
वाशिम : जिल्ह्यातील महिला, मुलींनी आंतरराष्ट्रीय महिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करून विश्वविक्रम घडविला व जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर पोहचवले. वाशिम जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होऊन वाशिम जिल्ह्यातील ८३१८ महिला, मुलींनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो मानवी साखळीतून साकारला. ८/३/१८ या तारखेचे औचित्य साधून ८३१८ महिलांनी एकत्र येऊन, स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती करावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता. केवळ महिला, मुलींनी इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी साखळीतून साकारलेला हा जगातील पहिलाच लोगो असल्याने या उपक्रमाची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने घेतली आहे, असे ‘महान्यूज’च्या बातमीत म्हटले आहे.
स्त्री-भ्रूणहत्या रोखणे, तसेच मुलींना शिक्षण व समान संधी मिळण्यासाठी समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, याकरिता बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविले जात आहे. या अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाने दि. ८.३.१८ या तारखेचे औचित्य साधून ८३१८ महिलांनी एकत्र येऊन बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो साकारण्याचा उपक्रम आयोजित केला होता. त्यानुसार वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर आज आयोजित कार्यक्रमात ८३१८ महिला व मुलींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन `मुलगी वाचवा, मुलगी शिकवा`चा संदेश दिला.
या उपक्रमासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिला, मुली पोलीस कवायत मैदानावर दाखल होण्यास सुरुवात झाली. लोगोसाठी आवश्यक रंगाच्या पेहरावात मैदानावर दाखल झालेल्या महिला, मुलींनी सकाळी ११ वाजता मानवी साखळीतून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो साकारला. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थींनीसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, पोलीस प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचारी महिला, महिला बचत गट, विविध महिला संघटनांच्या सदस्या व गृहिणींनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदविला.
‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’चे प्रतिनिधी अलोककुमार विष्णोई व त्यांच्या चमूने या उपक्रमाचे निरीक्षण केले. अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येऊन साकारलेला हा पहिलाच लोगो असल्याने या उपक्रमाची नोंद विश्वविक्रम म्हणून घेतली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबतचे प्रमाणपत्र स्वीकारले.
‘जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा’
‘वाशिम जिल्ह्यातील महिला व मुलींनी एकत्र येऊन साकारलेल्या लोगोमुळे नवा विश्वविक्रम स्थापित झाला आहे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख यांनी केले. या वेळी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल महिला, मुलींचे कौतुक केले.
‘महिलांनी ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही’‘वाशिम जिल्ह्यात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविले जात आहे. हा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील महिलांनी एकत्रित येऊन जनजागृती करावी, हा महिलांनी मानवी साखळीतून बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा लोगो साकारण्याच्या संकल्पनेमागचा हेतू होता. त्यानुसार जिल्ह्यातील ८३१८ महिलांनी एकत्र येऊन नवा विश्वविक्रम घडविला आहे. महिलांनी ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच आजच्या उपक्रमातून सिद्ध झाले आहे,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या वेळी केले. तसेच उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला व मुलींचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन केले.
‘मुलीला शिकवा, पुढे येण्याची संधी द्या’
‘मुलगा आणि मुलगी समान आहेत. त्यांच्यात कोणताही भेदभाव करू नका. प्रत्येक महिलेने आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. तसेच मुलीला सर्व क्षेत्रात समान संधी देऊन तिला पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करावे. तिच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांना समान संधी द्यावी,’ असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. तसेच फक्त आंतरराष्ट्रीय महिला दिनीच नव्हे तर प्रत्येक दिवशी महिलांचा आदर, सन्मान केला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती प्रियांका मीना यांनीही यावेळी महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महिलांनी आपल्या मुलीच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून तिला प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी देण्याचे आवाहन केले. या वेळी जि. प. सदस्य ज्योती गणेशपुरे, जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी बीड येथील बाल सिनेकलाकार साक्षी आंधळे हिच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित महिला, मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या गीत व नाटक विभागाच्या वतीने पुणे येथील लोकजागृती कला मंच व औरंगाबाद येथील शाहीर मीरा उमप यांच्या पथकाने बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाविषयी जनजागृती कार्यक्रमाचे या वेळी सादरीकरण केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी उपक्रमात सभागी झालेल्या उपस्थित सर्व महिला, मुलींचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.
सलग दुसऱ्या वर्षी विक्रमाची नोंद
२६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सात हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा लोगो (महात्मा गांधी यांचा चष्मा) साकारला होता. या उपक्रमाची नोंदही जगातिक विक्रम म्हणून ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये घेण्यात आली आहे. त्यानंतर ८३१८ महिला व मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा लोगो साकारून नवा विक्रम स्थापित केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या उपक्रमातून सलग दोन वर्षी जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे.