Next
चासचा विलक्षण दीपोत्सव
BOI
Monday, November 06 | 06:45 PM
15 0 0
Share this story

चास येथील सोमेश्वर मंदिरात उजळलेली दीपमाळएलईडी, निऑन वगैरे विजेच्या दिव्यांचा कितीही झगमगाट अवतीभवती असला, तरी मंद तेवणाऱ्या शांत, स्निग्ध समईचा किंवा दिव्याचा डौल काही निराळाच. त्यातही गावात येणारी मजा निराळीच. पुण्याजवळच्या चास गावातल्या पेशवेकालीन सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त झालेल्या पारंपरिक दीपोत्सवाचे साक्षीदार झालेल्यांचा अनुभवही तेच सांगतो. त्या विलक्षण अनुभवाची अनुभूती देणारा हा लेख...
.........
त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या शंकराच्याच नव्हे, तर बहुतेक सगळ्याच छोट्या-मोठ्या देवळांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी रस्त्यानं येता-जाता कधी पर्वतीवर, एखाद्या पुलावरून जाताना नदीकाठच्या छोट्याशा देवळातही ओळीनं लावलेले दिवे, पणत्या पाहून अथवा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले पाताळेश्वर किंवा इतर मंदिरात झालेल्या दीपोत्सवांचे फोटो पाहिले, की आपणही तिथे प्रत्यक्ष जायला पाहिजे, दिवे लावून (शब्दशः) दीपोत्सवाच्या सोहळ्यात स्वतः भाग घ्यायला पाहिजे, असं दर वर्षी ठरवायचे; पण निश्चयाचा महामेरू असल्याने सोयीस्करपणे पुढच्या वर्षी विसरून जाणं हा यंदापर्यंतचा शिरस्ता होता. 

या वर्षी मात्र दीपोत्सव डोळे भरून पाहण्याची, त्याला प्रत्यक्ष हजर राहण्याची संधी आयतीच मिळाली ती पुण्यातल्या ‘हेरिटेज इंडिया’ या संस्थेनं आयोजित केलेल्या चास या गावाच्या सहलीमुळे. चास गावातल्या पेशवेकालीन सोमेश्वर मंदिरात होणाऱ्या दीपोत्सवानिमित्तानेच ही खास सहल होती. पुण्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील चासकमान धरणामुळे चास हे गाव ऐकून माहिती होतं. थोरले बाजीराव पेशवे यांची ती सासुरवाडी. बाजीरावांच्या पत्नी काशीबाई यांचं ते माहेर. पेशवीण असलेल्या काशीबाईंनीच आपल्या माहेरच्या गावात हे शंकराचं मंदिर बांधून घेतलं आहे. मराठ्यांच्या बांधकामाचं वैशिष्ट्य असलेली सुबक, देखणी आणि अजूनही उत्तम अवस्थेत असलेली पाषाणाची दीपमाळ या मंदिरात आहे. दीपमाळ हा प्रकार महाराष्ट्रातल्या किंवा मराठ्यांच्या काळात बांधलेल्या मंदिरांमध्येच आढळतो. उत्तर भारतात किंवा प्राचीन काळात बांधलेल्या कुठल्याच मंदिरात दीपमाळा आढळत नाहीत. दक्षिणेकडच्या मंदिरांमध्येदेखील उंच उंच समया असतात; पण दीपमाळा नाहीत. ही माहितीही या निमित्ताने कळली. 

