Next
‘ग्रामीण महिलांनी स्वतःचा ब्रँड निर्माण करावा’
स्वयंरोजगार मेळाव्यात डॉ. हर्षा जोशी यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, December 13, 2018 | 01:35 PM
15 0 0
Share this story

महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. हर्षा जोशी.

पुणे : ‘नव्याने निर्माण होणाऱ्या सेवा आणि रोजगार संधी  बाहेरच्यांच्या हाती देण्यापेक्षा स्थानिक ग्रामीण महिलांनी कौशल्ये प्रशिक्षणाद्वारे आत्मविश्वासपूर्वक हस्तगत कराव्यात,’ असे आवाहन अनुभूती संस्थेच्या संचालक डॉ. हर्षा जोशी यांनी केले.

‘सिनर्जी फाउंडेशन’ आणि ‘अनुभूती सोशल एम्पॉवरमेंट अँड एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थांतर्फे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांसाठी महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार मेळावा आयोजित केला होता. हा कार्यक्रम १० डिसेंबर २०१८ रोजी भोर तालुक्यातील कुरुंजी येथील कॅस्युरीना हॉलमध्ये झाला. या मेळाव्यात सिनर्जी फाउंडेशनचे राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, ‘अनुभूती’ माधुरी सुमंत, स्मिता तळेले, हर्षा रास्ते, मिलिंद जोरी, प्रशांत कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच अस्मिता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य छाया मळेकर उपस्थित होत्या.

सद्यस्थिती आणि महिलांना उपलब्ध कौशल्य विकास पर्यायांबद्दल मार्गदर्शन करताना डॉ. जोशी म्हणाल्या, ‘महिलांना चांगले प्रशिक्षण मिळाले, तर त्या स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात. त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे. योग्य प्रशिक्षणानेच हे काम होऊ शकते. त्यासाठी आवश्यक असलेल्या मार्केटिंगची मदत ‘अनुभूती’ आणि ‘सिनर्जी’मार्फत केली जाईल.’

‘सिनर्जी’चे आवटे म्हणाले, ‘डोंगरी भागातील रिसॉर्ट आणि पर्यटन उद्योग पूर्णपणे महिला चालवू शकतात. आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) उद्योगात अत्यंत चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत. पूर्णपणे महिलांनी चालवलेली रिसॉर्ट आता पुढे येत आहेत, अशा वेळी योग्य कौशल्ये शिकणे आणि ती आत्मसात करणे ही उद्योगाची पहिली महत्त्वाची पायरी ठरू शकते.’

या मेळाव्यात पर्यटन, सेंद्रिय शेती, बागकाम, खाद्यपदार्थ बनवणे, हस्तकला-शिवणकला, संगणक-मोबाइल दुरुस्ती या विषयांवर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले. ग्रामीण भागातील ९० महिला या प्रशिक्षणाला उपस्थित होत्या. या महिलांचे विषयनिहाय विशेष प्रशिक्षण पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link