Next
‘सकारात्मकतेकडे पाहायला हवे’
प्रसन्न पेठे (Prasanna.Pethe@myvishwa.com)
Friday, January 26, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘माध्यमं आणि सोशल मीडियात नकारात्मकतेचं प्रमाण अधिक असलं, तरी आपल्याला भेटणारी बहुतांश माणसं आणि येणारे अनेक अनुभव सकारात्मकच असतात. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपण त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं,’ असं सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका, प्रवासवर्णनकार आणि स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासक शेफाली वैद्य यांना वाटतं. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर साधलेला हा संवाद...
.............
- थोडं तुमच्याविषयी सांगा...
- मी मूळची गोव्याची. पदवीपर्यंतचं शिक्षण गोव्यात झालं. त्यानंतर मग ‘मास कम्युनिकेशन’ कोर्ससाठी पुण्यात येणं झालं. मग मी मुंबईत टेलिव्हिजन प्रॉडक्शन क्षेत्रात होते. लग्नानंतर काही काळ आम्ही दिल्लीत राहिलो. पुन्हा मुंबईत आलो. मग अमेरिकेत राहणं झालं; पण दोघांनाही पुणं आवडत असल्यामुळे आता आम्ही पुण्यातच, पण थोडं शहराबाहेर राहतो. 

- तुम्ही वैविध्यपूर्ण लिहिता. याची सुरुवात कधी झाली? 
- मी कॉलेजवयापासूनच लिहीत होते. त्या वेळी साहित्य, नाटक अशा विषयांवर लिहिणं व्हायचं. त्यानंतर प्रवास आणि भटकंतीवर लिहीत गेले. राजकारणासंबंधी मतं जरूर होती; पण आधी लिहीत नव्हते. २०१२-१३ नंतर त्यावर लिहावंसं वाटायला लागलं आणि २०१४च्या निवडणुकीनंतर राजकारणावरसुद्धा लिहायला लागले. त्यात खूप भलेबुरे, प्रचंड मनःस्ताप देणारे अनुभव आले. अत्यंत वाईट आणि घाणेरड्या धमक्या वगैरेही; पण घरून चांगला सपोर्ट मिळाला. त्या तसल्या शब्दांची नांगी ठेचून लिहिण्याइतपत मानसिक आधार आणि धैर्य मिळालं आणि त्यामुळे त्यातून बाहेर येऊन लिहिणं सुरू ठेवलं. देशोदेशी खूप भटकंती झाली. 

- तुम्ही स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर लिहिता. त्याची आवड कधी निर्माण झाली? 
- आवड खूप पूर्वीपासूनच होती. त्यानंतर मी एक डिप्लोमा कोर्सही केला, त्यामुळे काय वाचावं, कुठे वाचावं, काय पाहावं ते समजत गेलं. सुदैवाने डॉ. गो. बं. देगलूरकर सरांसारखे तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाले. मला कर्नाटकातली होयसळ शैलीतली मंदिरं पहायला प्रचंड आवडतात. इतकी मनोहर शैली आणि इतकी बारीक बारीक कलाकुसर, नक्षीकाम कुठेच बघायला मिळत नाही. एकेका मूर्तीवरचं बारीक काम बघून भान हरपतं. हम्पी तर विलक्षणच. तो प्रदेश अस्वस्थ करतो. हम्पी उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सहा महिने चालू होते. हम्पी जळत होतं. सहा महिने मूर्ती भग्न होत होत्या, नष्ट केल्या जात होत्या आणि तरीही आज जे शिल्लक आहे, त्यावरून कल्पना येते की सहा महिने विध्वंस होण्याआधीचं वैभव किती देखणं असू शकेल? आणि मग या विचाराने खूप वाईट वाटतं. मला अशी आणखी काही मंदिरं म्हणजे चोल राजांची तंजावरची मंदिरं किंवा छत्तीसगडमधली मंदिरं बघायची इच्छा आहे. एक आश्चर्य वाटत राहतं, की त्या पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती, आजच्यासारखे फोन्स, ई-मेल्स नव्हते, तरी एकाच काळात निर्माण झालेल्या छत्तीसगड, ओडिशा आणि दक्षिण भारतातल्या इतक्या ठिकाणच्या मंदिरांमध्ये इतकी सुसूत्रता कशी? मंदिरात अमुक ठिकाणी अमुक गोष्ट असावी, हे सगळीकडे इतक्या अचूकपणे कसं केलं असावं? हे करणारे कुशल कारागीर कधी आणि कुठेकुठे जात असतील? बेलूरच्या मंदिरात एक खांब आहे आणि त्यावर छोटे छोटे सुमारे १६४ चौकोन आहेत. प्रत्येक चौकोनात एकेक अत्यंत सुबक कलाकुसर असलेली मूर्ती कोरलेली आहे. गंमत म्हणजे त्या इतक्या चौकोनांत फक्त एकच चौकोन त्या शिल्पकाराने मोकळा सोडलेला आहे, जणू त्याचं काम अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी भावी शिल्पकरांना केलेलं आवाहन (किंवा कदाचित दिलेलं आव्हानही!), की याहून अधिक सुंदर कोरीव काम त्या ठिकाणी करून दाखवावं. आणि त्यानंतरच्या इतक्या वर्षांत कोणीच तसा प्रयत्न केलेला दिसलेला नाही. म्हणजे त्या काळच्या शिल्पकारांचं काय कसब असेल! ...आणि पुढच्या मुसलमानी आक्रमक राजवटींना ती कला पुढे नेऊच द्यायची नसल्याने त्यांनी मूर्तिकारांची ती कला पद्धतशीरपणे नष्ट करत नेली. शिल्पकला, दगडांवरचं कोरीव काम हे कष्टाचं आहे आणि त्यात चूक सुधारायला अजिबात जागा नसते. चित्रकलेसारख्या इतर माध्यमांत ती मिळू शकते. १००-१५० टनी अवजड दगड चढवण्यासाठी जे रॅम्प्स तयार केले आहेत, तेसुद्धा किती सुंदर ग्रॅडिअंट ठेवून केले आहेत, की त्यावरून हत्तींना ते वाहून नेऊन चढणं-उतरणं सोपं व्हावं! तंजावूरजवळच्या एका गावातला रॅम्प तर १३ किलोमीटर लांबीचा होता असं म्हणतात! अद्भुत आहे हे सगळं! भैरप्पांच्या ‘सार्थ’मध्ये त्या तांड्याबरोबर उत्तरेकडे जाणाऱ्याला कायकाय दिसतं त्याचं सुंदर वर्णन आहे. देवळं नष्ट झालेली दिसतात... पण एक दिव्य दृष्टी असणारा साधू त्याला सांगतो, ‘हे थांबणार नाही, ते तोडतील भले, पण मंदिरं बांधण्याची प्रवृत्तीही चालूच राहणार आहे’... 

