त्याला आपलेसे केले. त्याच्याकडून मधुर गीते गाऊन घेतली. त्यामध्ये ‘ये खुशीका समा’, ‘आज मेरा मन बिन बजाए’, ‘आ हा रिमझिम के ये प्यारे प्यारे’ यांसारखी आनंदाची गाणी होती. साहिर, शैलेंद्र, हसरत, शकील यांच्या दर्दभऱ्या काव्याला तलतच्या आवाजाने एका अशा उंचीवर नेले, की ती काव्ये रसिकांनी काळजात जपली. गझलगायनात पुरुष गायकांमध्ये तलतचे नाव अग्रभागीच राहील. 

...पण पुढे काळ बदलला. हिंदी चित्रपटातील हळुवार, भावुक गीतांचा जमाना हळूहळू संपुष्टात येऊ लागला आणि तलत मागे पडू लागला. १९६८च्या ‘आदमी’ चित्रपटातील गीत त्याच्याकडून गाऊन घेतले गेले आणि प्रत्यक्ष चित्रपटात ते त्याच्या स्वरांत नव्हतेच! १९७२च्या ‘शोर’ चित्रपटातील ‘एक प्यार का नगमा...’ हे गीत गायला मिळावे अशी त्याची खूप इच्छा होती; पण तो ते गीत मागायला गेला नाही. चित्रपटसृष्टीतील राजकारणाचे हे वर उल्लेखलेले डाव साध्या सरळ स्वभावाच्या तलतला आणखी मागे घेऊन गेले. अशा प्रसंगात कसे वागायचे, ते व्यवहारी, हिशोबी वागणे हा त्याचा स्वभाव नव्हता. 
काळ तर झपाट्याने पुढे जात होता. लोकांच्या आवडी-निवडी बदलत होत्या. १९८०, १९९० नंतरचे बदल तर आणखी वेगळे होते. शब्दाचे महत्त्व कमी होऊन वाद्यांचे महत्त्व वाढले होते. ‘दर्द’ हा ज्याच्या गाण्याचा आत्मा व कारुण्य हे ज्याच्या आवाजाचे मर्म, त्या तलतला या नव्या दुनियेत स्थान नव्हते. शरीरही थकत चालले होते. 

‘मेरा जीवन साथी बिछड गया, लो खत्म कहानी हो गयी’ असे त्याच्या चाहत्यांवर म्हणायची वेळ आली, ती तारीख होती नऊ मे १९९८. होय रसिकहो! हा मे महिना तलतच्या स्मृतिदिनाचा महिना. त्यामुळे त्याचे एक सुनहरे गीत आपण बघू या; पण येथे तलतचे दर्दभरे गीत न पाहता, एक छान, मधुर चालीचे कोणीही गुणगुणू शकेल, असे गीत आपण पाहणार आहोत.

असेच कोणी तरी आयुष्यात एखाद्या वळणावर भेटते. तो सुंदर चेहरा आपल्याला लुभावतो, आपल्या जवळ काही काळ थांबतो आणि नंतर निघून जातो. ‘तो’ चेहरा आपल्या आयुष्यात परत येईल का? परत भेटेल का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात. तेव्हा ‘त्या’ चेहऱ्याला काही सांगवेसे वाटते. मन गाऊ लागते...

तुम तो दिलके तार छेडकर हो गए बेखबर 
चाँद के तले जलेंगे हम ए सनम रातभर

माझ्या हृदयाच्या तारा छेडून तुम्ही निघून गेलात आणि आपली भेट झाली होती हेही विसरून गेलात (पण आम्ही नाही ना विसरलो) (तुम्हाला काय ठाऊक की) या चंद्राच्या शीतल प्रकाशात रात्रभर आम्ही तुमच्या विरहाग्नीत जळत राहणार आहोत.

ही अशी सुरुवात करून तो पुढे म्हणतो...

तुमको नींद आएगी तुम तो सो भी जाओगे
किसका ले लिया है दिल ये भी भूल जाओगे
ये तो कह दो एकबार ख्वाब में तो आओगे...

(आता) तुम्हाला झोप येईल व तुम्ही झोपूनही जाल (कारण तुमच्या लेखी आम्ही कोणीच नाही) आपण कोणाचे हृदय घेतले (चोरले) आहे, हेही विसरून जाल. (ठीक आहे, जा विसरून पण) एकदा तरी (तुमच्या) स्वप्नात येऊ, असे तरी सांगा.

तिला एवढे सांगून तिच्या प्रेमात पडलेला तो आपली अवस्था सांगताना म्हणतो...

अपनी एक और रात उलझनोमें जाएगी
शोख शोख वो अदा हमको याद आएगी
मस्त मस्त हर नजर दर्द बनके छाएगी...

(आजपर्यंत बऱ्याच रात्री मी तळमळत काढल्या तशीच) आमची आणखी एक रात्र (तुमच्याबद्दलच्या) समस्येत विचार करण्यात निघून जाईल. (पण तुम्हाला त्याचे काय म्हणा?) तुमचे ते चंचल हावभाव मला पुन्हा पुन्हा आठवत आहेत, आठवत राहतील आणि (तुमची प्राप्ती होणार नाही व तुम्ही पुन्हा भेटणार नाही म्हणून) तुमचे ते आकर्षक नेत्रकटाक्ष आता मात्र दु:ख बनून मला त्रस्त करतील.

आज सब्र का भी हाथ हमसे छूटने लगा
अब तो बात बात पर दिल भी रूठने लगा
क्या गजब है हर कोई हमको लुटने लगा...

(तुमची प्राप्ती होणार नाही या विचाराने) आज माझा धीर सुटत चालला आहे. प्रत्येक गोष्टीबाबत माझे मन खट्ट होत चालले आहे. (जेव्हा माझे हृदय तुम्ही चोरून नेले तेव्हापासून) काय आश्चर्य आहे बघा, प्रत्येकजण आम्हाला लुटू लागले आहे. 

१९६१च्या ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातील शैलेंद्र यांनी लिहिलेले हे गीत शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केले होते. हे गीत तलतने गायले होते व स्वतंत्र्यरीत्या लता मंगेशकर यांनीही गायिले होते. पडद्यावर सदाबहार देव आनंद व सुंदर वहिदा रेहमान!सारेच सुनहरे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search