Next
वैविध्यपूर्ण आणि सुंदर शहर – बेंगळुरू
BOI
Wednesday, November 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

विधानसौध
बेंगळुरू या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली, उद्योगांचे शहर, तलावांचे शहर, शिक्षणसंस्थांचे शहर अशा अनेक ओळखी आहेत. म्हणूनच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात माहिती घेऊ या बेंगळुरूची...
................
पर्यटकांना आकर्षित करणारे दक्षिण भारतातील बेंगळुरू हे शहर एक सुंदर शहर असून, ते सर्वच क्षेत्रांतील लोकांचे आवडते ठिकाण आहे. बंगलोर किंवा बेंगलोर या नावाने ओळखल्या जात असलेल्या या शहराचे, २०१४मध्ये बेंगळुरू असे नामकरण करण्यात आले. व्यापार, उद्योग, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, चित्रपट स्टुडिओ यासंबंधी येणारे लोक आणि पर्यटक यांची येथे सतत गर्दी असते. बेंगळुरूला उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख ठिकाण म्हणून जगाचे नकाशावर बेंगळुरूचे स्थान आहे. शैक्षणिक क्षेत्रात मेडिकल, इंजिनीअरिंग, कायदा, व्यस्थापन, सीए, सीए या क्षेत्रांत उच्च शिक्षण मिळण्याचे ते ठिकाण आहे.

बेंगळुरू

शहाजीराजांना आदिलशहाने बेंगळुरूची जहागिरी दिली होती. त्यामुळे बेंगळुरूचे महाराष्ट्राशी अतूट नाते आहे. बेंगळुरू हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हटल्यास वावगे होणार नाही. येथून चेन्नई, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी येथे सहज जाता येते.

बेंगळुरू पॅलेस

बेंगळुरूचा इतिहास :
इ. स. पू. १०००च्या आधीची लोहयुगातील दफनभूमी कोरोमंगल भागात आढळली आहे. तसेच इसवी सनापूर्वीची रोमन व ऑगस्टस सीझर यांची नाणी येथे सापडली आहेत. त्यावरून पाश्चिमात्य व्यापार-उदीमाची साक्ष मिळते. इ. स. ८६०मध्ये गंगा राजा इरेगंगा प्रथम याच्या शासनकाळात बेगुर नागेश्वर मंदिर बांधण्यात आले. राजा चोल प्रथम याच्या कारकिर्दीत १००४मध्ये चोल राजकुमार राजेंद्र चोल याने गंगा राजाला पराभूत करून या भागावर कब्जा केला. १११७मध्ये तालाकड लढाईत होयसळ राजा विष्णुवर्धनाने चोल राजांना पराभूत केले. १४व्या शतकात हा भाग विजयनगर साम्राज्यात समाविष्ट झाला. विजयनगरनंतर हा भाग आदिलशाहीत आल्यावर याची सुभेदारी शहाजीराजांकडे होती. त्यानंतर हा भाग मुघलांनी घेतला व बेंगळुरू शहर म्हैसूरच्या वाडियार राजांना विकत दिले. ब्रिटिश येईपर्यंत हे शहर त्यांच्या ताब्यात होते. असा या शहराचा थोडक्यात इतिहास आहे. विस्ताराने देणे येथे शक्य नाही.

बेंगळुरूमधील पर्यटनस्थळे :

शासकीय म्युझियम
शासकीय म्युझियम : हे भारतातील सर्वांत जुन्या संग्रहालयांपैकी एक आहे. हे आता पुरातत्त्व संग्रहालय असून आणि जुनी आभूषणे, शिल्पकला, नाणी आणि शिलालेख यांसह अनेक पुरातत्त्वीय आणि भू-गर्भीय वस्तूंचा दुर्मीळ संग्रह येथे आहे. या संग्रहालयामध्ये टिपू सुलतानाचे किल्ल्याचे मॉडेल, तंजावर शैलीतील चित्रेही आहेत. संग्रहालयात विविध जुनी वाद्ये पाहायला मिळतात. जुनी भांडी, होयसळ, चालुक्य काळातील शिल्पे, चंद्रावली येथील उत्खनात सापडलेली जुनी भांडी, कोडागू येथे सापडलेली हत्यारे येथे पाहायला मिळतात.

बेंगळुरू पॅलेसबेंगळुरू पॅलेस : शहराच्या मध्यभागी असलेला हा महाल बेंगळुरूच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सुंदर बागेच्या सान्निध्यात असलेल्या या पॅलेसची वास्तुकला ट्यूडर शैलीवर आधारित आहे. हा महाल सुमारे १५४ एकरांवर पसरलेला आहे. हा महाल इंग्लंडच्या विंडसर पॅलेससारखा दिसतो. ४५०० चौरस फूट क्षेत्रावर बांधलेला हा विशाल महाल १८७८मध्ये बांधण्यात आला. म्हैसूरच्या राजांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बेंगळुरूमध्ये वास्तव्यासाठी हा पॅलेस बांधण्यात आला. हा राजवाडा अतिशय मोहक असा आहे. यात ग्रीक डच शैलीतील, तसेच राजा रविवर्मा यांची चित्रे पाहण्यास मिळतात. वाड्यातील सुंदर नक्षी कोरलेले लाकूडकाम व फर्निचर प्रसिद्ध लॅझुरस कंपनी आणि जॉन रॉबर्टस् कंपनी यांच्याकडून मागविण्यात आले आहे.

