Next
अनाथ, वंचितांच्या विकासासाठी झटणारे हरी ओम बालगृह
BOI
Tuesday, November 07 | 03:45 PM
15 0 0
Share this story

अहमदनगर जिल्ह्यातील हरी ओम बालगृह ही संस्था अनाथ, वंचितांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. कोणत्याही सरकारी मदतीशिवाय आणि केवळ लोकसहभाग व इच्छाशक्ती यांच्या जोरावर ही संस्था अडथळ्यांवर मात करत आपले कार्य नेटाने करते आहे. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज जाणून घेऊ या टाकळी खंडेश्वरी या गावातील हरी ओम बालगृह या संस्थेविषयी.....
........
बाबूराव रामभाऊ गिरी ऊर्फ गिरी महाराज यांनी २००८मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खंडेश्वरी या छोट्याशा गावात ‘हरी ओम बालगृहा’ची स्थापना केली. अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी व मागास तालुक्यांतील धनगर, फासेपारधी, भिल्ल, भटके, वंचित घटकांतील, तसेच, अनाथ मुलांना एकत्र आणून त्यांना शिक्षण व संस्कार देणारी निवासी संस्था असे हरी ओम बालगृहाचे स्वरूप होते. गिरी महाराजांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या पैशातून बालगृहासाठी इमारत बांधली. नंतर मुलांच्या पालनपोषणासाठी पैसे कमी पडू लागले म्हणून त्यांनी शेती विकली व प्रसंगी कर्ज काढून आणि भिक्षा मागूनदेखील मुलांच्या गरजा पूर्ण केल्या.
 
२०१३मध्ये काही सरकारी हस्तक्षेपामुळे संस्थेची मान्यता रद्द झाली. त्या वेळी गिरी महाराजांनी फारुक बेग यांच्याकडे संस्थेची धुरा सोपविली. फारुक बेग यांनी संस्था पुन्हा उभी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. गावातीलच एक सद्गृहस्थ अनिल वडवकर यांनी संस्थेसाठी एक एकर जागा दिली. बेग यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजानेदेखील मदतीचा हात दिल्याने संस्थेने पुन्हा नव्याने सुरुवात केली.  

‘हरी ओम बालगृह’ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करते. शालेय अभ्यासक्रमाशिवाय मुलांमधील कलागुण ओळखून, त्यांचा विकास करण्याला इथे प्राधान्य दिले जाते. गेल्या वर्षी मुलांना गणेशमूर्ती तयार करण्याचे व रंगवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या वर्षी मुलांनी तीनशे गणेशमूर्ती बनविल्या. त्यांची आसपासच्या गावात विक्री करून मिळालेल्या पैशांतून संस्थेसाठी निधी जमा करण्यात आला. संस्थेने भरविलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून तयार झालेली मुले राज्यभरात आपले व्याख्यानाचे कार्यक्रम करतात. संस्था त्यांना तशी संधी देते. संस्थेतील विद्यार्थिनी शिवगीता शेळके हिने कर्जत व नेवासा तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘स्त्री भ्रूणहत्या’ या विषयावर व्याख्यान दिले आहे. संस्थेतील मुलांच्या फक्त शालेय शिक्षणाचीच जबाबदारी घेतली जाते असे नाही, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठीसुद्धा संस्था मदत करते. गेल्या तीन-चार वर्षांपासून श्रीगोंद्यातील एका विद्यार्थिनीला सनदी लेखापाल (सीए) होण्यासाठी लागणारे शिक्षण घेण्यास संस्था आर्थिक मदत करत आहे. 

संस्था मुलांबरोबरच गावातील इतर नागरिकांसाठीदेखील काम करते. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘सर्व रोग निदान शिबिर’ आयोजित करण्यात येते. स्थानिक डॉक्टर शिबिरात सहभागी होतात. या शिबिरात विविध आजारांसाठीची तपासणी करून मोफत औषधोपचारही केले जातात. 

महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीची मदत मिळाल्यास त्यांचा जीव वाचवणे शक्य होते. हे लक्षात घेऊन अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करण्याचे कामही संस्थेचे कार्यकर्ते करतात. अपघातग्रस्तांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता यावे म्हणून स्वतःची रुग्णवाहिका घेण्याचे संस्थेचे नियोजन आहे. 
भविष्यात मुलांबरोबरच महिला, युवक, वृद्ध व प्रौढ मतिमंदांसाठी काम करण्याची संस्थेची योजना आहे. या योजना सफल होण्यासाठी संस्थेला मदतीची आवश्यकता आहे. समाजासाठी अत्यंत चांगले काम करणाऱ्या या संस्थेच्या कार्याला शुभेच्छा!

संपर्क : फारुक बेग, हरी ओम बालगृह, मु. पो. टाकळी खंडेश्वरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर
मोबाइल : ९४२३७ ८८४६५

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

(संस्थेची माहिती देणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link