Next
सरस प्रदर्शनात बचत गटांची सरस कामगिरी; चार दिवसांत ३५ लाखांची उलाढाल
ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
BOI
Wednesday, August 28, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:


नवी मुंबई : ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शनातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळत असून, अवघ्या चार दिवसांत तब्बल ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली.

‘नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये भरलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील, तसेच देशभरातील विविध राज्यांमधील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर सहभागी झाले असून, एकूण १२० स्टॉल आहेत. त्यामध्ये २० स्टॉल खाद्यपदार्थांचे आहेत; तसेच दररोज सायंकाळी येथे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते. तेव्हा ३० ऑगस्टपर्यंत असणाऱ्या या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन खरेदी करावी,’ असे आवाहन आर. विमला यांनी केले. 


‘या प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील तरवळ गावच्या पंचशील स्वयंसहाय्यता समूहाने तब्बल एक लाख ४७ हजार रुपयांची विक्री केली असून, त्यांच्या काजू, कोकम, फणस गरे अशा उत्पादनांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोथळी गावातील महिलांच्या सप्तश्रृंगी स्वयंसहाय्यता समूहाच्या देशी गाईचे तूप, रोस्टेड गहू, मसाले आदी उत्पादनांची ७० हजार रुपयांची विक्री झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भाडजी येथील राणी लक्ष्मीबाई महिला स्वयंसहाय्यता गटाची राजगिरा चिक्की, खोबरा चिक्की, तीळ चिक्की यांना चांगली मागणी येत आहे. या गटाने अवघ्या चार दिवसांत ६६ हजार रुपयांची विक्री केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सरमकुंडी गावाच्या प्रगती स्वयंसहाय्यता गटाने विविध १२ प्रकारचे मसाले, कुरडई, पापड, शेवया, सांडगे, सेंद्रिय गूळ विक्रीस ठेवले असून, त्यांनी आतापर्यंत ५६ हजार रुपयांची कमाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जानवली गावातील ओम साई महिला बचत गटाने ठेवलेल्या मालवणी मसाला, मच्छी मसाला, वडे पीठ, लाल पोहे अशा अस्सल कोकणी उत्पादनांनाही चांगली मागणी येत आहे. या गटाने ६४ हजार रुपयांची विक्री केली आहे,’ असेही विमला यांनी सांगितले.


‘१५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून हजारो बचत गट मुंबईकरांना सेवा देत असून, आतापर्यंत अंदाजे आठ हजार स्वयंसहाय्यता समूहांनी भाग घेतला आहे. पहिल्या वर्षी ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झालेल्या या प्रदर्शनाने गेल्या वर्षी १२ कोटींचा टप्पा गाठला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत चार लाख स्वयंसहाय्यता गटांची स्थापना झालेली असून, त्यामाध्यमातून ४३ लाख कुटुंबांना या अभियानाशी जोडण्यात आले आहे. अभियानामार्फत जवळपास ५२० कोटी रुपयांचा समुदाय निधी, तर बँकामार्फत पाच हजार २५० कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गावपातळीवर ५० हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहेत,’ असेही विमला यांनी नमूद केले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit About 23 Days ago
Thanks for sharing .....It's a nice event at state level for rural women entrepreneurs. For mumbaikars its a treat...
0
0

Select Language
Share Link
 
Search