Next
‘उषा’ आणि ‘युरेका’सोबत ‘अल्फा लावल’ची भागीदारी
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पुणेस्थित स्विडीश कंपनी ‘अल्फा लावल’ने भोर तालुक्यातील वेळवंड आणि नांदगुर या खेड्यांमध्ये कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत (सीएसआर) तीन वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक प्रकल्प सुरू केले आहेत. यापैकी पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन ‘अल्फा लावल’ आणि ‘उषा इंटरनॅशनल’ यांनी संयुक्तपणे केले. शिवणशाळा आणि उत्पादन प्रकल्प (सुईंग स्कूल अँड प्रॉडक्शन सेंटर) या नावाने सुरू केलेला हा उत्पादन केंद्राचीही सोय असलेला राज्यातील पहिलाच असा प्रकल्प आहे.

कंपनीने वेळवंड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तसेच तिथून सहा किलोमीटरवरील नांदगुर गावामध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविली आहेत. ही दोन्ही यंत्रे ‘युरेका फोर्बस्’ या कंपनीने दिली आहेत. नांदगुर गावातील अनेक मुले वेळवंडच्या या शाळेत जातात. त्यांना कोणतीही प्रक्रिया न केलेले थेट धरणाचे पाणी प्यावे लागते. या जलशुद्धीकरण यंत्रांमुळे ही समस्या दूर होईल.

या वेळी बोलताना ‘अल्फा इंडिया’चे क्लस्टर प्रेसिडेंट आणि व्यवस्थापकीय संचालक अनंथ पद्मनाभन म्हणाले, ‘समाजातील गरजू समुहासाठी विशेषतः महिला आणि मुलांसाठी ‘अल्फा लावल’ योगदान देत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. समर्थ विद्या मंदिर या शाळेसोबत आम्ही गेली चार वर्षे काम करीत आहोत. त्यात या नव्या उपक्रमाची भर पडत आहेत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या प्रकल्पावर आमच्यासोबत उत्साहाने सहभागी झालेल्या ‘उषा इंटरनॅशनल’ आणि ‘युरेका फोर्बस्’ यांचे मी आभार मानतो.’

समर्थ विद्या मंदिरने हे केंद्र सुरू करण्यासाठी एक खोली उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रामध्ये वीस शिवणयंत्रे बसविण्यात आली असून, त्यातील तीन मशीन्समध्ये कशिदाकारी करण्याचीही सोय आहे. गावातील महिलांना त्यादृष्टिने प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. या कामी ‘उषा इंटरनॅशनल’ने अतिशय अनुभवी अशा प्रशिक्षकांची एक टीमच उपलब्ध करून दिली आहे. पुरुष, महिला, मुले यांचे नेहमीचे कपडे शिवण्यासोबतच शाळा आणि कंपन्यांसाठीचे गणवेश बनविण्याचेही प्रशिक्षण त्यांना देण्यात येत आहे. या उत्पादनांच्या विक्रीतून या महिलांना उत्पन्नाचा एक स्रोत प्राप्त होईल. ‘अल्फा लावल’च्या व्यवसाय तत्वांशी तसेच कंपनीच्या सीएसआर उपक्रमांच्या महिलांचे सक्षमीकरण या उद्देशांशी हा प्रकल्प सुसंगत आहे.

वेळवंड आणि परिसरातील लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती असून, वर्षातून तीन ते चार महिने ते त्यामध्ये गुंतलेले असतात. या परिसरात कोणताही मोठा उद्योगव्यवसाय नसल्याने सीएसआर निधीही या परिसराच्या वाट्याला येत नाही. परिसरातील बहुसंख्य लोक अशिक्षित असून, सध्या शाळेमध्ये जाणारी मुले हीच अनेक कुटुंबातील पहिली साक्षर पिढी आहे.

या वेळी बोलताना ‘उषा इंटरनॅशनल’च्या कार्यकारी संचालिका डॉ. प्रिया सोमय्या म्हणाल्या, ‘उषा इंटरनॅशनल आणि अल्फा लावल यांच्यातील ही भागीदारी या प्रकल्पाच्या रूपाने इतक्या सुंदर रूपात साकारताना पाहताना अतिशय आनंद होत आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना उत्पन्न वाढविण्याच्या संधी निर्माण करून देणे यामुळे तळागाळातील लोकांमध्ये मोठे परिवर्तन येऊ शकते. अशा परिवर्तानासाठी मोठ्या कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे महत्त्वच या प्रकल्पामुळे अधोरेखित होत आहे.’

रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील तरुण शहरांमध्ये जाऊन वेटर किंवा तत्सम छोटी मोठी कामे करतात; मात्र महिलांना भातशेतीमध्ये काम करणे किंवा घरी बसणे या व्यतिरिक्त पर्याय नाही. शाळा आणि महाविद्यालये बरेच दूर आहेत आणि वाहतुकीची व्यवस्थाही तुटपुंजीच आहे. त्यामुळे परिसरातील मुलींना शिक्षण सोडून घरीच बसावे लागते; मात्र ‘उषा इंटरनॅशनल’ देत असलेल्या प्रशिक्षणामुळे या मुली व महिलांना उत्पन्नाचे एक नवे साधन उपलब्ध होणार आहे.  

‘युरेका फोर्बस्’च्या कम्युनिटी फुलफिलमेंटच्या राष्ट्रीय प्रमुख रोटेरियन अरिया ओहरी म्हणाल्या, ‘वेळवंड आणि नांदगुर गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्याच्या या प्रकल्पासाठी ‘अल्फा लावल’सोबत काम करणे हा एक अतिशय छान अनुभव होता. या दोन्ही ठिकाणी पिण्यासाठी योग्य आणि स्वच्छ पाणी मिळत नव्हते. या प्रकल्पासाठी काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये वेळवंडच्या शाळेचे व्यवस्थापन आणि नांदगुरेचे ग्रामस्थ यांची खूपच मदत झाली.’

‘या प्रकल्पाचा शाळेतील ६० मुलांना, तसेच सुमारे ४०० गावकऱ्यांना थेट फायदा होईल. शुद्ध पाण्यामुळे त्यांचे आरोग्यमान तर सुधारेलच शिवाय पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य रोगराईलाही त्यामुळे आळा बसेल. लोकांच्या आयुष्यामध्ये असे विधायक बदल आणण्याच्या प्रकल्पामध्ये अल्फा लावलसोबत भागीदारी करायला आम्ही उत्सुक आहोत,’ असे ओहरी यांनी सांगितले.
 
सीएसआर उपक्रमांतर्गत ‘अल्फा लावल’ने ही शाळेची इमारत तसेच शौचालये बांधली असून, परिसरातील मुलांना शाळेत आणण्यासाठी एक शाळेची बसही उपलब्ध करून दिली आहे. या परिसरात ३० किलोमीटरच्या पट्ट्यात एकही माध्यमिक शाळा नाही.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search