आवळ्याचा दिवा.चाकण, राजगुरुनगर असे थांबे घेत, तिथली काही देवळं पाहिली. राजगुरूनगरच्या एका खासगी विष्णू मंदिरात आवळ्यांमधली बी कोरून त्यामध्ये तेल, वात घालून दिवे लावण्याची आगळी प्रथा आहे. असे आवळ्यांचे दिवे पाहून रात्री दहा-सव्वा दहाच्या सुमारास चासला पोहोचलो. बाकी देवळांमध्ये साधारणतः अंधार पडल्यावर दिवेलागणीच्या वेळातच दीपोत्सव साजरा होत असल्यानं चालत मंदिरात पोहोचेपर्यंत मनात एकच बारीकशी चिंता सतावत होती ती म्हणजे, दीपमाळ आम्ही जाण्याअगोदरच पेटवलेली तर नसेल ना! पण मंदिरात रुद्र, अभिषेक इत्यादी झाल्यावरच रात्री उशिरा दीपमाळ उजळण्यात येते, असं तिथे अगोदर काही वेळा जाऊन आलेल्या जाणकारांनी सांगितल्यावर हायसं वाटलं. जाताना वाटेतल्या एक-दोन छोट्या देवळांमध्येही उजळलेले, तसंच नदी किंवा ओढ्यात सोडलेले दिवे पाहून एकदम भारी वाटलं. रात्रीची वेळ असल्यामुळे की काय, सगळं शांत होतं; पण सोमेश्वर मंदिराजवळ पोहोचल्यावर उत्साहाची झलक पाहायला मिळाली. 

अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं घेऊन गावातले, तसंच आजूबाजूच्या पंचक्रोशीतले लोक आले असावेत. बरेच लोक जमले असले, तरी गर्दी, रेटारेटी नव्हती. त्यामुळे दीपमाळ पेटवण्याचे सगळे सोपस्कार नीटपणे पाहता येतील याची खात्री पटली. या मंदिराचं आवार चारही बाजूंनी बांधलेल्या दगडी भिंतीने बंदिस्त आहे. त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मोठा दिंडी दरवाजा आहे. त्यासमोर रांगोळ्या रेखून पणत्या लावलेल्या. दरवाजातून आत जाताच काळी चकाकणारी दीपमाळ पाहताच मनातल्या मनात आहा म्हणत असतानाच दीपमाळेच्या चौथऱ्यावरती लगबग सुरू झाली होती. तरुण मुलं, बाप्ये मंडळी दीपमाळेच्या माथ्यावर चढू लागलेली, तर बायका- मुली मोठ्या पणत्या ओळीनं मांडून त्यामध्ये तेल आणि वाती घालण्याची तयारी करत होत्या. या दीपमाळेच्या शिरोभागी असलेल्या खळग्यात किंवा मुख्य दिव्यात दोन अख्ख्या धोतरजोड्यांना पीळ देऊन तयार केलेली भली मोठी त्रिपुर वात पेटवली जाते. त्यासाठी पाच लिटर तेल लागतं, अशी इंटरेस्टिंग माहिती दरम्यान कळल्यामुळे आता ती पेटवलेली वात पाहण्याची उत्सुकता आणखीच वाढली होती. 