के. व्यंकटप्पा आर्ट गॅलरी
के. व्यंकटप्पा आर्ट गॅलरी : हे स्थान कलाप्रेमींचे आकर्षण आहे. या आर्ट गॅलरीमध्ये सुमारे ६०० चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रकार के. व्यंकटप्पा यांच्या चित्रांचा संग्रह येथे मांडण्यात आला आहे. ते अवनींद्रनाथ टागोर यांचे यांचे शिष्य होते. के. के हेब्बर आणि शिल्पकार राजाराम यांच्या कलाकृतींचे संग्रहदेखील यात आहेत. कर्नाटकचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले चित्रकार के. के. हेब्बर यांनी १९९३मध्ये व्यंकटप्पा आर्ट गॅलरीला आपला संग्रह दान केला. संग्रहालयाचे नियोजन पाच मजल्यांचे होते. परंतु केवळ तीन मजले बांधले गेले आणि संपूर्ण इमारत वातानुकूलित केली गेली.

बेंगळुरू मत्स्यालय
बेंगळुरू मत्स्यालय : हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सरकारी अॅक्वेरियम म्हणूनही ओळखले जाते. कब्बन पार्क परिसरात प्रवेशद्वाराजवळच हे मत्स्यालयआहे. १९८३मध्ये याची स्थापना झाली. येथे नाना प्रकारचे शोभिवंत रंगीत मासे बघण्यास मिळतात. याची इमारत तीन मजल्यांची आणि अष्टकोनी आहे. तळमजल्यावर कार्यालय आणि प्रयोगशाळा आहे. पहिल्या मजल्यावर १४ मोठ्या टाक्या आहेत आणि दुसऱ्या मजल्यावर दोन रांगांत ६९ टाक्या आहेत. हे मत्स्याल महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी बंद असते. एरव्ही दररोज सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत्स्यालय पर्यटकांसाठी खुले असते.

नंदी मंदिर
नंदी मंदिर : विजयनगर साम्राज्यात केम्पे गौडा यांनी १५३७मध्ये विजयनगर वास्तुशास्त्रीय शैलीत हे मंदिर बांधले. त्यांनीच बेंगळुरू शहर स्थापन केले. मंदिराच्या गाभाऱ्यात भारतातील मोठ्या नंदींपैकी एक नंदी विराजमान आहे. हा नंदी एकाच दगडात कोरलेला आहे. श्री शंकराचे वाहन असलेल्या नंदीचे हे मंदिर आहे. याच्या बाजूलाच रॉक गार्डन आणि दोड्डा गणेश मंदिर आहे.

विधानसौध
विधानसौध (विधानसभा) : हे ठिकाण बेंगळुरूच्या मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे. कर्नाटकचे दिवंगत मुख्यमंत्री के. हनुमंथय्या यांना या कामाचे श्रेय दिले जाते. याचे १९५१मध्ये सुरू झालेले बांधकाम १९५४मध्ये संपले. ७०० फूट लांब व ३५० फूट रुंद अशी ही भव्य इमारत आहे. या इमारतीचे आर्किटेक्चर न्यू-द्रविडीयन शैलीवर आधारित आहे. याशिवाय, इमारतीचे काही भाग कर्नाटक सचिवालय म्हणूनदेखील कार्यरत आहेत. याची दर्शनीय बाजू आकर्षक असून, जमिनीपासून पहिल्या मजल्यापर्यंत २०४ फूट लांब अशा ४५ पायऱ्यांचे विस्तीर्ण बांधकाम केले आहे. त्यांच्या समोरच मध्यावर ४० फूट उंचीच्या १२ ग्रॅनाइट खांबांवर घुमट आहे. संध्याकाळी दिव्यांच्या उजेडात ही इमारत अधिक आकर्षक दिसते.

शासकीय म्युझियम
बेंगळुरू हे सर्व विमान, रेल्वे व रस्त्याने देशाच्या सर्व भागांशी जोडलेले आहे पावसाळा सोडून सर्व ऋतूंमध्ये येथे जाण्यास हरकत नाही. सर्व प्रकारचे भोजन मिळण्याची, तसेच राहण्याची उत्तम सोय असलेले हे ठिकाण आहे. पुढील भागात आपण बेंगळुरूमधील आणखी काही ठिकाणे व आसपासची ठिकाणे पाहू.

- माधव विद्वांस
ई-मेल :
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

बेंगळुरू पॅलेस

( बेंगळुरूचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 315 Days ago
Best
0
0

Select Language
Share Link
 
Search