Next
‘वादळी काळ’ हाताळताना....
BOI
Saturday, October 27, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


मुला-मुलींचा वयात येण्याचा काळ हा उत्साहाचा असला, तरी आई-वडील यांच्यासाठी तो वादळी काळ असतो. या काळात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक पातळींवर बरेच मोठे बदल होत असतात. मुलांना त्यामागील शास्त्रीय कारणं माहित नसतात आणि आई-वडिलांना हे बदल स्वीकारणं आणि हाताळणं अवघड होतं. त्यामुळे बऱ्याचदा दोघांच्या दृष्टीनं हा काळ संघर्षाचा आणि तणावाचा ठरतो... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मूल वयात येताना पालकांनी ही परिस्थिती कशी हाताळावी याबद्दल....
..................................
सुजय आणि त्याचे बाबा भेटायला आले होते. सुजयला बाहेर बसवून बाबा एकटेच आत आले. प्रथम त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. सुजयचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते, तर आई गृहिणी होती. सुजय नववीत शिकत होता. सुजयच्या सध्याच्या वागण्यावर चिंतीत होऊन त्याचे बाबा भेटायला आले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार तो हल्ली खूप विचित्र वागत होता. 

‘आमचा सुजय खूप हुशार आणि चांगला मुलगा आहे. वर्गात नेहमी पहिल्या पाचमध्ये असतो. शाळेतली त्याची वर्तणूकही चांगली आहे. आतापर्यंत आम्हाला शाळेतून सुजयबद्दल कधीही कोणती तक्रार आलेली नाही. त्याचा स्वभाव चेष्टेखोर, मस्तीखोर आहे, पण इतरांना त्रास होईल अशी मस्ती तो कधीच करत नाही तेवढा तो समजूतदार आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वागण्यात बदल व्हायला लागल्याचं त्याच्या आईच्या आणि माझ्या लक्षात आलं. हल्ली त्याचा बराचसा वेळ आरशासमोर जातो. सारख्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करून बघणं त्याला फारच आवडतं. त्याबाबत त्याला काही बोललं, तर लगेच चिडतो. सध्या त्याला चित्रपट पाहायला आणि हिरो-हिरोईन्सची गाणी बघायलाही फारच आवडतं. टिव्हीवर सतत गाण्यांचे चॅनल्स चालूच असतात. या सगळ्यामुळे त्याचं अभ्यासाकडेही दुर्लक्ष होतंय. परीक्षेतल्या मार्कांवरून ते आमच्या लक्षात आलं. त्याला याबाबत नीट समजावून सांगितलं, की त्याला त्याची चूक कळते आणि पुढचे काही दिवस तो नीट वागतोही, पण काही दिवसांनी पुन्हा ये रे माझ्या मागल्या होतंच. आम्ही त्याला समजावण्याचा बराच प्रयत्न केला, पण आम्हाला त्यात अपेक्षित यश आलं नाही’, हे सगळं सांगताना सुयशचे बाबा अधिक चिंतीत झाल्यासारखे वाटत होते.

ते पुढे सांगू लागले, ‘तो वयात येत असल्याने त्याच्यात हे बदल होत आहेत हे आम्हाला समजतंय, पण हे सगळं व्यक्त करण्याची ही पद्धत योग्य नाही, हे त्याच्याशी कसं बोलावं हेच आम्हांला समजत नाहीये. परवा मी सहज त्याची बॅग पाहत होतो, तर त्यात मला विचित्र माहिती असलेली दोन पुस्तकं लपवलेली सापडली. मला खरं तर खूपच राग आला होता, पण मी त्याला रागावलो नाही. त्याच्यातले हे बदल कसे हाताळावेत यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन कराल का? कारण आमच्याच नात्यातल्या एका मुलाच्या आई-वडिलांनी त्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हाताळल्यानं त्या मुलाने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. असे माझ्या मुलाच्या बाबतीत घडू नये, यासाठी मी त्याला तुमच्याकडे घेऊन आलो आहे’.

सुजयच्या बाबांचं बोलणं झाल्यावर सर्वप्रथम, त्यांनी समुपदेशनासाठी त्याला घेऊन येण्याच्या घेतलेल्या निर्णयासाठी तसंच राग येऊनही त्यांनी कोणताच चुकीचा निर्णय न घेता दाखवलेल्या संयमासाठी त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर सुजयची भेट घेऊन त्याच्याशी ओळख करून घेतली. पुढील सत्र निश्चित करून सुजयला एकटं भेटीसाठी बोलवलं. ठरल्याप्रमाणे सुजय भेटायला आला. सुरुवातीला तो थोडा घाबरत बोलत होता, पण हळूहळू ओळख व विश्वास वाढल्यावर तो मोकळेपणानं बोलायला लागला. दोन-तीन सत्रांत त्याला चांगला विश्वास वाटायला लागल्यावर पुढील काही सत्रांमध्ये त्याच्यातील झालेले बदल, त्यामागील कारणं, वयात येण्याचा अर्थ, वयात येताना होणारे शारीरिक व मानसिक बदल, वाढणारे शारीरिक आकर्षण, विचारात होत जाणारे बदल या साऱ्यांबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. त्याच्या मनात असणाऱ्या अनेक शंकांचं समाधानकारक निरसन केलं, तसंच हे बदल त्याने कसे हाताळावेत, हे योग्य पद्धतीनं न हाताळले गेल्यास कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात याबाबतही समुपदेशन केलं. या साऱ्याला सुजयने चांगला प्रतिसाद दिला. 

दरम्यानच्या काळात सुजयच्या पालकांचीही सत्रं घेऊन सुजयमधील हे बदल कसे हाताळावेत, अती बंधनांचा अतिरेक कसा व का टाळावा? त्याच्याबरोबर वागताना-बोलताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबतही त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे सुजयचं वयात येणं त्याच्या स्वत:कडून तसंच आई-वडिलांकडून अतिशय सुंदर प्रकारे हाताळलं गेलं. मुला-मुलींचा वयात येण्याचा काळ हा उत्साहाचा आणि आई-वडील यांच्यासाठी वादळी काळ असतो. या काळात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक पातळीवर बरेच मोठे बदल होत असतात. मुलांना त्यामागील शास्त्रीय कारणं माहित नसतात आणि आई-वडिलांना हे बदल स्वीकारणं आणि हाताळणं अवघड होतं. त्यामुळे बऱ्याचदा दोघांच्या दृष्टीनं हा काळ संघर्षाचा आणि तणावाचा ठरतो, पण पालक मित्रांनो मुलांमधील हे बदल हाताळताना त्यांच्यावर अनाठायी बंधनं  घातली किंवा त्यांना सतत रागावलं, मारलं, चिडलं, तर या परिस्थितीला काही प्रमाणात घातक वळण लागण्याची शक्यता वाढते. याउलट सुजयच्या बाबांप्रमाणे संयमानं, धीरानं व योग्य मार्गानं हे वय हाताळलं, तर हे 'वादळी वय' हाताळणं तुम्हांला आणि मुलांना सोपं, सुखकर जाणार नाही का?

(केसमधील नाव बदलले आहे.)

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search