Next
स्वच्छ शहर स्पर्धेत सावंतवाडी
BOI
Monday, November 06 | 05:33 PM
15 0 0
Share this story

सावंतवाडी : केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील स्वच्छ शहराची निवड करण्यात येत आहे. त्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यंदा स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत देशातील चार हजार ४१ शहरे असून त्यात सावंतवाडीचा समावेश आहे. त्यामुळे सावंतवाडी पालिकेने स्वच्छ शहर मानांकनात येण्यासाठी कंबर कसली असून शहरात स्वच्छतेची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी मंत्रालयाने स्वच्छ शहर मानांकनासाठी विविध निकष घालून दिले आहेत. त्यासाठी चार हजार गुण आहेत. चार हजारांपैकी जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या शहरांची निवड स्वच्छ शहरात करण्यात येणार आहे. दरम्यान, दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना १५  वर्षांपूर्वी राज्य शासनाच्या संत गाडगेमहाराज स्वच्छता अभियानात सावंतवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर हागणदारीमुक्ततेसाठी अलिकडेच शहराला ३० लाखांचे बक्षीस मिळाले होते.

या पार्श्वभूमीवर केंद्राकडून होणाऱ्या स्वच्छ शहर मानांकन स्पर्धेत सावंतवाडी शहराची निवड होते की नाही, याकडे शहरवासीयांचे लक्ष आहे. स्वच्छ शहर मानांकनात शहराची निवड झाल्यास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकीर्दीतील मोठे यश ठरणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष साळगावकर हेदेखील स्वच्छता मोहिमेत उतरले आहेत.

नागरी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाने शहर सर्वेक्षण २०१६मध्ये हाती घेतले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात येते. २०१६मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ७३ शहरांना स्वच्छ शहर म्हणून मानांकित करण्यात आले. २०१७मध्ये ४३४ शहरांना मानांकित करण्यात आले. यंदा चार हजार ४१ शहरे स्पर्धेत उतरली असून या शहरांतून गुणांनुसार स्वच्छ शहर म्हणून निवड करण्यात येणार आहेत.

प्लास्टिक बंदी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, नागरिकांचा सहभाग आणि निकषात उतरणाऱ्या शहरांची स्वच्छ शहर म्हणून निवड करण्यात येणार आहे. स्वच्छ शहर म्हणून निवड झाल्यानंतर अशा शहरांना विकासासाठी भरघोस निधीही मिळणार आहे.

सावंतवाडी शहर संस्थानकालीन आहे. पूर्वी सुंदरवाडी शहर म्हणून या शहराची ओळख होती. लाकडी खेळण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आता स्वच्छ शहर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उतरल्याने या शहराला नवी ओळख मिळणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय समिती येऊन शहराची पाहणी करणार आहे. स्पर्धेसाठी चार हजार गुण वेगवेगळय़ा निकषांना आहेत. या निकषात शहर उतरल्यास शहराची स्वच्छ शहर म्हणून निवड होऊ शकते. त्यामुळे पालिकेने स्वच्छतेची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. प्लास्टिक बंदी हा त्याचाच एक भाग आहे. आगामी काळात स्वच्छतेची मोहीम गतीने राबविण्यात येणार असून पालिकेचे कर्मचारीही त्यासाठी सज्ज झाले आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link