- सध्याची पिढी वाचत नाही, अशी ओरड होते. त्याविषयी काय सांगाल?
- मला वाटतं, नवीन पिढी वाचत नाही असं नाही. ती नक्कीच वाचते; पण कदाचित खूप खोलात जाऊन वाचण्याची प्रवृत्ती कदाचित कमी झालीय. आणि एकाच जागी बैठक मारून सलग तीन-चार तास जाडजूड पुस्तक वाचत बसण्याकडे कल नसतो. अगदी लहान वयातली मुलं कदाचित आईच्या मागे लागण्यामुळे वाचतात; पण पुढे टीनएजपासून ते तिशीपर्यंतच्या टप्प्यात सीरियस वाचणारे कमी दिसतात. त्यांना चटकन संपणारा व्हिडिओ हवा असतो. त्यांना खूप सलग असं काही नको असतं. म्हणून तर क्रिकेटसुद्धा ‘टी-ट्वेंटी’वर आलंय. पुढे तेसुद्धा ‘टी-टेन,’ ‘टी-फाइव्ह’वर येईल. या मोबाइल जनरेशनचा ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होत चाललाय. चाळिशीपुढचे लोक वाचताना दिसतात. पूर्वी लोकं आपणहून येऊन पुस्तकं वाचायची किंवा लिखाणापर्यंत पोहोचायची. आताच्या काळात लिखाण तुमच्यापर्यंत कुणी आणून पोहोचवलं तरच ते वाचलं जातं. 

