Next
गोरेगावच्या सन्मित्र मंडळ संस्थेच्या हीरक महोत्सवाची सांगता
राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती
BOI
Tuesday, June 25, 2019 | 11:53 AM
15 0 0
Share this article:मुंबई :
गोरेगाव येथील सन्मित्र मंडळ संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षाची सांगता २३ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमावेळी झाली. महाराष्ट्र राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

‘सन्मित्र मंडळ, गोरेगाव’ या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली. १० बाय १०च्या खोलीत पाच-सहा मुलांपासून सुरू झालेल्या शाळेचा आज वटवृक्ष झाला आहे. मराठी माध्यमातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक असे तीन विभाग आणि १२०० विद्यार्थी पटसंख्या असणारी सन्मित्र मंडळ ही पश्चिम उपनगरातील एक अग्रगण्य संस्था झाली आहे. 

२०१८-१९ हे संस्थेचे हीरक महोत्सवी वर्ष साजरे करताना केवळ ‘सेलिब्रेशन’ हे उद्दिष्ट न ठेवता वर्षभर शिक्षकांचे प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी गुणात्मक आणि कलात्मक स्पर्धा, माजी विद्यार्थी, शिक्षक पालक व समाजातील शुभेच्छुक यांच्याशी संपर्क व संवाद असे अनेक कार्यक्रम संस्थेने आयोजित केले होते. सांगता समारंभात या सगळ्याचे सिंहावलोकन करण्यात आले. शाळेची सद्यस्थिती पाहून पुढील यशस्वी वाटचालीचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तावडे यांचे आगमन झाल्यावर विद्यार्थ्यांचे घोषपथक त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. पर्यवेक्षक रेखा मोरे यांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यासोबत तावडे यांचे चहापान व अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यानंतर माधव सभागृहात प्रत्यक्ष सांगता समारोहाला सुरुवात झाली. माजी मुख्याध्यापिकांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. सरस्वतीवंदनाही सादर झाली. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र पुराणिक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. संस्थेचा ६० वर्षांचा आढावा संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अॅड. नारायण सामंत यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडला. हीरकमहोत्सवी वर्षात झालेल्या कार्यक्रमांची माहिती कार्यकारिणी सदस्य अरुणा सप्रे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी तावडे यांचे स्वागत करून सन्मित्र मंडळाचे स्मृतिचिन्ह व पुस्तक भेट दिले. 


विनोद तावडे म्हणाले, ‘सन्मित्र मंडळासारख्या संस्था विद्यार्थ्यांना घडवत असतात. १०० टक्के निकाल असा आग्रह धरण्यापेक्षा आपल्याला ‘थ्री इडियट’मधील रांचो निर्माण करायचे आहेत, यावर भर द्यावा. त्यासाठी वाईतील जिल्हा परिषद शाळांमधील ‘कुतूहल कोपऱ्याचे’ उदाहरण पाहावे. मातृभाषेतील शिक्षण आवश्यक व अतिशय उपयोगी आहे.’

मातृभाषेला डोळ्याची तर इंग्रजी भाषेला चष्म्याची उपमा देऊन, तावडे यांनी मराठी माध्यमातून शिक्षण चालू ठेवल्याबद्दल सन्मित्र मंडळाचे राज्याच्या वतीने अभिनंदन केले. शाळेतील ई-लर्निंग, इंग्रजी संभाषण वर्ग, संगणक प्रशिक्षण व सेमी इंग्लिश अशा अनेक उपक्रमांबद्दल सर्व मुख्याध्यापक व त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी शाबासकी दिली व असेच प्रयोगशील राहून मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थेची यशस्वी वाटचाल चालू ठेवण्याचे आवाहन केले. 

मराठी माध्यमातील मुलांना स्पर्धात्मक शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करून लोकल ते ग्लोबल असा नवा अभ्यासक्रम तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हा अभ्यासक्रम तयार करताना डॉ. काकोडकर, डॉ. भाटकर, डॉ. माशेलकर, सोनम वांगचूक अश्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या जोडीला ओपन बोर्ड सुरू केले. महाराष्ट्र राज्य शिक्षणात १६व्या क्रमांकावर होते. कृती शिक्षण आणि अशा अनेक प्रयोगांमुळे ते आता तिसऱ्या क्रमांकावर आले,’ असे ते म्हणाले. तीन वर्षांत राज्यात ३६ हजार विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळेत आल्याचेही सांगितले. ‘तुम्ही वाचता, तुम्ही विसरता, तुम्ही बघता, तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्ही करता आणि तुम्ही समजता’ हा कृती शिक्षणामुळे होणारा बदल आहे. एकीकडे मुंबईसारख्या शहरातील मराठी शाळेतील भरतीचा टक्का घसरत असताना सन्मित्र मंडळामध्ये या वर्षी १००हून अधिक प्रवेश वाढले आहेत, हे कौतुकास्पद आहे,’ असे तावडे म्हणाले. ‘पुढील वाटचालीत नवीन वास्तूत उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण आणि कौशल्य विकास हे अभ्यासक्रम चालू करा आणि नवीन उपक्रमांच्या उद्घाटनासाठी मी नक्की येईन,’ असे आश्वासन त्यांनी दिले. नंदिनी भावे, वैशाली सावंत आणि सिद्धार्थ गव्हाळे या सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या विभागाच्या प्रगतीची माहिती दिली. संस्थेचे सदस्य नीलेश ताटकर यांनी ‘निर्माणोंके पावन युग में, हम चरित्र निर्माण न भुले’ हे गीत सादर केले. नंतर संस्थेचे अध्यक्ष विजय जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे खजिनदार अजित वर्तक यांनी आभारप्रदर्शन केले. संस्थेचे शुभेच्छुक व माजी विद्यार्थ्यांनी www.sanmitramandal.org ही वेबसाइट, तसेच फेसबुक व यू-ट्यूबच्या माध्यमातून सतत संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले.  पगारे बाईंनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. 

(संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षातील स्नेहसंमेलनाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search