Next
खजुराहो आणि धुबेला
BOI
Wednesday, March 14 | 06:45 AM
15 0 0
Share this story‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेले भारतातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे खजुराहो. धुबेला ही एक ऐतिहासिक नगरीही खजुराहोपासून जवळच आहे. ‘करू या देशाटन’च्या आजच्या भागात करू या, या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची सैर...
...............
कंदरिया महादेव मंदिरमिथुन हा शब्द उच्चारला तरी संकोच होतो. वास्तविक आकर्षण-प्रेम-वात्सल्य या तीन गोष्टी परमेश्वराने सर्वच प्राणिमात्रांना दिल्या आहेत. त्यामुळे ही सृष्टी जिवंत राहिली आहे. या गोष्टीची अत्यंत अत्यंत खुबीने खुली मांडणी करणारे खजुराहो हे जगातील एकमेव ठिकाण आहे. लैंगिक शिक्षण विद्यापीठ असेही त्याला म्हणायला हरकत नाही. 

खजुराहोचा इतिहास एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. ही चंदेल राजांची राजधानी होती. चंद्रवर्मन याने खजुराहोची स्थापना केली. ते आपल्याला चंद्रवंशीय समजत असत. इ. स. ९५० ते इ. स. १०५० या काळात या मंदिरांची उभारणी झाली. चंद्रवर्मन याने त्याच्या आईच्या इच्छेनुसार या मंदिरांची उभारणी केली. मंदिरनिर्मितीनंतर त्याने राजधानी महोबा येथे हलविली. पृथ्वीराज चौहान यांचा विश्वासू मित्र, दरबारी कवी चंदबरदाई याने त्याचे सुंदर वर्णन करून ठेवले आहे. 

कंदरिया महादेव मंदिरखजुराहो या नावाबद्दल...
अभ्यासकांच्या मते पूर्वी गावाच्या प्रवेशद्वारावर खजुराची झाडे होती. म्हणून या गावाला खर्जुवाहक किंवा खजूरवटिका असेही म्हणत. उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को या देशातील प्रवासी मुहम्मद बिन अब्दुल्ला इब्न बतूता याच्या प्रवासवर्णनात या गावाचा खजुरा असा उल्लेख करण्यात आला आहे.

राजधानी महोबा येथे हलविल्यामुळे खिलजीच्या आक्रमणातून खजुराहो बचावले; मात्र सिकंदर लोदीच्या इ. स. १४९४मधील आक्रमणात मात्र बऱ्याच मंदिरांचे नुकसान झाले. भक्ती आणि शृंगार यांचा अनोखा संगम असणारे जगाच्या पाठीवरील हे एकमेव ठिकाण आहे. भारतात मंदिरे सर्वत्र आहेत. त्यांचे वेगळेपण प्रत्येक ठिकाणी निर्मात्याने जपले आहे. प्रदेश, भाषा, राजवटी यांचा प्रभाव असल्यामुळे भारतातील लाखो मंदिरे पाहण्यासाठी कायम अलोट गर्दी होते. तसेच खजुराहो येथील मंदिरांचे आहे. मिथुनशिल्पांमुळे खजुराहो जगाच्या नकाशावर गेले. ब्रिटिश इंडियन आर्मी कॅप्टन टी. एस. बर्ट याने ही सुंदर शिल्पे १८३८मध्ये जगाच्या नजरेला आणून दिली. सध्या एकूण ८५ देवळांपैकी २२ देवळे तीन विभागांत पाहण्यासाठी शिल्लक राहिली आहेत. या मंदिरांच्या बांधकामासाठी पन्ना येथून लाल व पिवळ्या रंगाचे दगड आणण्यात आले होते.

