Next
‘गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप
प्रेस रिलीज
Thursday, March 08, 2018 | 12:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा नुकताच समारोप करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या ‘स्वरोत्सवा’त स्वर, तालांची उधळण करण्यात आली. याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘होली कैसन कैसे खेलू’मधून गोपिकांचा प्रकट होणारा विरह... ‘चलो सखी कन्हैया संग खेले होली’ यातून कृष्णासोबत होळी खेळण्याचा झालेला आनंद... मांज खमाज रागातील ‘सावरे ऐजय्यो’च्या सादरीकरणातून पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची रंगलेली मैफल... त्यानंतर राहुल देशपांडे यांच्या मारूबिहाग रागातील विलंबित एकताल बंदिशीने ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा पहिला दिवस रंगला.

सहकारनगर येथील सातव सभागृहात झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने झाले. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी यमन रागात विलंबित बंदिश- तीनताल, द्रुत बंदिश तीनही सप्तकावर अतिशय सुरेलपणे सादर करीत स्वरानुभूती दिली. त्यांना तबल्यावर निलेश रणदिवे, तर व्हायोलिनवर सविता सुपनेकर यांनी साथसंगत केली. राहुल देशपांडे यांनी विविध आलाप आणि ताना यांचा मिलापात बहारदार गायन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या बंदीशी सादर केल्या. 'उनहीसे जाओ कहो मोरे मन की बिथा' सादर करीत सभागृह खिळवून ठेवले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, हार्मोनियमवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर अदिती कुलकर्णी आणि निमिष उत्पात यांनी साथसंगत केली.

भीमपलास रागातील विलंबित तीनताल बंदिश... कलावती रागातील रूपक तालातील बंदिशीच्या तल्लीन करणाऱ्या स्वरानुभूतीनंतर अमोल निसळ यांच्या पहाडी आवाजातील ‘बाजे रे मुरलीया बाजे’ भजनाने ‘स्वरोत्सावा’च्या दुसऱ्या दिवसाला स्वरसाज चढला. गायन मैफिलीनंतर उत्तरार्धात पंडित योगेश समसी यांच्या बहारदार एकल तबलावादातून उमटलेल्या सुरावटींच्या बरसातीने रसिक श्रोते न्हाऊन निघाले.
 
अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित गंगाधर स्वरोत्सवाचा समारोप अमोल निसळ यांच्या गायनाने आणि पंडित योगेश समसी यांच्या एकल तबलावादनाने झाला. या प्रसंगी ‘स्वरनिनाद’च्या संचालिका वृषाली निसळ, अॅना कंस्ट्रक्शनचे अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे राजेंद्र मंडलेचा, प्रीतम मंडलेचा, समीर यार्दी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांचे शिष्य युवा गायक अमोल निसळ यांनी भीमपलास रागात गुरू पंडित पिंपळखरे गुरुजींच्या ‘अब तो बडी देर भयी’, ‘बेगून काहे करत हो मात’, ‘बिरज में धूम’ या तीनताल बंदिशी, तर कलावती रागात ‘प्यारा बनरा’ व ‘बन्सी के बजाईय्या’ या रूपक ताल बंदिशी सादर केल्या. त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही भजन रचना गात अमोल निसळ यांनी भक्तीरसाची अनुभूती दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर विनय ओव्हाळ व विनय चित्राव यांनी साथसंगत केली.

उत्तरार्धात, पंडित योगेश समसी यांनी फरुखाबाद घराण्याच्या अंगाने वादन करीत आमेर हसेन खाँ साहेबांच्या तीनताल बंदिशी पेश केल्या. उस्ताद अल्लारखा खाँ साहेबांच्या तालिमींप्रमाणे विविध कायद्यांमधून ठेका धरला. त्यावेळी श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर तितकीच अनुरूप आणि उंचीची साथसंगत केली. पंडित समसी यांनी ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांना आजचे सादरीकरण समर्पित केले.

स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, यंदा हा स्वरोत्सव दोन दिवसांचा करण्यात आल्याचे ‘स्वरनिनाद’च्या वृषाली निसळ यांनी सांगितले. निवेदन मधुरा ओक-गद्रे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search