- तुम्हाला या इतक्या प्रवासात कधी काही गूढ किंवा अद्भुत अनुभव आलेत? ‘देजा वू’सारखे किंवा ‘कार्मिक देणी’सारखे?
- हो. मी मागे माझ्या एका अनुभवाविषयी लिहिलंसुद्धा होतं. माझ्या कॉलेजवयात मी दादरहून नाशिकला निघाले असताना एका लाल गाठोडं घेऊन निघालेल्या अनोळखी बाईची सोबत मिळते काय, मूल-बाळ किंवा कुणीच नातेवाईक नसलेली ती बाई आपल्या पतीच्या अस्थिविसर्जनासाठी नाशिकला निघालेली असते काय, तिची एकटीची ती अवस्था पाहून मला अचानकच तिला सोबत करावीशी वाटते काय, मी नुसती नाशिकपर्यंतच न जाता तिच्याबरोबर थेट घाटावर जाते काय आणि अस्थिकलश उघडायच्या वेळी तिथल्या भटजींना मी तिचीच मुलगी वाटून ते मलाच त्या अस्थींवर पुढचे विधी करायला लावतात काय आणि ते सर्व मी करून शेवटी माझ्याच हस्ते त्या कलशातल्या अस्थी विसर्जित होतात काय... कुठली मी... कोण कुठची ती बाई... कोण कुठला तिचा मृत पती.. आणि माझ्या हस्ते त्याचं शेवटचं कर्म व्हावं? मागच्या कुठल्या जन्मातले कार्मिक बंध? का तिनेच म्हटल्यानुसार मी त्या माणसाची गेल्या जन्मात कुणी होते आणि देणं राहिलं होतं काही?... असे अनुभव येतात.. एकदा असा अनुभव आला एका गाण्याच्या बाबतीत. हिमालयात आम्ही फिरत असताना ‘ममता’मधलं ‘छुपा लो यू दिल मे प्यार तेरा’ हे गाणं माझ्या डोक्यात आलं. मी ते मनात गुणगुणत होते.. पण ओळी आठवत नव्हत्या. मोबाइलला रेंज नव्हती. त्यामुळे सर्फ करणं शक्य नव्हतं... आणि अचानक दूरवरून काही तरुण मुलं चालत येताना दिसली. त्यातल्या एकाच्या हातात ट्रान्झिस्टर होता आणि त्यात त्याने जे स्टेशन ट्यून केलं होतं त्यावर ‘तेच’ गाणं लागलं होतं!.. मी उडालेच. जगात इतकी हजारो गाणी असताना मला तेच एक गाणं गुणगुणावंसं वाटावं आणि ते काही काळाने अशा रीतीने माझ्यासमोर यावं?.... अशा अतर्क्य घटना घडतात खऱ्या. काही गूढ किंवा वेगळं मला स्पितीमध्येही अनुभवायला मिळालं. तेव्हा जन्म ते मृत्यूचं एक पूर्ण चक्र पाहिलं. आधी एका घरात मूल जन्मलं, तो बारशासारखा कार्यक्रम पाहिला, मग एक लग्नाचा सोहळा पाहिला आणि नंतर एक साधू वारला त्याची सर्व क्रियाकर्मं त्यांच्या घरात जाऊन पाहायला मिळाली होती. पारश्यांप्रमाणे त्यांच्यातही माणसाला जाळत किंवा पुरत नाहीत, तर गिधाडांना खायला देतात. पुढचे ४२ दिवस त्यांचं धार्मिक पठण किंवा त्यांचे जप म्हणणं चालू असतं. त्या जिवाला जणू ते सांगत असतात, की ‘तुझा देह आता मागे राहिलाय तू आता मोक्षाच्या मार्गावर आहेस... आता तुला दोन मार्ग दिसतील... एक मोक्षाकडे जाणारा आणि दुसरा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवणारा’...वगैरे... मग त्यांच्या देवतांची मिरवणूक असते... कुठलाही झरा किंवा झाडाच्या ठिकाणी ते प्रार्थना करतात. कारण ते मानतात, की पाण्याजवळ किंवा जुन्या झाडांजवळ ती पितरं किंवा रक्षक असतात म्हणून. राजस्थानमध्ये असं एक गाव आहे म्हणे, की त्या गावात चारशे वर्षांपूर्वीपासून एकही माणूस राहत नाही... गाव आहे तसंच आहे... घरंसुद्धा... फक्त गावकऱ्यांनी ते एका रात्रीत सोडल्यापासून तिथे कुणीच राहत नाही... बऱ्याच आख्यायिका आहेत... असे काही गूढ प्रदेश किंवा जागा आहेत भारतात...

- तुमच्या इतर खास आवडी? कविता वगैरे? 
-‘हजारो ख्वाहिशें ऐसी के...’ सारखं झालंय. गोवा साहित्य संमेलनात मी माझी कविता वाचली होती; पण कविता करणे हा माझा प्रांत नाहीच! मी फिरते खूप आणि पुस्तकंही वाचते. पूर्वी कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं केली होती. आता वेळच नाही. सध्या मंदिरांबद्दल खूप कुतूहल असल्यामुळे त्यात कुठे काय सापडेल ते शोधायला खूप आवडतं. सर्व राज्यांमध्ये मला फिरायचंय. 

- सकारात्मकतेबद्दल काय सांगाल?
मला असं वाटतं, की समाजात सकारात्मकता आहे. आपण घराबाहेर पडलो, की दिवसभरात आपल्याला भेटणारी माणसं आणि येणारे अनुभव बहुतांशी चांगलेच असतात. त्या ‘पॉझिटिव्हिटी’कडे आपण पाहिलं पाहिजे. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला हवे. मी मागे ‘चांगली माणसं’ नावाची एक लेखमाला लिहिली होती. मला माझ्या भटकंतीत भेटलेली चांगली माणसं, चांगल्या गोष्टी, माणसांमधला भावलेला चांगुलपणा यावर लिहिलं होतं... आता ते पुन्हा नव्याने चालू करणार आहे.

(समाजातल्या सकारात्मकतेबद्दल शेफाली वैद्य काय म्हणताहेत, ते पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search