Next
शपथ न घालता वाजणारा ‘डीजे’
BOI
Monday, February 05, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:

गेल्या वर्षी चंदेरी पडद्यावर अवतरलेल्या दुव्वडा जगन्नाथम (डीजे) या तेलुगू चित्रपटाने त्या वेळी अंदाजे ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. निर्मितीखर्च होता ५० कोटी! आता याच ‘डीजे’च्या हिंदी आवृत्तीने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. हिंदी भाषेत आलेल्या ‘डीजे’ने आतापर्यंत १० कोटी व्ह्यूज मिळविले आहेत. या विक्रमानिमित्ताने प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटांच्या कामगिरीबद्दल, त्यांच्या अर्थकारणाबद्दल भाष्य करणारा हा विशेष लेख...
.............
साधारण बारा वर्षांपूर्वीचा काळ. पुण्यात अनेक ठिकाणी चित्रपटाची पोस्टर्स लागली होती. ‘तेलुगू समजत नाही? हरकत नाही, चित्रपट मात्र समजतो,’ अशा आशयाची वाक्ये त्या पोस्टरवर होती. ‘आर्या’ या चित्रपटाची ती पोस्टर्स होती. ‘आ अंटे अमलापुरम...’ हे प्रसिद्ध गाणे याच चित्रपटातील. त्यानंतर हा चित्रपट भरपूर चालला आणि महाराष्ट्रात त्याने बख्खळ पैसा कमावला. इतकेच नाही, तर चित्रपटाचा प्रमुख नट अल्लू अर्जुनही चांगलाच प्रस्थापित झाला. 

मार्केटिंगच्या बाबतीत नव्या कल्पना राबविण्यात तेलुगू चित्रपटांचा हात कोणीही धरू शकत नाही. वर उल्लेख केलेला प्रसंग हा त्या क्लृप्त्यांपैकीच एक. प्रत्येक कल्पना ही एक गुंतवणूक असते आणि तिचा परतावा निश्चितच मिळतो, हे या लोकांनी वारंवार सिद्ध केले आहे. हे आठवायचे कारण या आठवड्यात आलेली एक बातमी. तीसुद्धा अल्लू अर्जुनच्या संदर्भातील. 

ही बातमी होती गेल्या वर्षी चंदेरी पडद्यावर अवतरलेल्या दुव्वडा जगन्नाथम (डीजे) या चित्रपटाच्या संदर्भात. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने त्या वेळी अंदाजे ११५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. निर्मितीखर्च होता ५० कोटी! बॉक्स ऑफिसवर यश मिळविल्यामुळे चित्रपटाचे कर्ते-धर्ते साहजिकच आनंदी होते आणि आता याच ‘डीजे’च्या हिंदी आवृत्तीने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. एक विक्रम रचला आहे. हिंदी भाषेत आलेल्या ‘डीजे’ने आतापर्यंत १० कोटी व्ह्यूज मिळविले आहेत आणि अजूनही त्याचा जोर कायम आहे, असे जाणकार सांगतात. त्याचा हा वेग पाहून हा चित्रपट किमान काही विक्रम नक्कीच तोडणार, असा अंदाज आहे.

हिंदी भाषेतील प्रचंड प्रतिसादानंतर अल्लू अर्जुनने ट्विट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘या प्रेमासाठी धन्यवाद! इतर लोक आमचे डब केलेले तेलुगू चित्रपट पाहत आहेत आणि त्याचे कौतुक करत आहेत, हे जाणून आनंद झाला आहे,’ असे त्याने म्हटले आहे. 

एकीकडे बॉलिवूड म्हणजेच हिंदी (!) चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशासाठी झगडत असताना दिसणारे हे चित्र आहे. अगदी छोट्या पडद्यावर म्हणजे टीव्हीवरही त्यांना जागा मिळत नाहीये. मोठ्या पडद्यावर त्यांची जागा हॉलिवूडच्या चित्रपटांना मिळत आहे, तर टीव्हीवर हिंदी चित्रपटांना मागे ढकलून दक्षिण भारतीय डब चित्रपटांनी जागा बळकावली आहे. हिंदी चित्रपटांची प्रेक्षकसंख्या सातत्याने कमी होत असून, अन्य भाषांतील प्रेक्षकसंख्या वाढत आहे, असे उद्योगाचे आकडे सांगतात. गेल्या वर्षी केपीएमजी-फिक्की या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांत हिंदीची प्रेक्षकसंख्या ३७-३८ कोटींवर कायम राहिली आहे, तर अन्य भाषांची प्रेक्षकसंख्या १४ टक्क्यांनी वाढून १२० कोटींवर गेली आहे.

गेल्या वर्षी याच महिन्यात (फेब्रुवारी) ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ऑफ इंडिया’ने (बार्क) नवीन पद्धतीने कार्यक्रमांची लोकप्रियता मोजण्याचे निकष ठरविले. त्यानंतरच्या आठवड्यांत हिंदीतील सामान्य मनोरंजन वाहिन्यांच्या प्रेक्षक संख्येत किरकोळ वाढ झाली; मात्र हिंदी चित्रपट वाहिन्यांच्या प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अन् त्यात मोठा वाटा डब चित्रपटांचा होता. 