चढ़ गयो पापी बिछुआ...मला वाटते, आचार्य रजनीशांनी ‘संभोगातून समाधीकडे’ हे आपले पुस्तक लिहिण्याआधी खजुराहोला भेट दिली असावी. खजुराहो हे अनेक चित्रपटांचे, कथांचे स्फूर्तिस्थान आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी हिने नृत्य शिकताना खजुराहो येथील नृत्यमुद्रांचा, तसेच भावमुद्रांचा अभ्यास केला होता. मधुमती सिनेमातील ‘ओ दैया रे दैया, चढ़ गयो पापी बिछुआ’ या गाण्याची कल्पना येथील एका शिल्पामुळे मिळाली, अशी माहिती गाइडने दिली. तेथे अप्सरेचे एक सुंदर शिल्प आहे. त्यात तिच्या पायावर विंचू चढताना दाखविला आहे. तिच्या ते लक्षात येताच तिने आपले वस्त्र फाडलेले दाखविले आहे. साडी फाडल्यावर दिसणाऱ्या त्या ठिकाणच्या वस्त्राच्या दशाही कलाकाराने आपल्या कलेतून साकारल्या आहेत.

खजुराहो मी १९८६ साली प्रथम पाहिले. सोबत कुटुंबीय, सासू-सासरे, मित्रमंडळीही होती. त्यामुळे तेथे जाताना दडपण होते; मात्र गाइडने माहिती द्यायला सुरुवात केली आणि वेळ व दडपण कुठे गेले ते कळलेच नाही. पश्चिम समूह, पूर्व समूह आणि दक्षिण समूह अशा तीन विभागांत खजुराहो पाहता येते.

कंदरिया महादेव मंदिरपश्चिम समूह : टी. एस. बर्ट याने खजुराहोला भेट दिल्यावर येथील मोठ्या १० मंदिरांच्या समूहाला ‘पश्चिम समूह’ असे संबोधले जाऊ लागले. या समूहात लक्ष्मी मंदिर, लक्ष्मण मंदिर, कंदरिया महादेव, सिंह मंदिर, देवी जगदंबा मंदिर, सूर्य (चित्रगुप्त) मंदिर, विश्वनाथ मंदिर, नंदी मंदिर, पार्वती मंदिर ही मंदिरे आहेत.

कंदरिया महादेव मंदिर :
चंदेल राजा विद्याधर याने महंमद गझनी याच्यावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ इ. स. १०५० मध्ये या मंदिराची निर्मिती केली. हे मंदिर ६६ फूट रुंद, १०२ फूट लांब व १०७ फूट उंच आहे. हे मंदिर चार मीटर (१३ फूट) उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेले आहे. त्यावर पुन्हा उंच पायऱ्या चढून तोरणयुक्त प्रवेशद्वारातून आत जाता येते. हे द्वार थोडेसे गुहेसारखे (हिंदीत कंदरा) दिसते. म्हणून याचे नाव ‘कंदरिया महादेव’ असे पडले आहे. चौथरा चढून गेल्यावर राजा चंद्रवर्मन एका सिंहाशी झुंज घेत असल्याचे शिल्प आहे. हे शिल्प चंदेल राजांची राजमुद्राही होती. अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराळ, गर्भागृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रत्येक विभागात सुंदर मूर्ती आहेत. काही भक्त तांत्रिक समुदायाला प्रसन्न करण्यासाठी याचा वापर करीत असत. या मंदिरात सर्वाधिक मिथुनशिल्पे आहेत. येथील एकंदर शिल्पांची संख्या ८७० आहे.

विश्वनाथ मंदिरदेवी जगदंबा मंदिर :
कंदारिया महादेव मंदिराच्या उत्तर बाजूला जगदंबा मंदिर आहे. इ. स. १००० ते १०२५च्या दरम्यान याचे बांधकाम झाले. हे प्रथम विष्णुमंदिर होते. छत्रपूरच्या राजाने इ. स. १८८०मध्ये येथे माणियागढ येथून आणलेल्या पार्वती देवीची स्थापना केली. लज्जित होऊन डोळ्यांवर हात ठेवणारी नवतरुणी, आरशात पाहणारी सुंदरी, काजळ घालणारी अप्सरा अशी नानाविध शिल्पे येथे आहेत. हे मंदिर भावपूर्ण मिथुनशिल्पे, तसेच शार्दूल चित्रणासाठी प्रसिद्ध आहे. शार्दूलचित्रण म्हणजे पुराणानुसार ज्याचे धड सिंहाचे व शिर हत्ती, पोपट किंवा वराह यांचे असते, असे शिल्प.

