Next
‘कर्मचाऱ्यांच्या अंगी चांगल्या उद्योजकाचे गुण हवेत'
प्रेस रिलीज
Tuesday, May 22, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

‘केआयएएमएस’च्या पुणे आणि हरिहर येथील विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर पदविका प्रदान समारंभात तमन्ना शर्मा या विद्यार्थिनीस विपणन या विषयात पदक प्रदान करताना अतुल किर्लोस्कर.

पुणे : ‘कर्मचाऱ्यांच्या अंगी चांगला उद्योजक बनण्याचे गुण आहेत का, आणि आपण जिथे नोकरी करणार आहोत ती आपली स्वतःचीच कंपनी आहे, या भावनेतून तो विचार करतो का, हे कंपनीसाठी फार महत्त्वाचे असते. कर्मचारी आणि कंपनी या दोहोंच्या यशासाठी ही भावना बळ देते,’ असे मत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख कार्यकारी अधिकारी जी. के. पिल्लई यांनी व्यक्त केले.

किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीजच्या (केआयएएमएस) पुणे आणि हरिहर (कर्नाटक) येथील संस्थांच्या १७७ विद्यार्थ्यांना पिल्लई आणि कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (पार्ट टाईम चेअरमन) प्रकाश आपटे यांच्या हस्ते​ ​पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आल्या. त्या वेळी पिल्लई बोलत होते. या वेळी प्रसिद्ध उद्योजक व संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर, ‘केआयएएमएस’चे उपाध्यक्ष अमरशेखर भोनागिरी, संस्थेचे पुण्यातील संचालक डॉ. आलोक जैन, हरिहर येथील संचालक डॉ. व्ही. एस. पै उपस्थित होते.

पिल्लई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश आणि नेतृत्त्वगुण या​ ​मागचे गमक उलगडले. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबी पूर्णतः आपल्या नियंत्रणात नसतात; मात्र मानवी स्नेहसंबंध टिकवणे (ह्यूमन रिलेशन्स) आपल्याच हातात असते. यशासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरते. नेतृत्त्व हे अणुऊर्जेसारखे असते. अणुऊर्जेने अनेक क्षेत्रांत चमत्कार घडवले आहेत पण तीच अणुऊर्जा नकारात्मक पद्धतीने वापरल्यास घातक ठरू शकते. नेतृत्त्वगुणांचेही तसेच आहे.’

‘डेटा अॅनालिसिस हे व्यवसाय क्षेत्राचे भविष्य असून, त्यामुळे व्यवसायवृद्धीसाठी मदतच होणार आहे. आजच्या काळातील या आव्हानांचा सामना करण्यासाठी ‘केआयएएमएस’ संस्था सक्षम आहे,’ असे अतुल किर्लोस्कर यांनी सांगितले.  

आपटे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम नेतृत्त्वाची लक्षणे सांगितली. ते म्हणाले, ‘कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या नेतृत्त्वाकडे दूरदृष्टी हवी आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता हवी. इतरांचे नेतृत्त्व करण्यापेक्षा आपल्या स्वतःचे नेतृत्त्व करणे हे खरे आव्हान असते. ज्या व्यक्तीस हे आंतरिक नेतृत्त्व साधले तो अधिक यशस्वी होतो.’

‘आपल्यातील वाईट गोष्टी समजून घेऊन त्यातून शिकणे गरजेचे आहे; तसेच आपण नेमके कोणकोणत्या बाबतीत मागे आहोत, याचा शोध घेत ज्यामध्ये आपण सक्षम आहोत, त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक चांगला संघप्रमुख एक उत्कृष्ट संघ बनवण्यासाठी स्वत:च्या नोकरीला पणाला लावतो,’ असेही आपटे यांनी सांगितले.

योगेश सुतार या वि​द्यार्थ्याने​ एकूण अभ्यासक्रमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सुवर्णपदकासह फायनान्स या विषयातही पदकाची कमाई केली. अभिषेक लाहोटी यांना रौप्यपदक प्रदान करून गौरव करण्यात आला. तमन्ना शर्मा या विद्यार्थिनीने विपणन या विषयात​​ पदक पटकावले. चिदरवार लक्ष्मी हेमंत ही विद्यार्थिनी ऑपरेशन्स मॅनेजमेंट या विषयात, तर चंद्रयी घोष ही विद्यार्थिनी मनुष्यबळ विकास या विषयात पदकाची मानकरी ठरली. तसेच निखिल दामले व विकास सेठिया यांना डिस्टिंग्विश्ड अलुम्नाय अप्रिसिएशन प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search