Next
‘कटुता विसरून ‘भाजप-सेने’ला विजयी करण्याचा निर्धार’
औरंगाबाद येथे युती कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन
प्रेस रिलीज
Tuesday, March 19, 2019 | 01:02 PM
15 0 0
Share this article:औरंगाबाद : भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेनेदरम्यान गेल्या साडेचार वर्षांत जे झाले ते सर्व विसरून एकदिलाने राज्यात लोकसभा निवडणुकीत युतीच्या ४५ जागा निवडून आणण्याचा निर्धार प्रमुख नेत्यांनी १७ मार्च २०१९ रोजी औरंगाबाद येथे भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री पंकजा मुंडे, संभाजीराव पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार चंद्रकांत खैरे, प्रीतम मुंडे, सुनील गायकवाड, रवींद्र गायकवाड, ‘भाजप’ प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांसह युतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘गेली तीन चार वर्षे भाजप-शिवसेना कार्यकर्ते परिस्थितीने वेगळे असले, तरी मनाने एकत्र होते, कारण ‘भाजप’ आणि शिवसेनेला जोडणारा हिंदुत्वाचा धागा आहे. जे लोक या देशाला मातृभूमी मानतात व देशाबद्दल अभिमान बाळगतात त्या सर्वांचा हिंदुत्वात समावेश आहे. औरंगाबाद–जालन्यासह मराठवाड्यातील वर्षानुवर्षे मित्र असलेले युतीचे कार्यकर्ते पुन्हा मित्र झाले याचा आनंद आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ‘भाजप’ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी ही भक्कम युती केली होती. तशीच युती शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि राज्यातील ‘भाजप-सेना’ युती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक कामे केली आहेत. निवडणुकीच्या धामधुमीतही कार्यकर्त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल याची खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘एकत्र येण्यासाठी वर्षभर प्रयत्न करूनही विरोधकांना अद्याप एकसंध आघाडी करता आलेली नाही. उलट ‘भाजप-सेने’च्या नेत्यांनी एका दिवसात युती केली आणि युतीच्या नेत्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. पाच वर्षे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार असून, या सरकारमध्ये कसल्याही कुरबुरी नाहीत. त्यामुळे गेली साडेचार वर्षे जे झाले ते विसरा आणि आता शिवसेना व ‘भाजप’च्या उमेदवारांना विजयी करून गेल्यावेळेपेक्षा जास्त यश मिळवा.’

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये यापूर्वी दुरावा निर्माण झाला असला, तरी आता त्याचा कोळसा उगाळायचा नाही. आता सर्व वाद मिटले असून, जबाबदारीचे वाटप झाले आहे. आपल्याला गोरगरिबांच्या कल्याणासाठी सत्ता हवी आहे. केवळ विदर्भ–मराठवाड्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून संसदेवर भगवा फडकवा.’

युतीचे मराठवाड्याचे समन्वयक ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच खासदार चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search