Next
ठाणे खाडीच्या प्रदूषणमुक्ततेचे संकेत
मध्यंतरी दुर्मीळ झालेले श्वानसर्प, निवटे मासे आढळले
प्रशांत सिनकर
Friday, September 21, 2018 | 06:17 PM
15 0 0
Share this article:ठाणे :
गेल्या काही वर्षांत ठाणे खाडी प्रदूषणाच्या गर्तेत अडकल्याचे चित्र दिसत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे या खाडीची प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. नुकतेच या खाडीत दोन श्वानमुखी सर्प आढळले. हे निमविषारी सर्प मध्यंतरीच्या काळात या खाडीत दिसत नव्हते. काही दिवसांपूर्वीच निवटे मासेही बऱ्याच कालावधीनंतर येथे आढळले होते. खाडी प्रदूषणमुक्त होऊ लागली असल्याचेच हे संकेत आहेत. 

श्वानमुखी सर्प छोटे बेडूक, निवटे मासे, तसेच चिंबोऱ्या खातो. पर्यावरणाचा समतोल साधला गेला, की जैवविविधता आढळू लागते. खाडीकिनाऱ्यांमुळे ठाण्याच्या सौंदर्यात भर पडत आहे; मात्र हे किनारे गेल्या काही वर्षांपासून कमालीचे प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. या किनाऱ्यांवर टाकला जाणारा कचरा, तसेच उल्हासनगर, अंबरनाथ येथून येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे खाडीमधील आवश्यक जीवजंतू नष्ट होऊ लागले होते. परंतु ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे खाड्यांचे चित्र पालटू लागले आहे. 

ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घोडबंदर, रेतीबंदर आदी परिसरातील खाडी किनारे विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हे  परिसर त्यांनी अतिक्रमणमुक्त केले आहेत. येथे होणारी खारफुटी वनस्पतींची तोड आटोक्यात आणून आवश्यक त्या ठिकाणी नव्याने खारफुटी रोपांची लागवड केली आहे. खाडीकिनारी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. त्यामुळे हे किनारे स्वच्छ होऊन पाण्याची गुणवत्ताही सुधारू लागली आहे. त्यामुळेच खाडीच्या पाण्यातून काही वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले मासे, निवटे, खेकडे, सर्प पुन्हा दिसू लागले आहेत.

गेल्या महिन्यात ठाण्यातील घोडबंदर, कोपरी, विटावा, रेतीबंदर आदी ठिकाणी खाडीकिनाऱ्यांवर निवटे मासे दिसून आले होते. आता येथील कोपरीच्या खाडीवर श्वानमुखी सर्प आढळून आले आहेत. निवटे, बेडूक, लहान खेकडे, मासे आणि पाण्यातील इतर जीव खाणारे हे सर्प १७-१८ वर्षांपासून या परिसरात दिसून येत नव्हते. फक्त खाड्यांमध्येच राहणाऱ्या या सर्पांचे तोंड श्वानासारखे दिसत असल्याने त्यांना श्वनामुखी हे नाव पडले आहे. पर्यावरणप्रेमी प्रियांका शर्मा यांना कोपरी येथे या जातीचे दोन सर्प दिसले. खाडीच्या किनाऱ्यावर असलेल्या गाळात मोठ्या प्रमाणात निवटे मासे दिसून येत आहेत. त्यामुळे गाळात आणि पाण्यात राहणारे हे सर्प निवटे खाण्यासाठी येथे आले असावेत, असे वाटते. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्याचे खाडीकिनारे प्रदूषणमुक्त होऊ लागल्यामुळे हे चांगले संकेत दिसू लागले आहेत.

ठाण्यातील सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी या सापाविषयी माहिती दिली. ‘हा साप निमविषारी असून, प्रामुख्याने तो खाडीकिनारी चिखलात आढळतो. त्याचे दर्शन दुर्मीळ समजले जाते. हा साप २५ ते ३० पिल्लांना जन्म देतो. त्याची लांबी सुमारे चार-पाच मीटरपर्यंत होऊ शकते. तो करड्या रंगाचा असतो. तसेच तो निशाचर असतो. या सापाचे तोंड श्वानासारखे असल्याने त्याला श्वानमुखी साप असे म्हटले जाते. १७ ते १८ वर्षांपूर्वी हे साप या परिसरात मोठ्या प्रमाणात दिसायचे; पण त्यानंतर ते दुर्मीळ झाले होते. परंतु आता ते पुन्हा दिसू लागल्याने ठाण्याच्या खाड्या स्वच्छ होऊ लागल्या आहेत, असे वाटते. कोळी बांधव आणि या सापांचे नाते घट्ट समजले जाते,’ असे कुबल म्हणाले. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 147 Days ago
Is it beIng continuosly monitored ? Are the results published ? How long wil the tests be conducted ?
0
0

Select Language
Share Link
 
Search