Next
‘भुतियापंती’ चित्रपटात आनंद शिंदेंच्या आवाजात गणपतीचे गाणे!
BOI
Friday, August 30, 2019 | 12:32 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’च्या यशानंतर सध्या हिंदीमध्ये बऱ्याच ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांची निर्मिती होत आहे. मराठीमध्ये तर विनोदी चित्रपटांची लाट कधीच ओसरत नसली, तरी ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांचीसुद्धा परंपरा आहे. त्याच जातकुळीतला एक थरारक व गमतीशीर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याचे नाव आहे ‘भुतियापंती’. चित्रपटाच्या नावावरून त्याच्या ‘जॉनर’ची कल्पना येते. 

गणेशोत्सव जवळ आला आहे व ते औचित्य साधून ‘भुतियापंती’च्या निर्मात्यांनी एका गाण्याद्वारे गणपतीबाप्पालाही आपल्या ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटात सामावून घेतले आहे. हे गाणे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भारदस्त आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. ‘तुला शोधू कुठे रे मोरया, तुला पाहू कुठे रे मोरया’ असे बोल असलेल्या गाण्याचे गीतकार आहेत स्वप्नील चाफेकर ‘प्रीत’ आणि ते संगीतबद्ध केले आहे अभिनय जगताप यांनी. 

‘मोरया मोरया ताल हा वाजला, गर्जती दाही दिशा’ असे म्हणत गीतकाराने चपखल शब्दांमध्ये ‘गणपती बाप्पा हे सर्वांचेच कसे लाडके दैवत आहे’ हे अधोरेखित केले आहे व आनंद शिंदेंच्या आवाजाने हे गाणे अजूनच बहारदार झाले आहे. नृत्यदिग्दर्शन संतोष आंब्रे यांनी केले आहे.



आनंद शिंदे यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी गणपतीचे गाणे गायले आहे. संगीतकार अभिनय जगताप यांचे संगीत दिग्दर्शन असलेला ‘सूर सपाटा’ या वर्षी प्रदर्शित होऊन गेला. तसेच त्यांनी पार्श्वसंगीत दिलेल्या ‘टकाटक’ चित्रपटाने कोटीकोटीची उड्डाणे केली व या वर्षीच्या सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळविले. आनंद शिंदे यांनी ‘टकाटक’साठी पार्श्वगायन केले होते. त्यांची आणि अभिनय जगतापांची जोडी ‘भुतियापंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे.

विनोद बरदाडे प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते विनोद बरदाडे व सहनिर्माते नरेश चव्हाण आणि यशवंत डाळ यांनी ‘भुतियापंती’ची निर्मिती केली आहे. संचित यादव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन विनय येरापले यांचे आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search