Next
निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान
BOI
Saturday, June 22, 2019 | 12:53 PM
15 0 1
Share this article:नाशिक :
संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने आषाढी एकादशीसाठी त्र्यंबकेश्वरहून १८ जून रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले.

धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा 
शिवावतार तूंचि धरून, केले त्रैलोक्य पावन 

असे अभंग म्हणत, टाळ-मृदंगावर ठेका धरून निवृत्तिनाथ माऊलींचा नामघोष करून आणि भक्तिरसात तल्लीन होऊन वारकरी रवाना झाले. 
पालखी रवाना होताना तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. पावसाची चाहूल लागल्याने ब्रह्मगिरीवर ढग दिसत होते. हवेत गारवा होता. अशा वातावरणात पालखीचे प्रस्थान होत असताना त्र्यंबकनगरीने या सोहळ्याचा आनंद घेतला.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ समाधी मंदिरात सकाळी वारकरी, पालखी मानकरी, पालखीत सहभागी होणारे भाविक, तसेच समाधी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प पंडितमहाराज कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीच्या रथात श्रींच्या चांदीच्या मुखवट्यासह पादुका, प्रतिमा निवृत्ती-ज्ञानदेवांच्या जयघोषात पालखीत ठेवण्यात आल्या. या वेळी वारकऱ्यांनी अभंगाचा गजर केला. आरती होऊन पालखी काढण्यात आली. त्यानंतर कुशावर्त येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांना स्नान घालून हजारो वारकरी, टाळकरी, विणेकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, भाविकांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली. कुशावर्तावर नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी नगरपालिकेच्या वतीने पादुकांचे पूजन केले. या वेळी पालिकेचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. थोड्या वेळाने पालखीचे त्र्यंबकेश्वर मंदिराकडे प्रस्थान झाले. त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले.

तेथून पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मेन रोडतर्फे आणण्यात आली. या वेळी पालखीसमवेत पंचक्रोशीसह मराठवाडा, नगर येथील भाविक पायी निघाले. मिरवणुकीत आकर्षक सजावटीसह पालख्या दाखल झाल्या. भाविकांची, तसेच पालख्यांची वाढलेली संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने समाधी मंदिर संस्थानाकडून प्रत्येक दिंडीला क्रमांक देण्यात आले आहेत. हजारो वारकरी दिंडीत सहभागी झाले आहेत. 

पालखीच्या स्वागतासाठी त्र्यंबकवासीयांनी दारापुढे सडासंमार्जन करून श्रींना औक्षण केले. तुळशीची वृंदावने व जलकलश घेतलेल्या महिला, भगवे ध्वज, फेटे आणि उपरणी परिधान केलेले वारकरी वारीची शोभा वाढवत होते. 

तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, शिवसेना तालुकाप्रमुख संपत चव्हाण, रवी वारूगसे, नवनाथ कोठुळे, श्याम गंगापुत्र, भूषण अडसरे, नगरसेवक सागर उजे, विष्णू दोबाडे यांनी पालखीचे स्वागत केले. पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुरेश चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील विविध रस्त्यांवरून निघालेल्या पालखीला जकात नाक्यावर निरोप देण्यासाठी आणि पालख्यांतील पादुकांना स्पर्श करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

पालखीसमवेत या वेळी हरिभक्त परायण डॉ. रामकृष्णमहाराज लहवितकर, माधवदास राठीमहाराज, मुरलीधर पाटील, समाधी संस्थान अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, सचिव जिजाबाई लांडे, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, जयंतमहाराज गोसावी, पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, संजय धोडगे, योगेश गोसावी, ललिता शिंदे, पवन भुतडा आदींसह कीर्तनकार सहभागी झाले होते. दरम्यान, संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना शिवसेना तालुकाप्रमुख रावीअण्णा वारूनसे, उपतालुका प्रमुख संजय मेढे, अमोल कडलग, संपत बोडके यांनी पाणीवाटप केले, तर ज्येष्ठ नेते बाळासाहेब सावंत यांनी लाडूवाटप केले. 

‘पालखी सोहळा पर्यावरणपूरक होण्यासाठी पालखी मार्गात वृक्ष लागवडीसंदर्भात कीर्तन, प्रवचनातून जनजागृती केली जाणार आहे. यंदा प्रथमच विश्वस्त मंडळाच्या पाठपुरवठ्याने शासनाने संत निवृत्तिनाथ पालखीची दखल घेतल्याने दिंड्यांना शासकीय दरात गॅस उपलब्ध करून दिला जाणार आहे. नाशिक, नगर, सोलापूर येथील जिल्हाधिकारी पालखीच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. तसेच बंदुकधारी पोलिसांचा बंदोबस्त पालखीत असेल,’ असे संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानाचे अध्यक्ष ह. भ. प. पंडितमहाराज कोल्हे यांनी सांगितले.

‘यंदा २५ ते ३० हजार वारकरी पालखीसमवेत सहभागी झाल्याने गर्दीचा शेवटचे टोक त्र्यंबकेश्वर गावात असले, तरी त्याची सुरुवात अनेक किलोमीटर लांब अंतरावर होती. सिन्नरच्या पुढे गेल्यावर या हजारो वारकऱ्यांचे लाखांत रूपांतर होत असते. दर वर्षी उत्साहात अधिक भर पडत आहे. शासनाने फक्त हरित वारी-निर्मल वारी अशी घोषणा करण्यापेक्षा पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अध्यादेश काढून वृक्षलागवड करायला सांगितले पाहिजे. तसेच मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून द्यायला हवे,’ असेही ते म्हणाले. 

(सोबत व्हिडिओ देत आहोत.)

 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search