Next
उपनिषदांचे अंतरंग (उत्तरार्ध)
BOI
Sunday, May 13, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘किमया’ सदराच्या गेल्या आठवड्यातील भागात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर यांनी पाच उपनिषदांची ओळख करून दिली. आजच्या लेखात आणखी काही उपनिषदांबद्दल...
...........
‘बृहदारण्यक’ आणि ‘छांदोग्य’ ही दोन खूपच मोठी आणि महत्त्वाची उपनिषदे आहेत. त्यांचा विचार स्वतंत्र लेखांद्वारे करणे आवश्यक आहे. बाकीच्या काही उपनिषदांबद्दल आता पाहू. 

मांडूक्य उपनिषद : हे अवघे १२ श्लोकांचे, अथर्ववेदातील उपनिषद आहे. ओंकाराविषयी सविस्तर ज्ञान देण्यासाठी त्याचे प्रयोजन आहे. अकार, उकार आणि मकार अशा ओंकाराच्या तीन मात्रा आहेत. विश्व, तेजस आणि प्राज्ञ हे आत्म्याचे तीन कल्पित पाद आहेत. विश्व शब्दादि विषयांचा, श्रोत्रादि इंद्रियांद्वारे भोग घेतो. तेजस सूक्ष्म विषयांचा भोग घेणारा आहे. प्राज्ञ आनंदाचा भोग घेतो. अशी ही तीन प्रकारची तृप्ती आहे. भोग घेणारा त्यामुळे लिप्त मात्र होत नाही. सृष्टीविषयी चिंतन करणारे, ईश्वराची विभूती-ऐश्वर्यविस्तार हीच सृष्टी आहे, असे म्हणतात. तुरीय आत्मा सर्व दु:खांच्या निवृत्तीचा प्रभू आहे. सर्व द्वैत हे मायामात्र आहे आणि अद्वैतच परमार्थ आहे. म्हणून ओंकाराची पादश: उपासना करावी. कारण आत्म्याचे जे पाद, त्याच ओंकाराच्या मात्रा आहेत. ओंकाराचे ब्रह्मबुद्धीने ध्यान करणारा कृतार्थ होतो. प्रणवामध्येच चित्त स्थिर करावे. प्रणव हे निर्भय ब्रह्म आहे. शोकनिवृत्ती हे ज्ञानाचे फल आहे. परमार्थतत्त्वाचे मनन करणारे मुनी होय. ‘अयमात्मा ब्रह्म’ हे अथर्ववेदाचे महावाक्य याच उपनिषदात आहे.

तैत्तिरीय उपनिषद : कृष्ण यजुर्वेदातील या उपनिषदात तीन अध्याय आहेत. शिक्षा, ब्रह्मवल्ली आणि भृगुवल्ली. प्रथमाध्यायात संहितेची निरनिराळ्या दृष्टीने उपासना सांगितली आहे. चित्ताची एकाग्रता हे उपासनेचे फल आहे. अध्यात्मदृष्टीने संहितेचे चिंतन केल्याने प्रजा, पशू, ब्रह्मवर्चस, अन्न, स्वर्गलोक इत्यादी फल मिळते. मंत्र, जप आणि होम यांच्या साधनेने धारणाशक्ती व वित्त यांची प्राप्ती होते. हृदयाकाश हे ब्रह्माच्या उपासनेचे आणि साक्षात्काराचे स्थान आहे. ब्रह्मसाक्षात्कार झालेला साक्षात ब्रह्म होतो. आत्म्यापासून आकाशादि-शरीरापर्यंतची सृष्टी उत्पन्न झाली. अन्नापासून सर्व शरीरे उत्पन्न होतात, अन्नानेच वाढतात आणि अन्नातच ती लीन होतात. अन्नमय आत्म्याच्या आत प्राणमय आत्मा आहे. त्याच्या आत मनोमय आत्मा आहे. त्याचा आंतरआत्मा विज्ञानमय आणि त्याच्याही आत आनंदमय आत्मा आहे. ब्रह्मानंद हा वर्णन करण्यापलीकडचा, उच्च कोटीचा आनंद आहे.

विद्वान (ज्ञानी) व्यक्ती पुण्य व पाप या दोन्ही गोष्टी आत्मरूप मानते. बुद्धी आत्म्यामध्ये स्थिर करून, दृढ बोधाने (जाणिवेने) ज्ञानी तुष्ट होतो. सर्वत्र आत्मदृष्टी ठेवतो आणि आपली सर्वात्मता मोठ्या आनंदाने गातो. अशा सर्वात्मदर्शी तृप्त पुरुषालाच जीवन्मुक्त म्हणतात. अन्न हे ब्रह्मज्ञानाचे द्वार आहे. त्यामुळे त्याची निंदा करू नये. अन्न, प्राण, मन, विज्ञान हे ब्रह्मच आहे. तथापि सर्व भूतांची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे निमित्त आनंद, त्याअर्थी आनंदच ब्रह्म आहे, असे साक्षात जाणावे.