विश्वनाथ मंदिरसूर्य (चित्रगुप्त) मंदिर :
चित्रगुप्त मंदिर हे सूर्यदेवाला समर्पित आहे. येथे सात घोड्यांच्या रथावर आरूढ झालेली सात फूट उंचीची सूर्यप्रतिमा आहे. तसेच खुर्चीत बसून काम करणारा मूर्तिकारही येथे दाखविला आहे. दक्षिण द्वारावर विष्णुमूर्ती आहे.

विश्वनाथ मंदिर :
या मंदिराची निर्मिती इ. स. १००२-१००३च्या आसपास झाली. ८९ फूट लांब व ४५ फूट रुंद असे हे मंदिर आहे. गर्भागृहात शिवलिंगाबरोबरच नंदीवर आरूढ झालेली शिवप्रतिमाही आहे. याखेरीज पश्चिम समूहातील लक्ष्मी मंदिर, वराह मंदिर, लक्ष्मण मंदिर, सिंह मंदिर, नंदी मंदिर, पार्वती मंदिर ही मंदिरेही पाहण्यासारखी आहेत.

विश्वनाथ मंदिरदक्षिण समूह : यामध्ये एक शिवाचे (दुल्हादेव मंदिर इ. स. ११३०) आणि दुसरे चतुर्भुज मंदिर (विष्णूचे इ. स. ११००) अशा दोन मंदिरांचा समावेश आहे.

चतुर्भुज मंदिर :
हे मंदिर विमानतळ मार्गावर असून २.७ मीटर उंचीची विष्णुमूर्ती येथे आहे. काही लोक त्याला शिवमूर्तीही मानतात. शैव व वैष्णव पंथाचे एकत्रीकरण येथे असून, अर्धनारी शिवाची व उत्तरेस नरसिंह मूर्ती आहे. गंधर्व व विद्याधर यांच्याही मूर्ती इथे आहेत. या मंदिरात कोठेही मिथुनशिल्प दिसत नाही. 

दुल्हादेव मंदिर :
हे शिवमंदिर आहे. कोणे एके काळी एक लग्नाच्या वरातीत घोड्यावरून पडून नवरदेव मरण पावला. तेव्हापासून या मंदिराला दुल्हादेव मंदिर असे नाव पडले. हे मंदिर ६९ फूट लांब आणि ४० फूट रुंद आहे. चंदेल राजांच्या कारकिर्दीतील हे शेवटचे मंदिर. या मंदिरात अप्सरा, मिथुनशिल्पे आहेत.

छत्रसाल समाधीअमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ध्वनि-प्रकाश कार्यक्रम हे येथील सध्याचे आकर्षण आहे. आम्ही गेलो होतो त्या वेळी हा कार्यक्रम नव्हता. अमिताभ यांच्या खास शैलीतील खजुराहोचे वर्णन ऐकण्यासारखे आहे. नंतर जाऊन आलेल्या मित्रांचा याबद्दलचा अनुभव चांगला आहे. साधारण फेब्रुवारीमध्ये येथे खजुराहो महोत्सव साजरा केला जातो. त्यात अनेक कलाकार आपली कला सादर करतात. 

धुबेला - एक ऐतिहासिक नगरी :
बेतवा नदीच्या काठावरील धुबेला हे ठिकाण बुंदेला राजपुतांच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. राजा छत्रसाल व महाराष्ट्राचे शिवाजी महाराजांपासून अतूट नाते आहे.

मस्तानी महाल
थोरल्या बाजीरावांनी मस्तानीशी विवाह करून ते अधिक भक्कम केले. छत्रसालाच्या निधनानंतर येथे बाजीरावाने १७३७मध्ये समाधी बांधली. येथेच मस्तानीचे बालपण गेले. तिचा एक येथे महालही आहे. येथील म्युझियम अप्रतिम आहे. 

धुबेला म्युझियमअनेक शस्त्रास्त्रे, चिनीमातीची भांडी, शिल्पे या म्युझियममध्ये पाहता येतात. १९५५ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते या म्युझियमचे उद्घाटन झाले. येथे छत्रसालाच्या लाडक्या अश्वाचीही समाधी आहे. छत्रसालाच्या निधनानंतर त्यानेही आपला प्राण सोडला, असे म्हणतात. छत्रसालाची राणी कमला हिची समाधी, शीतल गढी, माहेबाद्वार (अतिशय सुंदर, देखणे प्रवेशद्वार), हृदयशहा पॅलेस, शनी मंदिर, श्रीकृष्ण प्रणामी मंदिर (मस्तानी व तिची आई प्रणामी पंथी होत्या.) ही अन्य ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. धुबेला खजुराहोपासून ७३ किलोमीटर अंतरावर आहे.

