नवी दिल्ली : महिंद्रा समूहाच्या महिंद्रा पॉवरॉल या बिझनेस युनिटने दिल्लीमध्ये पहिला सीएनजी/एनजी जेनसेट दाखल करून गॅस पॉवर्ड जेनसेट श्रेणीमध्ये प्रवेश केल्याची घोषणा नुकतीच केली. कंपनीने दिल्लीसाठी ९.५ लाख रुपये आणि कर अशी किंमत असलेले सहा सिलिंडर १२५ kVA गॅस जेनसेट दाखल केले आहेत.
भारतातील हा पहिला सीपीसीबी-II (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्टेज २ एमिशन नॉर्म्स) मान्यताप्राप्त गॅस जेनसेट आहे. कंपनीच्या चाकण येथे उत्पादित करण्यात आलेल्या जेनसेटमधील शून्य प्रदूषकांमुळे कमीत कमी प्रदूषण होईल.
या निमित्ताने बोलताना ‘महिंद्रा अँड महिंद्रा’च्या सीपीओ, पॉवरॉल व स्पेअर्स बिझनेसचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘आज दाखल करण्यात आलेले जेनसेट हरित भविष्याच्या दृष्टीने ‘महिंद्रा’ जपत असलेली बांधिलकी अधोरेखित करतातच, शिवाय समाजामध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठीचे ‘महिंद्रा’चे उद्दिष्टही स्पष्ट करतात. नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून या गॅस जेनसेटना प्रचंड मागणी येणार आहे, असे मला वाटते.’
गॅस जेनसेट वापरण्यासाठी येणारा खर्च डिझेल पॉवर्ड जनरेटरच्या तुलनेत ४५ टक्के कमी असल्याने डिझेल पॉवर्ड जेनसेटच्या तुलनेत गॅस जेनसेट अतिशय फायदेशीर आहेत; तसेच, पारंपरिक जेनसेटच्या तुलनेत त्यांची आवाजाची पातळी ४ dbA कमी आहे. या जेनसेटमुळे दिल्ली, गुजरात, एनई राज्ये, महाराष्ट्र आणि सीएनजी/एनजी उपलब्ध असलेली अन्य शहरे येथील ग्राहक आकृष्ट होतील.

‘महिंद्रा पॉवरॉल’च्या मते, ग्राहकांना प्राधान्य देण्याचे तत्त्वज्ञान व ग्राहकांना जास्तीत जास्त समाधान देण्याचे उद्दिष्ट यामुळे कंपनीचे विस्तृत जाळे असून, त्यामध्ये २००हून अधिक डिलर व देशभर अंदाजे ४०० टच पॉइंट्स यांचा समावेश आहे. केंद्रीकृत कॉल सेंटर टीम २४x७ दक्ष असते आणि ग्राहकांना तातडीने मदत करण्यासाठी सज्ज असते. ग्राहकांना शक्य तितक्या लवकर सेवा देण्याच्या दृष्टीने सर्वात योग्य व साजेसा पर्याय निवडण्यासाठी तज्ज्ञांची ही टीम मदत करू शकते.
वॉटर कूल्ड टर्बोचार्जर, लो नॉइज एमिशन्स, लो एक्झॉस्ट एमिशन्स, जास्तीत जास्त इंधनक्षमता, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नियंत्रित एअर फ्युएल रेश्यो, क्लोज्ड लूप लॅम्बदा फीडबॅक सिस्टीम, वापरण्याचा सर्वात कमी खर्च ही महिंद्राच्या गॅस पॉवर्ड जेनसेट्सची खास वैशिष्ट्ये आहेत.