Next
वा. रा. कांत
BOI
Friday, October 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘आज राणी पूर्वीची ती, प्रीत तू मागू नको’सारखं तरल भावनाप्रधान गीत किंवा ‘सखी शेजारिणी तू हसत राहा’सारखं हळुवार प्रेमगीत लिहिणारे लोकप्रिय भावकवी वा. रा. कांत यांचा सहा ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी थोडक्यात.....
......................

सहा ऑक्टोबर १९१३ रोजी नांदेडमध्ये जन्मलेले वामन रामचंद्र कांत हे मराठीमधले अलौकिक प्रतिभावंत कवी आणि लोकप्रिय गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘अभिजात’ आणि ‘रसाळ वामन’ अशी टोपणनावं वापरूनही लेखन केलं होतं. त्यांच्या गीतांमधून अत्यंत आशयगर्भ आणि हळुवार शब्दरचना दिसून येतात. 

मराठीमध्ये ६० आणि ७० च्या दशकात ‘भावगीत’ नावाचा भावनाप्रधान काव्यरचनेचा नवाच प्रकार लोकांसमोर आला, रुळला आणि लोकप्रिय झाला. वा. रा. कांत हे त्या वेळच्या अग्रणी भावगीतकारांपैकी एक. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’ किंवा ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ यांसारखी अजरामर भावगीतं त्यांनी लिहिली. 

बगळ्यांची माळ, वेलांटी, दोनुली, मावळते शब्द, मरणगंध यांसारखे १४ उत्तम काव्यसंग्रह, सुलताना रझिया, मिर्झा गालिब, एक चादर मैलीसी यांसारखे १० अनुवादित ग्रंथ, दोन नाटकं, २९ समीक्षापर लेख आणि २१ ललित लेख असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.  

दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?...

असं जरी वा. रा. कांत आपल्या अखेरच्या दिवसांत म्हणून गेले तरी मराठी काव्यरसिक निश्चितच त्यांच्या कवितांचा आस्वाद घेत राहतील. आठ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं.

(श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेल्या वा. रा. कांत यांच्या ‘बगळ्यांची माळ फुले’ या कवितेबद्दल ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख वाचा या लिंकवर.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link