Next
‘हा पुरस्कार ‘भारतरत्न’सारखा...’
BOI
Wednesday, August 30, 2017 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

पुण्यातील जागतिक कीर्तीचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना रविवारी (२७ ऑगस्ट २०१७) पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यातील जागतिक कीर्तीचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांना रविवारी (२७ ऑगस्ट) पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यातील त्रिदल आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे हे २९वे वर्ष होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. सतीश देसाई यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. या पुरस्काराच्या निमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या मानसी मगरे यांनी डॉ. के. एच. संचेती यांच्याशी साधलेला हा संवाद...
..........
डॉ. के. एच. संचेती- ‘पुण्यभूषण’ पुरस्काराबद्दलची तुमची प्रतिक्रिया...
- माझा जन्म पुण्यातला, बालपण, शाळा आणि इतर शिक्षणदेखील पुण्यातच झालं. एकंदरीतच जन्मभूमी आणि कर्मभूमी असं सगळं पुणेच असल्यामुळे माझ्या कर्तृत्वामध्ये, जडणघडणीत पुण्याचा खूप मोठा हातभार आहे. म्हणूनच इतर कोणत्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारापेक्षा या घरच्या पुरस्काराला माझ्या दृष्टीनं खास महत्त्व आहे. त्यामुळे हा पुरस्कार विशेष वाटला. आजवर ज्या २८ जणांना हा पुरस्कार दिला गेला, ती खरोखरच त्या त्या क्षेत्रातली खूप मोठी माणसं आहेत. त्यांच्या रांगेत जाऊन बसण्याचा मान मला मिळाला याचा आनंदच आहे. आतापर्यंत देश-परदेशात अनेक पुरस्कार मिळाले; पण हा पुरस्कार म्हणजे मला ‘भारतरत्न’सारखाच आहे.

- पुरस्कार प्रदान सोहळ्यात नितीन गडकरी म्हणाले, की डॉ. संचेती हे केवळ एक चांगले डॉक्टरच नव्हेत, तर एक चांगली व्यक्ती आहेत आणि डॉ. माशेलकरही म्हणाले, की संचेती म्हणजे व्यक्ती नसून एक संस्था आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
- खरं तर त्यांनी हे म्हणावं हे खूप विशेष वाटलं मला. साधारण १८-१९ वर्षांपूर्वी गडकरी यांना एक फ्रॅक्चर झालं होतं. तेव्हा राणेंनी मला त्यांच्याकडे नेलं होतं. त्यानंतर आमची एकदाही भेट नाही. असं असताना त्यांना हे आठवलं आणि त्यांनी सोहळ्यात त्याचा उल्लेख केला हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. माशेलकर म्हणाले तेही विशेष होतं. प्रत्येक जणच भरभरून बोलले, याचा आनंद आहेच. इतकंच नाही तर बापटांनीही सांगितलं, की त्यांचे वडील आमच्याकडे कामाला होते. हे सर्वांसमोर सांगण्यावरूनच त्यांचं मन किती मोठं आहे, हे समजतं.

- घरून मिळालेलं कामाचं बाळकडू, पत्नीची साथ आणि मित्रांची सोबत यामुळेच इथवर येऊ शकल्याचं तुम्ही सांगितलंत. त्याबद्दल थोडं सांगा ना...
- खरं सांगायचं तर अभ्यासात मी तसा फार विशेष नव्हतो. मला एसएससीला केवळ ४६ टक्के मार्क होते. त्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला. डॉ. विजय कर्णिक आणि डॉ. अशोक कुकडे हे मला मित्र म्हणून लाभले. ते दोघेही अगदी हुशार होते. त्यांच्याबरोबर मी अभ्यास करत असे. ते रोज तीन तास अभ्यास करत असत; पण माझ्या आईकडून मिळालेल्या ‘हार्ड वर्क’च्या बाळकडूमुळे मी सहा तास अभ्यास करायचो. त्यामुळे अभ्यासात साधारण असतानाही त्या दोघांच्या तोडीनं मी मार्क मिळवत असे. परंतु हे दोन मित्र तेव्हा माझ्यासोबत नसते, तर मी मेडिकलला प्रवेश घेऊ शकलो नसतो. आई-वडिलांच्या संस्काराबाबत बोलायचं झालं, तर माझे वडील अतिशय विनम्र होते. काम करण्यात अगदी प्रामाणिक. ही त्यांची सगळी तत्त्वं मी पाळत गेलो. आजकाल केवळ एक औपचारिकता म्हणून, एक प्रघात म्हणून आई-वडिलांच्या संस्कारांचा उल्लेख केला जातो. परंतु माझ्या बाबतीत, मी म्हणेन, की हे खरंच सत्य आहे. ही खरंच माझ्या आयुष्याची एक पुंजी आहे, ज्याच्या जिवावर मी इतकं धाडस करू शकलो आहे. याबरोबरच माझ्या पत्नीचीही मला या सगळ्यात खूप साथ लाभली आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं सांगतो. एकदा जरा पैसे हाताशी आल्यावर घर दुरुस्त करून घेऊ या असं मला वाटलं आणि तसं मी तिला बोलून दाखवलं. परंतु ती तेव्हा नाही म्हणाली. तिच्या म्हणण्यानुसार मुलांना या ‘मिडलक्लास’ वातावरणातच वाढवलं पाहिजे, जेणेकरून त्यांना या सगळ्याची जाणीव राहील, साधेपणाची सवय राहील. त्यामुळेच माझी मुलंही या सगळ्याची जाणीव ठेवून आहेत.

