Next
‘महामेट्रो करणार वृक्षांचे पुनर्रोपण’
प्रेस रिलीज
Monday, December 04 | 06:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सध्या महामेट्रोतर्फे मेट्रो प्रकल्पांच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना प्रकल्पाच्या मार्गात अनेक वृक्षांचे अडथळे येत आहेत. या वृक्षांचे पुनर्रोपण ही संपूर्णत: महामेट्रोची जबाबदारी असून, या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाईल,’ अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश यांनी दिली.

‘विशेष म्हणजे जागतिक पातळीवर सर्वमान्य असलेल्या पद्धतीनुसार हे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. या पद्धतीने पुनर्रोपण केल्यास वृक्षांचा तग धरण्याचा दर हा सर्वाधिक असल्याने महामेट्रो ही पद्धत अवलंबित आहे’, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘या पद्धतीनुसार पिंपरी येथील वल्लभनगर एसटी स्टँडमागील सहयोग केंद्राच्या आवारात वरील पद्धतीने पहिल्या दहा वृक्षांचे पुनर्रोपण केले जाईल; तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका न्यावी. जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोचा फायदा होईल, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. ही मागणी लक्षात घेत महापालिकेच्या स्थायी समितीने आवश्यक डीपीआर बनविण्याची विनंती महामेट्रोकडे केली आहे,’ असे डॉ. ब्रिजेश म्हणाले.

‘मेट्रो प्रकल्पाचे काम हे सध्या भोसरी (नाशिक फाटा ते खराळवाडी) आणि सीएमई ते मेगामार्ट या दोन ठिकाणी सुरू असून तेथे आतापर्यंत चार खांब उभारण्यात आले आहे. याबरोबरच पीअर कॅपशिवाय ११ खांब उभारले गेले आहेत, तर ४८ खांबांचा पाया रचण्यात आला आहे. हॅरीस ब्रिज येथील काम ७ डिसेंबरपासून सुरू होणार असून पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३० जून २०१८पर्यंत तेथील सबस्ट्रक्चर पूर्ण होईल. याशिवाय मेट्रोसाठी आवश्यक ४१ सेगमेंटदेखील तयार असून व्हायाडक्टचा पहिला स्पॅन हा अंदाजे २६ डिसेंबरपर्यंत तयार असेल’, असेही  डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

‘मेट्रो प्रकल्पात येणा-या स्थानकांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या अंतर्गत संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले स्थानक तयार होणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचे सर्वेक्षण २८ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून स्थानकाचा जिओ टेक्निकल सर्व्हे हा देखील प्रगतीपथावर आहे. संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकाजवळ नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या मदतीने मेट्रो स्थानक हे दुस-या बाजूला वल्लभनगर बस स्थानक व आयटी इंडस्ट्री यांना जोडण्यात येणार आहे. या पुलाची लांबी ही ६५ मीटर तर रुंदी ६ मीटर इतकी असणार आहे. याचा उपयोग मेट्रो स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांबरोबरच या भागातील पादचाऱ्यांनाही होईल. याशिवाय हा पूल जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात येणार असून तो वास्तूस्थापनेचा उत्कृष्ट नमुना असेल. नवीन पूल बांधल्या नंतरच जुना पूल पाडण्यात येईल’, असे डॉ. दीक्षित यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link