Next
आठवणींच्या सरींनी भिजवणारा मल्हार
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Friday, March 30, 2018 | 09:28 AM
15 0 0
Share this article:

मल्हार राग मोठा विलक्षण! गायला सुरुवात केली, की सुखद सरींची बरसात सुरू! तसाच काहीसा आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी एक मल्हार दडलेला असतो. त्याची नुसती याद जागवली, तरी आठवणींच्या सरींनी तो चिंब करतो आपल्या मनाला... शरीराला... आणि मग ती धुंदी... ती तंद्री न संपू नये अशी! चंद्रशेखर टिळक यांचं ‘मल्हार मनाचा’ हे नवीन पुस्तक अशाच काही सुंदर आठवणींचे तुषार शिंपडत मनाला तजेला देणारं... त्या पुस्तकाचा हा परिचय...
..............
काही काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली, की त्यातली भाषा आणि संवाद आपल्याशी दोस्ती करून जातात. चंद्रशेखर टिळकांना ती हातोटी अवगत आहे. त्यांच्या या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एखाद-दुसरा लेख सोडला तर त्यांचं बहुतेक लेखन म्हणजे छोट्या छोट्या संवादांनी बनलेली गोष्ट आहे आणि म्हणून ते चटकन आपलंसं करतं.

‘मल्हार मनाचा’मधून त्यांनी जगलेले, अनुभवलेले ते आठवणींचे कवडसे आपल्यासमोर मांडलेत आणि तेही इतक्या हलक्याफुलक्या प्रवाही संवादांतून, की आपणही नकळत तन्मय होऊन ते क्षण समोर घडल्यागत जगतो.

छोट्या छोट्या घटना, त्यांतून उलगडणारी नवरा-बायको, मित्र-मैत्रीण, सखा-सखी, बाप-लेक अशी नाती, आपल्या नकळत आपल्याही आयुष्यात आपण जगलेले तशा प्रकारचे क्षण आपल्या डोळ्यांसमोर उभे करतात आणि आपण त्या सहजसुंदर, पण प्रत्ययकारी भाषेबद्दल मनोमन टिळकांना सलाम करतो.

ज्यांना टिळकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग अजून आला नसेल, अशा वाचकांना टिळकांचं कर्तृत्ववान, हुशार आणि त्याच वेळी तरल, भावनाप्रधान असं रूप या १२८ पानांमधून निश्चितच डोळ्यांसमोर उभं राहतं. टिळकांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे सहज डोकावून जाणारी चमकदार वाक्यं!

‘प्रेमळ स्पर्श हे पराक्रमाचे-प्रतिभेचे कारण असतात आणि परिणामही.’
‘महागाई महत्त्वाकांक्षाही लिलावात उतरवते.’
‘रसिकाला सौंदर्य असण्यात स्वारस्य असते; रंगेलाला त्याच्या उपभोगात.’
‘वस्तुस्थिती आणि सद्यस्थिती याच काय त्या सापेक्ष असतात. बाकी मनःस्थिती, परिस्थिती सगळे सापेक्ष असते.’
‘घटस्फोट नात्याला असतो, आठवणींना नाही. आणि भावबंधालाही नाही.’

या छोटेखानी लेखनातून त्यांनी उभा केलेला पुरुष आणि त्याची सर्वच नाती ही एका सुदृढ समाजासाठी निश्चितच आवश्यक आहेत, अशी भावना हे पुस्तक खाली ठेवताना मनात नक्कीच तरळून जाते. हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे!

पुस्तक : मल्हार मनाचा
लेखक : चंद्रशेखर टिळक
प्रकाशक : दिलीप महाजन/गौरी देव, मोरया प्रकाशन, डोंबिवली पूर्व - ४२१ २०३
संपर्क : ९८२०२ ९२३७६
पृष्ठे : १२८
मूल्य : १७५ ₹

(‘मल्हार मनाचा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search