- तुमचं शिक्षण सुरू असतानाच तुम्ही चक्क एक हॉस्पिटल चालवायला घेतलं होतं. तो अनुभव कसा होता?
- मी ‘एमएस’ला असताना पुण्यात मोटवानी यांचं एक हॉस्पिटल होतं, जे त्यांना कोणाला तरी चालवायला द्यायचं होतं. खरं तर माझी परीक्षाही तेव्हा झाली नव्हती. असं असताना मी त्यांच्याकडे गेलो आणि मला हे हॉस्पिटल चालवायचं आहे, असं सांगितलं. हे धाडस मी करू शकलो होतो, ते केवळ माझ्या आईमुळे. तिनंच त्या वेळी ‘तू हे करू शकशील’ असं मला समजावलं होतं. त्यामुळेच मी रोज देवासमोर कृतज्ञता व्यक्त करतो. यामुळेच विनम्रता राहते.

- एक वेगळा प्रश्न. रस्त्यांवरच्या रम्बलर्समुळे (सलग असलेले छोटे स्पीडब्रेकर्स) मणक्यांना काही त्रास होऊ शकतो का? तसे काही रुग्ण तुमच्या पाहण्यात आले का?
- हो. अर्थातच. असे अनेक रुग्ण येतात. परंतु त्यांचं असलेलं दुखणं हे त्या कारणामुळे आहे, हे त्यांना माहीतच नसतं. या रम्बलर्सवरून तुम्ही सावकाश गेलात तर एक वेळ ठीक. परंतु जोरात जात असाल तर काही दिवसांत पाठीचं दुखणं मागे लागू शकतं.

- पुण्यात वाढत चाललेला दुचाकी वाहनांचा वापर यावर एक पुणेकर आणि आणि एक अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून काय सांगाल?
-
माझ्या माहितीनुसार दुचाकीचा वापर करणाऱ्या शहरांमध्ये पुणे संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सोबतच प्रचंड ट्रॅफिक. यातून मार्ग काढणं खरंच अवघड आहे. 

- कोणत्या नव्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे?
-
मी जसा नी-जॉइंट (गुडघ्याचा सांधा) तयार केला आहे, तसा आता मला हिप-जॉइंट तयार करायचा आहे. त्यावर मी सध्या काम करत आहे. तो एक मोठा प्रोजेक्ट असेल. विशेष म्हणजे हा हिप-जॉइंट भारतीय बनावटीचा असेल.

- मेडिकल टुरिझम ही संकल्पना आपल्याकडे बऱ्यापैकी रुजली आहे. संचेती हॉस्पिटलमध्येही बाहेरच्या देशांमधून यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याबद्दल काय सांगाल?
-
हो. अर्थातच ही संकल्पना आपल्याकडे आता जोर धरत आहे. जगभरात अजूनही लोकांना वैद्यकीय उपचार महाग वाटत असले, तरी इतर देशांच्या तुलनेत भारतात ते खूप स्वस्त आहेत. शिवाय आजच्या घडीला आपल्याकडील डॉक्टर्स आणि उपलब्ध वैद्यकीय तंत्रज्ञान, उपकरणं ही इंग्लंड, अमेरिकेच्याच तोडीची असल्यामुळे तिथले लोकही भारतात उपचार करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. यातूनच मेडिकल टुरिझम वाढत आहे. यामध्ये विशेषतः कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा समावेश आहे. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे १९६५ला मी प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा पुण्याहून मुंबईला उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या भरपूर होती. आज पुण्यातले रुग्ण इथेच उपचार करून घेतात. अगदी याप्रमाणेच पुढील काळात इतर देशांमध्येही हे उपलब्ध होईल आणि हा प्रकार कमी होऊ शकतो, असं माझं एक मत आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेत नेव्हिगेशन सिस्टीम उपलब्ध आहे. फ्रॅक्चर बसवण्याचे उपकरण आहे. याशिवाय शस्त्रक्रिया करताना प्रत्यक्ष स्क्रीनवर ते दिसावं अशी इमेजेन्टन्सी बॅनर सुविधा उपलब्ध आहे.

- आजच्या मुलांचा मेडिकल क्षेत्राकडे जाण्याचा कल आणि या क्षेत्रातील शिक्षणाचं वाढतं शुल्क याबाबत काय सांगाल?
-
निदान करण्याची साधनं जशी दिवसेंदिवस वाढत जात आहेत, तशी रुग्णाला तपासून त्याचं निदान करण्याची कला दिवसेंदिवस कमी होत आहे. आमच्या काळी आम्ही पेशंटला तपासूनच त्याच्या दुखण्याचं ९० टक्के निदान करत असू. आज ९९ टक्के निदान केवळ पेशंटच्या रिपोर्टवरून केलं जातं. त्यामुळे पेशंटला उपचार देण्याऐवजी एक्सरेला उपचार दिले जातात, असं वाटतं. हे चुकीचं आहे. मी हे १०० टक्के टाळतो. त्यामुळे ‘क्लिनिकल एक्झाम’ करणं आणि पेशंटवर त्याच्या व्याधीप्रमाणे उपचार करणं हा भाग राहिलेला नसून, केवळ लॅब रिपोर्टस् आणि एक्स-रे पाहून उपचार करण्याची प्रथा रूढ होत आहे. यामुळे बऱ्याचदा गरज नसतानाही शस्त्रक्रिया केल्या जातात. हे थांबलं पाहिजे. 

(डॉ. संचेती यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
N s dhaniwala About
Congratulations sir, the work done by you and the team of your institute is definitely worth praise. I fully agree with the points expressed in the last part of your interview. Greetings again for this award.
0
0

Select Language
Share Link
 
Search