ऐतरेय उपनिषद : ऋग्वेदाच्या अंतर्गत असलेले हे सहा खंडांचे उपनिषद आहे. पहिल्या पाच खंडांत ब्रह्मविद्या विशद केली असून, सहावा खंड शांतिरूप आहे. ऐतरेय ऋषींनी हे सांगितले. सृष्टीच्या पूर्वी एक नामरूपरहित आत्माच होता. सुषुप्ती (गाढ निद्रा) अवस्थेप्रमाणेच तो अद्वय - आत्मरूप आत्मा सृष्टीच्या पूर्वी होता. निद्रा जशी स्वप्नाला उत्पन्न करते, त्याप्रमाणे माया जगत्‌भ्रांतीला उत्पन्न करते. त्या मायेला स्वतंत्र सत्ता नाही. आत्मा मायावृत्तीने सर्व सृष्टी आणि तिच्या पालकांना (देवादिकांसह) उत्पन्न करतो.

जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था म्हणजे स्वप्नेच आहेत. मूर्धाप्रदेशातून (डोक्यावरील टाळू) परमात्मा देहात जीवरूपाने प्राप्त होऊन स्वरूपानंदाचा अनुभव घेतो. मायेच्या स्वाभाविक मोहशक्तीमुळे ईश्वर (परमात्मा), स्वरूपाला विसरून जीव झाला आणि जन्म-मरण सुख-दु:ख प्राप्तिरुप संसाराचा अनुभव घेऊ लागला. अनेक जन्मांमध्ये आचरलेल्या पुण्यकर्माने, निष्काम कर्म-उपासना यांच्या योगाने त्याच्या मनात ‘मी कोण?’ हे जाणण्याची इच्छा निर्माण होते. विचारांच्या द्वारे, गुरूच्या उपदेशाने तो आत्म्याला-स्वरूपाला सर्वव्यापक ब्रह्म म्हणून जाणतो.

ज्याच्या योगाने पुरुष पाहतो, ऐकतो, वास घेतो, इत्यादी ते सर्व हृदय-मन आहे. संज्ञान, विज्ञान, आज्ञान इत्यादी सर्व त्याच्या वृत्ती आहेत. ती सर्व ज्ञात्या आत्म्याची करणे- ज्ञान/क्रिया साधने आहेत. त्या सर्वांमध्ये चैतन्य उपलब्ध होते. ते प्रत्येक कारणात निरनिराळे भासत असले, तरी सर्वत्र एकच आहे. चैतन्यालाच प्रज्ञान म्हणतात. अहंकार, मन, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व प्राण अर्थात लिंगशरीर आणि ‘अन्नमय’ नावाचे स्थूल शरीर या त्याच्या उपाधी आहेत. सर्व स्थावर-जंगम हेच जगत् आहे. त्याचे प्रेरक, प्रज्ञान (चैतन्य) आहे. सृष्टीच्या पूर्वी जे शुद्ध प्रज्ञान होते, त्यातच मायेने उत्पन्न केलेले सर्व जगत् प्रतिष्ठित आहे. जे सर्वांचे अधिष्ठान शुद्ध अद्वय चैतन्य, तेच परमात्मस्वरूप आहे. जे आत्मस्वरूप प्रज्ञान तेच ब्रह्म आहे. प्रज्ञान ब्रह्म आहे. (महावाक्य-प्रज्ञानं ब्रह्म), असे जाणून सदा प्रज्ञारूप व्हावे, म्हणजे कोणीही मुक्त होतो. तो पुन्हा जन्म घेत नाही.

श्वेताश्वतर उपनिषद : हे कृष्णयजुर्वेदातील सहा अध्यायांचे मंत्रमय उपनिषद आहे. यात ऋषींना ध्यानयोगाच्या द्वारे जगत्कारणाचे (उत्पत्ती, स्थिती, जीवन, लय, काल, स्वभाव, नियती इत्यादी) ज्ञान झाले. स्वयंप्रकाश आत्म्याची स्वगुणांनी झाकलेली शक्ती हेच ते जगत्कारण. कालादि सर्व कारणांचा अधिष्ठाता परमात्माच आहे. जिवावर अनुग्रह करणारे ब्रह्म, जीव-ईश्वराचे ऐक्य आणि त्याच्या ज्ञानानेच मोक्ष, हेच जाणणे. सत्य, तप, ध्यान या उपायांनी सर्वव्यापी व सर्वकारण आत्म्याचे शरीरातील बुद्धीतच ज्ञान होते.

