Next
‘डोकलाममधील यश खूप मोठे’
माधुरी सरवणकर
Monday, April 30 | 12:34 PM
15 0 0
Share this story

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरपुणे : ‘डोकलाममध्ये चीनला माघार घ्यायला लागणे, हे भारतासाठी मोठे यश आहे. तसेच पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे जगाला भारताची ताकद कळली,’ असे मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. 

‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीतर्फे मंथन उपक्रमांतर्गत रविवारी (२९ एप्रिल २०१८) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘शूरा मी वंदिले’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्जिकल स्ट्राइकसह अन्य अनेक महत्त्वाच्या लष्करी कारवायांमध्ये पराक्रम गाजवलेले महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी निंभोरकर यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’सह रणांगणावरच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या पत्नीचाही सत्कार या वेळी करण्यात आला.‘डोकलामचा नकाशा पाहिला, तर या भागाच्या दोन्ही बाजूंनी आपण या भागाला वेढल्याचे लक्षात येते. भारताची स्थिती आता पूर्वीसारखी नाही, हे चीनला कळले आणि त्यांना माघार घ्यावी लागली. त्यामुळेच हे भारतासाठी मोठे यश असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची मान खाली गेली आहे,’ असे मत निंभोरकर यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘पाकिस्तानविरोधातील ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या कारवाईत मीही सहभागी होतो. आम्ही सात दिवसांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ची तयारी केली होती. त्या वेळी पाकिस्तानकडून ज्या प्रकारे लष्करी कारवाया चालल्या होत्या, त्यांना चोख उत्तर देण्यासाठी काही तरी ठोस पावले उचलणे गरजेचे होते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मुळे संपूर्ण जगाला आपली ताकद समजली.’

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि ‘झी २४ तास’चे मुख्य संपादक विजय कुवळेकररणांगणावरील अनेक थरारक अनुभवही त्यांनी सांगितले. ‘रणांगणावर अनेकदा नशिबाने वाचलो. आम्हाला उणे ४४ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या भागात राहावे लागते. बऱ्याचदा अन्न व  पाणी नसते. एकवेळ उपाशी राहता येते; मात्र पाण्याशिवाय राहणे अशक्य आहे. वेळप्रसंगी आम्ही आमचे मूत्र प्राशन करून तहान भागवली आहे. अनेकदा मृत्यू जवळून पाहिला आहे. कारगिलचे युद्ध सुरू असताना माझ्या छातीला गोळी लागली. गोळीबार सुरूच होता. माझे साथीदार मला वैद्यकीय उपचारांसाठी कसे बसे एका जीपकडे घेऊन जात होते. तेवढ्यात त्या जीपवरच बॉम्ब पडला. आमच्या डोळ्यांसमोर ती जीप खाक झाली. पुढे साथीदारांनी कसेबसे मला दुसऱ्या गाडीमध्ये बसवले आणि दवाखान्यात नेले. मला जगण्याची शक्यता वाटत नव्हती. खूप रक्त वाहून गेले होते. त्या वेळी माझे लहानपण, आई-बाबा, पत्नी व लहान मुलांचे चेहरे माझ्या डोळ्यांसमोर आले. माझ्या मागे माझी पत्नी सर्वांची काळजी घेईल, याचा मला विश्वास होता; मात्र नेहमीप्रमाणे माझे नशीब चांगले होते आणि या संकटामधूनदेखील मी बाहेर आलो,’ अशा शब्दांत निंभोरकर यांनी आपले रोमांचकारी अनुभव मांडले. ३० एप्रिल रोजी आपण निवृत्त होत असून, आपल्या वाटचालीत पत्नीचा वाटा मोठा असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले.

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर‘पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला. यामुळे पाकिस्तानला चांगलाच धडा मिळाला. तसेच नुकतेच पोलिसांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. अशा प्रकारच्या सकारात्मक घडामोडींमुळे देशात शांतता टिकून राहण्यास मदत होते,’ अशी आशा हंसराज अहीर यांनी व्यक्त केली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link