Next
भारतीय महिलांच्या ‘टॅलेंट’चा जागतिक पातळीवर प्रभाव
BOI
Wednesday, July 25, 2018 | 12:22 PM
15 0 0
Share this story

तमाम भारतीयांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. जगातील सर्वांत प्रभावी आणि प्रेरणादायी अशा ४० तरुण उद्योजकांमध्ये भारतीय वंशाच्या चौघांचा समावेश असून, त्यापैकी तीन महिला आहेत. ‘फॉर्च्युन’ या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१८च्या ‘मोस्ट इन्फ्लुएंशियल आणि इन्स्पायरिंग फॉर्टी अंडर फॉर्टी’ या यादीमध्ये या चौघांचा समावेश आहे. 

‘इन्स्टाग्राम’चे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केव्हिन सिस्ट्रोम (३४) आणि ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (३४) हे दोघेही या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेची सर्वांत मोठी वाहनउत्पादक कंपनी असलेल्या ‘जनरल मोटर्स’च्या मुख्य अर्थ अधिकारी (सीएफओ) धिव्या सूर्यदेवरा यांचा या यादीत चौथा क्रमांक आहे. ‘व्हिमिओ’च्या सीईओ अंजली सूद चौदाव्या क्रमांकावर आहेत. ‘रॉबिनहूड’चे सहसंस्थापक आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी बैजू भट्ट चोविसाव्या, तर ‘फीमेल फाउंडर्स फंड’च्या संस्थापक सदस्या अनू दुग्गल ३२व्या स्थानावर आहेत. 

धिव्या सूर्यदेवरा (Image Courtesy : Fortune)धिव्या सूर्यदेवरा
‘जनरल मोटर्स’ ही अमेरिकेतील मोठी वाहन उत्पादक कंपनी असून, ३९ वर्षांच्या धिव्या सूर्यदेवरा या कंपनीच्या ११० वर्षांच्या इतिहासातल्या पहिल्या महिला मुख्य अर्थ अधिकारी (सीएफओ) बनणार आहेत. येत्या एक सप्टेंबर रोजी त्या कार्यभार स्वीकारणार आहेत. जनरल मोटर्सच्या सध्याच्या ‘सीईओ’ही महिलाच असून, मेरी बॅरा असे त्यांचे नाव आहे. अशा प्रकारे सीईओ आणि सीएफओ या अत्यंत महत्त्वाच्या दोन्ही पदांवर महिला अधिकारी असणारी जनरल मोटर्स ही  ‘फॉर्च्युन ५००’ या यादीतील (म्हणजेच जगातील आघाडीच्या ५०० कंपन्या) दुसरीच कंपनी ठरली आहे. सध्या ‘हर्षे’ या महत्त्वाच्या चॉकलेट उत्पादक कंपनीत ‘सीईओ’पदी मिशेल बक असून, पॅट्रिशिया बक या कंपनीच्या सीएफओ आहेत. त्यामुळे धिव्या सूर्यदेवरा यांची नियुक्ती हा एक प्रकारचा इतिहासच असल्याचे ‘फॉर्च्युन’ने त्यांचा या यादीत समावेश करताना म्हटले आहे. 

अंजली सूद (Image Courtesy : Fortune)अंजली सूद
३४ वर्षांच्या अंजली सूद २०१४मध्ये व्हिमिओ या व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट कंपनीत रुजू झाल्या. गेल्या वर्षी त्यांची कंपनीच्या ‘सीईओ’पदी नियुक्ती झाली. व्हिडिओ तयार करणे, शेअरिंग, मॉनेटायझेशन यासाठी क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित व्यासपीठ आणि व्यक्तींसह छोट्या ते मध्यम आकाराच्या उद्योगांवर लक्ष केंद्रित करून व्यवसायवृद्धी ही त्यांची कामगिरी आहे. म्हणून ‘फॉर्च्युन’ने त्यांची निवड केली आहे.

बैजू भट्टबैजू भट्ट
३३ वर्षांच्या बैजू भट्ट यांनी २०१३मध्ये व्लाड टेनेव्ह यांच्यासह रॉबिनहूड नावाची अर्थविषयक सेवा पुरविणारी, शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल मदत करणारी कंपनी स्थापन केली. गुंतवणुकीच्या संधी केवळ श्रीमंतांनाच नव्हे, तर सर्वांना समान उपलब्ध झाल्या पाहिजेत, या विचाराने स्थापन केलेली ही कंपनी ब्रोकरेजशिवाय शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी मदत करते. जुन्या ब्रोकरेज हाउसना हे एक प्रकारे आव्हानच होते. पाच वर्षांतच या कंपनीचे मूल्य ५.६ अब्ज डॉलर एवढे झाले. यंदा कंपनीने बिटकॉइन आणि आणखी काही क्रिप्टोकरन्सीचा (डिजिटल चलन) समावेश ‘ट्रेडिंग’मध्ये केला आहे. ‘रॉबिनहूड’ ही लवकरच एक पूर्ण क्षमतेने चालणारी डिजिटल बँक म्हणून उदयाला येईल, असा विश्वास ‘फॉर्च्युन’ने व्यक्त केला आहे. त्यांच्यासोबतच व्लाड टेनेव्ह यांचीही या यादीत निवड झाली आहे. 

अनू दुग्गल (Image Courtesy : Fortune)अनू दुग्गल
३९ वर्षांच्या अनू दुग्गल यांनी अन्य काही समविचारी मैत्रिणींसह २०१४मध्ये ‘फीमेल फाउंडर्स फंड’ची स्थापना केली. महिलांच्या नेतृत्वाखालील किंवा महिलांनी सुरू केलेल्या, तंत्रज्ञानविश्वातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बीजभांडवल स्वरूपात याची उभारणी करण्यात आली. सुरुवातीला ५० लाख डॉलरचा निधी उभारण्यात आला. यंदाच्या मे महिन्यात निधीची रक्कम २.७ कोटी डॉलर एवढी झाली होती. त्यामध्ये मेलिंडा गेट्स यांच्यासह अनेक भागीदार असून, यामधील भागीदारी फिरत्या (रोस्टर) स्वरूपात असते. दुग्गल यांच्या या वेगळ्या स्वरूपाच्या कार्याची दखल ‘फॉर्च्युन’ने घेतली आहे.
 


आणखीही काही...
याशिवाय, ‘फॉर्च्युन’ने एक पुरवणी मानद यादीही (सप्लिमेंटरी ऑनर लिस्ट) प्रकाशित केली असून, जगातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या काही पथदर्शी उद्योगांची उभारणी करणाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यातही भारतीय वंशाच्या व्यक्ती झळकल्या आहेत. जगभर तातडीने पैसे पाठवणे आणि चलन रूपांतरण (करन्सी एक्स्चेंज) यांसाठीचे नेटवर्क असलेल्या ‘रिपल’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष बिर्ला (३९) यांचा त्यात समावेश आहे. तसेच ‘कॉइनबेस’ या डिजिटल करन्सी वॉलेटचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बालाजी श्रीनिवासन, ‘कॉइनबेस’च्या उपाध्यक्षा टीना भटनागर आणि ‘एमआयटी डिजिटल करन्सी इनिशिएटिव्ह’च्या संचालिका नेहा नरुला यांचाही त्यात यादीत समावेश आहे. 

(संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link