दीपमाळेच्या खालच्या भागात ओळीनं गोलाकार दिवे लावण्यासाठी जी व्यवस्था केली आहे. त्याला दीपमाळेचे हात असं म्हटलं जातं. या दीपमाळेला असे एकंदर २५६ हात आहेत. त्यातला एकच हात आता कालपरत्वे निखळला आहे. मंदिराच्या समोरच्या भागात बाजूच्या भिंतीला लागून असलेल्या कठड्यांवर बसलेल्या लोकांच्या मजेत गप्पा गोष्टी, ऊठ-बस सुरू होती, नवीन मंडळी येऊन बसत होती. त्यातल्या बऱ्याच जणांना हा सगळा प्रकार दर वर्षी पाहिल्यानं सरावाचा झाला होता; पण आमच्यासारखे हा सोहळा प्रथमच पाहायला आलेले काही जण पुनःपुन्हा दीपमाळेकडे पाहत मनात येणारे प्रश्न आणि शंका आपसातच विचारून त्यांचं निरसन करण्याचा आपल्या आपल्यातच प्रयत्न करत होते. तोपर्यंत देवळात दर्शन घेऊन आम्ही लगबगीनं दगडी पायऱ्या चढून भिंतीच्या वरच्या बाजूला गेलो. कारण वरच्या बाजूनंच संपूर्ण दीपमाळ दिसत होती. वरच्या बाजूला दोन-चार हौशी छायाचित्रकार तिकाटण्यावर कॅमेरे ठेवून थोड्याच वेळात दीपकळ्यांनी बहरणार असलेली दीपमाळ कॅमेऱ्यात टिपण्यास सज्ज उभे होते. आमच्यासारखी हौशी-नवशी मंडळी त्या अरुंदशा कठड्यावर स्वतःच्या शरीराचे तोल सांभाळत आपापल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यांनी जास्तीत जास्त चांगला फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या खटपटीत होते. पाहता पाहता त्रिपुर वात पेटली. पाठोपाठ त्याखालच्या असलेल्या हातांवर एक एक करत पणत्या ठेवत त्या वर्तुळाकार ओळी उजळू लागल्या. अगदी वरच्या भागात असलेल्या मंडळींकडे खालून पणत्या भराभर पास होत होत्या. त्याबरोबर बुजुर्ग, अनुभवी लोकांच्या सूचनाही सुरू होत्या. वरची मंडळी पणत्या ठेवत खाली येऊ लागली, तशी चौथरा आणि त्यावर उभ्या असलेल्यांची संख्या कमी होत गेली. काही मिनिटांतच अख्खी दीपमाळ प्रकाशमान झाली. कोणी कोणी हा सोहळा फेसबुकवर लाइव्ह दाखवला. ती उमलती प्रकाशफुलं डोळ्यात आणि मनात कायमची साठवावीत की आपल्या मोबाइलमध्ये साठवून ठेवावीत या संभ्रमात जमतील तितके फोटो काढले. काही क्षण शांतपणे उभं राहून डोळे भरून दीपकलिकांनी तेजाळणारी दीपमाळ पाहून घेतली. दिव्यांनी लखलखणारी दीपमाळ पाहण्याची इच्छा खूप दिवसांची पूर्ण झाल्यानं तृप्त मनानं खाली उतरले. तरीपण एकदा या बाजूनं, मग त्याच्या विरुद्ध बाजूनं ती दीपमाळ पाहण्याचा मोह आवरत नव्हता. 

आता मंदिराच्या आवारात जमलेल्या सर्वांच्यातच उत्साह संचारला होता. हवेतल्या त्या सुखद गारव्यात दिव्यांमुळे वातावरणही ऊबदार झालेलं. त्यातच आपलाही पावशेर म्हणून आम्हीदेखील सोबत नेलेले दिवे चौथऱ्यावर लावून त्या प्रकाशोत्सवात किंचितशी उजेडाची भर घालण्याची संधी साधून घेतली. तेवणाऱ्या दीपमाळेच्या पार्श्वभूमीवर सेल्फी, जोडीनं, ग्रुपचे पोटभर फोटो काढून झाले. तोपर्यंत आकाशात उगवलेला पुनवेचा चंद्र आता दीपमाळेच्या माथ्यावर आलेला होता. जणू काही निरभ्र आकाशात लावलेला तोदेखील वाटोळा दिवाच. एलईडी, निऑन वगैरे विजेच्या दिव्यांचा कितीही झगमगाट अवतीभवती असला, तरी मंद तेवणाऱ्या शांत, स्निग्ध समईचा किंवा दिव्याचा डौल काही निराळाच. ‘विजेच्या दिव्यांची रोषणाई यापुढे अगदीच फिकी वाटते नाही,’ हा डायलॉग मी तेवढ्या वेळात एकशे ४७ वेळा तरी घोकला असेल. तर ते असो. तो एक विलक्षण अनुभव होता एवढं मात्र नक्की.

- मंजिरी गानू
मोबाइल : ९७६४४ ४०५६६
ई-मेल : manjiriganoo@gmail.com

(लेखिका पुण्यातील मुक्त पत्रकार आहेत.)

(चास येथील दीपोत्सवाचा फेसबुक लाइव्ह व्हिडिओ... राजेंद्र लोथे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link