कसे जायचे?
खजुराहो हे ठिकाण मध्य प्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यात असून, छत्रपूरपासून ५० किलोमीटर अंतरावर आहे. खजुराहो हे झाशी, कानपूर, चित्रकूट, पन्ना, सतना, जबलपूर, भोपाळ या ठिकाणांहून रस्त्याने जोडलेले आहे. रेल्वेने झाशीपर्यंत येऊन तेथून येथे येता येते. पुणे-मुंबईकडून जाणे सगळ्यात सोयीचे आहे. झाशीपासून अंतर १८० किलोमीटर असून, सतनापासून ३९ किलोमीटर आहे. खजुराहो विमान व रेल्वेनेही जोडलेले असून, रेल्वे दिल्ली व वाराणसी येथून उपलब्ध आहे. राहण्यासाठी खजुराहो येथे सर्वसाधारण दर्जापासून पंचतारांकित दर्जापर्यंतच्या हॉटेल्सची सुविधा आहे. 

धुबेला म्युझियमबुंदेलखंडाची एकत्रित सहल :
झाशी हा मध्यबिंदू धरून शिवपुरी, चंदेरी, ग्वाल्हेर, भिंड, दतिया, पन्ना, कालिंजर, चित्रकूट, धुबेला, खजुराहो अशा प्रकारे बुंदेलखंडाची सहल करता येते. आपण या सर्व ठिकाणांची माहिती ‘करू या देशाटन’ या सदरातून घेतली आहे. आता पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणांबद्दल पाहू या.

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suhas shahane About 1 Days ago
Thanku for detail informetion of khajurao and dhabel.
0
0
Anand G. Mayekar About 4 Days ago
Apan dilelya vistrut mahiti baddhal Dhanyawad. Bharat Varshat ashi shilpkala Ani vastukala baryach thikani ahet. Apan tour mhatlyavar keval Pardesh tour var laksh kendrit karto. Tyalahi ek Karan ahe Ani tell mhanje tithalya vastunche jatan Ani sanvardhan. Apan ithech kami padto. Aplya asha vastu jatan Karne he pratyekane janale pahije. Sanvardhan nahi tar vidrupikaran tari talale pahije. Dhanyawad
1
0
जयश्री चारेकर About 5 Days ago
फारच सुंदर माहिती अप्रतिम!!!
1
0
Mohana Karkhanis About 5 Days ago
माहितीपुर्ण लेख आवडला
1
0
Hemant Dev About 6 Days ago
". Very very interesting knowledgeable useful historical valued information about our great Indian culture & sculptures supported by nice descriptive pics !!!" ☺👌😊👍☺👍💐💐💐
1
0
Shreyas Joshi About 6 Days ago
छान माहिती👌
1
0
Ramesh Wavikar About 6 Days ago
I am interested in reading about Deshatan
1
0
Rashmi About 6 Days ago
Fantastic
1
0
Chandrashekhar Khot About 6 Days ago
माधवजी, नेहमी प्रमाणे खुपच छान माहिती.खजूराहोची लेणी अश्लीलतेकडे वळलेली आहेत असा नेहमीच गैरसमज करून दिला जातो. पण कला म्हणून पाहिल्यावर तो गैरसमज नक्कीच दूर होतो.
1
0
Seema patwardhan About 6 Days ago
खूपच छान माहिती जाऊन आल्यासारख वाटल
1
0
Shashi Pimplaskar About 6 Days ago
Excellent historic information.
1
0
Vilas Raut About 6 Days ago
Wonderful post..👍
1
0
Vasant Parab About 6 Days ago
अप्रतिम व माहितीपूर्ण लेख. धन्यवाद
1
0
Sanjay Sawant About 6 Days ago
Khup Sunder Lekh . Paryatanasathi Aadarsh mahiti.
1
0
Madhuri Shidhayeछान माहिती About 6 Days ago
छान माहिती पूर्ण लेख
1
0
Parashuram Babar About 6 Days ago
Very good information
1
0

Select Language
Share Link