Next
भा. रा. तांबे
BOI
Friday, October 27 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’, ‘कशी काळनागिणी, सखे ग, वैरीण झाली नदी’, ‘कळा ज्या लागल्या जिवा’, ‘मावळत्या दिनकरा’, ‘जन पळभर म्हणतील’ यांसारखी एकाहून एक सुमधुर भावगीतं रचून मराठी काव्य समृद्ध आणि श्रीमंत करणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा २७ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...........   
२७ ऑक्टोबर १८७३ रोजी झाशीजवळच्या मुंगावलीमध्ये जन्मलेले भा. रा. तांबे हे आपल्या लालित्यपूर्ण भावकाव्याने मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे ग्वाल्हेरचे राजकवी.

शाळकरी वयात लेलेमास्तरांसारखे गुरू लाभल्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांनीच तांबे यांना मराठीबरोबरच संस्कृत आणि इंग्लिश साहित्याची ओळख करून दिली आणि गोडीही लावली. बायरन, शेले, किट्स, वर्डस्वर्थ, कोलरीज, टेनिसन, ब्राउनिंगबरोबरच जयदेव, टागोरही तांबे यांच्या आवडीचे कवी होते. 

संस्थानी वकील, दिवाण, न्यायाधीश, सुपरिटेंडंट अशा रुक्ष नोकऱ्या करत असतानादेखील तांबे यांनी आपलं कविमन जपत एकाहून एक गोड कविता आणि गाणी रचली हे महत्त्वाचं.

एकीकडे ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, वारा नेई सोने वाटे वाहुनिया दूर’ सारखी निसर्गकविता, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’सारखं बहीणभावाचं खेळीमेळीचं नातं वर्णन करणारं गीत, ‘या बालांनो सारे या, लवकर भरभर सारे या’सारखी बालकविता लिहिणारे तांबे, त्याच सहजतेने ‘डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका’ अशी एका प्रेयसीची लोभस विनवणीही लिहितात, ‘नववधू प्रिया मी बावरते’ अशी नवपरिणित तरुणीची घालमेलही मांडतात आणि दुसरीकडे ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’सारखं जीवनातलं कटू सत्य सांगणारं गीतसुद्धा लिहून जातात.

तांबे यांनी १९२६ सालच्या मध्य भारतीय कविसंमेलनाचं आणि १९३२ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. प्रणयप्रभा, तांबे यांची समग्र कविता अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सात डिसेंबर १९४१ रोजी ग्वाल्हेरमध्ये त्यांचं निधन झालं.  

(भा. रा. तांबे यांच्या ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ या कवितेचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सायंकाळची शोभा’ ही त्यांची कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा. भा. रा. तांबे यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉमवरून  मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link