‘दक्षिण भारतीय डब चित्रपटांची लोकप्रियता छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वाढत आहे. बाहुबली आणि रोबोट यांसारख्या चित्रपटांनी थिएटरमध्येही यश मिळविले. तमिळ आणि तेलुगू चित्रपट जरा जास्तच यशस्वी आहेत,’ असे ‘व्हायकॉम१८’चे सीओओ राज नायक यांनी तेव्हा सांगितले होते. हिंदी चित्रपट वाहिन्यांमध्ये ‘सोनी नेटवर्क’च्या सेट मॅक्स आणि सोनी वाह या दोन वाहिन्यांनी पहिली व दुसरी जागा पटकावली आहे. त्यांच्या या यशात डब चित्रपटांचा मोठा वाटा असल्याचे त्या वाहिनीचे अधिकारी सांगतात. 

भारतीय चित्रपटांचा संदर्भ आला, की साधारणतः उल्लेख होतो हिंदी चित्रपटांचा! जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना व दुबई आणि अॅमस्टरडॅमसारख्या ठिकाणी पुरस्कारांचे सोहळे होत असताना तर हिंदी चित्रपटांचे वलय अतिशय वाढलेले असल्याचा समज होऊ शकतो. गेल्या पाच वर्षांतील हिंदी चित्रपटांचे ‘बजेट’ पाहिल्यावर पन्नास ते शंभर कोटी रुपयांचे आकडे अगदीच मामुली वाटू लागतात; पण प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांनी गेल्या काही वर्षांमध्ये मोठी भरारी घेतली असून, चित्रपट उद्योगाचे पूर्ण चित्रच पालटून टाकले आहे. खरे तर या चित्रपटांनी जी झेप घेतली आहे, त्यावरून त्यांना आता प्रादेशिक म्हणणे हाच गुन्हा आहे. अन् यात केवळ रजनीकांत, कमल हासन किंवा चिरंजीवी यांसारख्या बड्या अभिनेत्यांचे चित्रपटच आहेत असे नाही. तेलुगूतील अल्लू अर्जुन, महेशबाबू, ज्युनिअर एनटीआर, पवन कल्याण; तमिळमधील सूर्या, विक्रम, विजय, धनुष, विशाल; मल्याळममधील पृथ्वीराज, जयसूर्या, तसेच कन्नडमधील पुनीत राजकुमार, योगेश, टी. दर्शन अशा अनेक नटांनी आपली बाजारपेठ तयार केली आहे. 

चित्रपट निर्मितीत पारंपरिकरीत्या आघाडीवर असलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांनीच केवळ गल्ल्याच्या बाबतीत हिंदी चित्रपटांना मागे टाकलेले आहे असे नाही, तर काही वर्षांपासून ‘कोमा’त गेल्यासारख्या झालेल्या मराठी, बंगाली व भोजपुरी चित्रपटांनीही कात टाकली आहे. इतकेच काय, एके काळी चित्रपटांच्या जातिव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी असलेल्या हिंदी तारे-तारकांची या भाषांतील चित्रपटांत काम करण्यासाठी रीघ लागली आहे. याउलट मोहनलाल, ममुटी यांसारखे कलावंत नायक किंवा अन्य महत्त्वपूर्ण पात्र असल्याशिवाय (सजा-ए-कालापानी, कंपनी, धरतीपुत्र, डॉ. आंबेडकर) अन्य भूमिका हिंदी चित्रपटांत करत नाहीत.  

बॉलिवूडच्या तुलनेत आवाका आणि प्रेक्षकसंख्या मर्यादित असूनही, या अभिनेत्यांनी भाषिक (प्रादेशिक!) चित्रपटांत काम करण्यास होकार देण्यामागे एक कारण आहे पैसा. दाक्षिणात्य चित्रपटांचे अर्थकारण कमालीचे मोठे आहे आणि त्यात मिळणारा पैसाही मोठा आहे. बॉलिवूडमध्ये एका चित्रपटामागे फार-फार तर ५० लाख रुपये मिळत असताना दाक्षिणात्य चित्रपटांत एक कोटीपर्यंत मिळणे अवघड नाही. एखाद्या संगीतकाराला हिंदी चित्रपटांत ५० लाख रुपये मिळणे हे अजूनही अप्रूप आहे; पण इळैयाराजा आणि ए. आर. रहमान यांनी १९९१मध्येच ही रेषा ओलांडली होती. 

‘डीजे’च्या निमित्ताने या अर्थकारणाचा खणखणाट पुन्हा समोर आला आहे. कोणतीही शपथ न घालता हा ‘डीजे’ वाजतोय. त्यातून योग्य तो संदेश घेऊन प्रेक्षकांना आकर्षित करण्याची जबाबदारी आपली आहे. अन्यथा ‘प्रेक्षक येत नाहीत, बघत नाहीत,’ असे रडगाणेच गात बसणार असू, तर आपल्यासारखे करंटे कोणी नाही, असेच म्हणावे लागेल. 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search