इंद्रियांचा निग्रह करून, प्रणव-उपासना नौकेने ध्यान केले पाहिजे. त्यानेच परमार्थ साधतो. ब्रह्म हेच सर्व देवांची निर्मिती करते (कारण). जो सर्वसंकल्पशून्य आत्म्याला ‘हा मी’ असे साक्षात जाणतो, तो सर्व शोकरहित होतो. ‘त्याच्या’ प्रसादानेच तादात्म्यज्ञान होते. तो (ईश्वर अर्थात परब्रह्म) देव, लोक, द्विपद, चतुष्पाद इत्यादी सर्वांचे नियमन करतो. सर्वश्रेष्ठ अनंत ब्रह्मामध्ये दोन अक्षरे स्थित आहेत. एक कारणीभूत अक्षर आणि दुसरे शब्दरूप अक्षर. त्यात अविद्या आणि विद्या गुप्तपणे राहतात. विनाश पावणारे कार्य हे अविद्या आणि मोक्षसाधन ज्ञान ही विद्या. विद्या शाब्द-अक्षरामध्ये आहे.

यदृच्छा, पंचभूते, प्रधान हे सर्व मायेपासून होणारे मायाकार्य आहे. माया जन्मरहित (अजा) आहे, म्हणून तिलाच मूलकारणत्व आहे. कालादिकांना अवांतर कारणत्व असते. प्रधान, पुण्यपाप, सत्त्वादि तीन गुण, भूमि आदी आठ प्रकृती (अष्टधाप्रवृत्ती) यांपासून शरीर निर्माण होते. भूतादि तीन कालांच्या पलीकडे असलेला जो मायावी महेश्वर, तो त्या शरीराचे मूळ अधिष्ठान आहे. त्याला शरीर व इंद्रिये नाहीत. तो सर्वांचा कर्ता आणि कारण आहे. तो इंद्रियांचा स्वामी आणि सर्व जिवांचा पालक आहे; मात्र त्याचा स्वामी कोणी नाही. त्याच्या ज्ञानावाचून दुसऱ्या शेकडो साधनांनीही मुक्ती नाही. वेदान्तामधील हे परम गुह्य अधिकार नसलेल्यांना सांगू नये, योग्य बुद्धिमान शिष्यालाच सांगावे.

जाबालोपनिषद : हे अथर्ववेदातील छोटे उपनिषद आहे. त्यात सहा लहान खंड (श्लोकसमूह) आहेत. मुक्तीची इच्छा असणाऱ्याने कोणत्याही स्थानी ईश्वराचे (ब्रह्माचे) चिंतन करावे. अधिकारी साधकाचे प्राण शरीर सोडून जाऊ लागले, तर रुद्र त्याला तारक ब्रह्माचा उपदेश करतो. त्यामुळे तो जन्ममरणातून सुटतो आणि मुक्त होतो. रुद्राध्यायाच्या जपाने मोक्ष मिळतो. त्यातील रुद्राची नावे ही अमृताचीच (मोक्षाची) नावे आहेत. त्यांच्या जपाने मुमुक्षू मुक्त होतो.

याज्ञवल्क्य जनक राजाला सांगतात : ‘ब्रह्मचर्य संपवून कर्मांच्या अनुष्ठानाची इच्छा असल्यास गृहस्थ व्हावे किंवा मरेपर्यंत नैष्ठिक ब्रह्मचरीच राहावे. गृहस्थाश्रमाविषयी अरुची निर्माण झाल्यास वानप्रस्थ (वनात जाणे) स्वीकारावा. पुढे त्याचीही विरक्ती आल्यास संन्यास हा चतुर्थाश्रम स्वीकारावा. गृहस्थादि इतर आश्रमांची इच्छा नसल्यास ब्रह्मचर्यापासूनच संन्यास घ्यावा. ज्या दिवशी खरे वैराग्य येईल, त्याच दिवशी संन्यास घ्यावा. आत्मा हेच संन्याशाचे यज्ञोपवीत (जानवे) आहे. संन्यास-आश्रमाची योग्यता, परमहंसाचे सर्वोत्तम धर्म (आचरण) आणि त्याला याच जन्मात प्राप्त होणारे जीवन्मुक्तिरूप फल यांचे या उपनिषदात वर्णन आहे.

याप्रमाणे एकूण १० उपनिषदांचे अंतरंग आपण पाहिले. ‘मी कोण?’, ‘कुठून आलो आणि कुठे जाणार आहे?’ ‘ब्रह्मविद्या अर्थात मोक्षप्राप्तीचे ज्ञान - जन्ममरणापासून मुक्ती, हेच विषय निरनिराळ्या उपनिषदांमधून ऋषींनी समजावून सांगितलेले आहेत. कोणत्याही मार्गाने शेवटी त्याच ‘मुक्ती’पर्यंत सर्वांना जायचे आहे. तो ‘अभ्यासक्रम’ कितीही जन्मांचा असो, अखेर ब्रह्मलोकी प्रत्येकाला प्रवेश मिळणारच. आपण एकाच दिशेला जाणारे सहप्रवासी आहोत.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(उपनिषदांसंदर्भातील पुस्तके, ई-बुक्स 
‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
JAGDISH KHER About
Hearty congratulations to Shri Ravindra Gurjar for such a superb job done by him. Best wishes to him for similar successful journey in the field of literature.
0
0

Select Language
Share Link
 
Search