Next
जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑल्डस हक्स्ली, डॉ. मिलिंद जोशी
BOI
Wednesday, July 26, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

एकीकडे २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती करताना, ‘पिग्मॅलिअन’ ह्या नाटकामुळे अजरामर झालेला महान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या भविष्याचा वेध घेणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीमुळे गाजलेला ऑल्डस हक्स्ली या इंग्लिश लेखकांचा आणि अनंत काणेकर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे ‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांचा २६ जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘दिनमणी’मध्ये आज त्यांच्याबद्दल...
.......................


जॉर्ज बर्नार्ड शॉ


२६ जुलै १८५६ रोजी आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे जन्मलेला महान आयरिश नाटककार, समीक्षक आणि विचारवंत. त्याचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. पुढे तो डब्लिनहून लंडनला स्थायिक झाला. ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत बसून त्याचं वाचन आणि लेखन चाले. त्याच्या सुरुवातीच्या चारही कादंबऱ्या प्रकाशकांनी नाकारल्या होत्या. वर्तमानपत्रासाठी पाठवलेले लेखही साभार परत आले; पण त्याने लिहिणं सुरूच ठेवलं.

दरम्यान, लंडनमध्ये ‘फेबियन सोसायटी’ची स्थापना झाली होती. ‘क्रांतीपेक्षा उत्क्रांत होत जाणारा समाजवाद’ हे त्यांचं ध्येय होतं. शॉ त्यांच्या विचारांकडे ओढला गेला आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वाने त्याचा हिरीरीने प्रचार करू लागला. शॉला संगीताची आवड होती आणि त्याच्याकडे नाटकांच्या समीक्षेचं कामही आलं. तो स्वतःची नाटकंही लिहू लागला. १८९० ते १९५० अशा साठेक वर्षांत त्याने तब्बल २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती केली.
 
‘आर्म्स अँड दी मॅन’, ‘मिसेस वॉरेन्स प्रोफेशन’, ‘सेंट जोन’, ‘सीझर अँड क्लिओपात्रा’, ‘हार्टब्रेक हाउस’, ‘मेजर बार्बरा’, ‘मॅन अँड सुपरमॅन’, ‘दी डॉक्टर्स डिलेमा’, ‘अँड्रोक्लस अँड दी लायन’ अशी त्याची नाटकं गाजली.

पण त्याचं सर्वांत गाजलेलं आणि अजरामर नाटक म्हणजे ‘पिग्मॅलिअन!’ या नाटकानं इतिहास घडवला. त्या नाटकावर हॉलिवूडमध्ये ‘माय फेअर लेडी’ हा नितांतसुंदर सिनेमा बनला, ज्यात ऑड्री हेपबर्न आणि रेक्स हॅरिसन यांनी काम केलं होतं आणि त्याला आठ ऑस्कर मिळाले. (याच कथेवर आधारित ‘पुलं’नी ‘ती फुलराणी’ हे अप्रतिम नाटक लिहिलं आहे).

एक गंमतीदार किस्सा. असं म्हणतात, की इसाडोरा डंकन या सुप्रसिद्ध अमेरिकन नृत्यांगनेनं बर्नार्ड शॉच्या विद्वत्तेवर भाळून त्याला म्हटलं, ‘कल्पना कर मला तुझ्यापासून मूल झालंय, तर ते किती छान होईल, त्याला माझं सौंदर्य आणि तुझी बुद्धिमत्ता लाभेल!’ हजरजबाबी शॉ त्यावर लगेच उत्तरला, ‘ते ठीक आहे; पण समजा त्यानं तुझी बुद्धी आणि माझं रूप घेतलं तर....?’

दोन नोव्हेंबर १९५० रोजी वयाच्या ९४व्या वर्षी शॉचा मृत्यू झाला.
............................

ऑल्डस हक्स्ली
२६ जुलै १८९४ला इंग्लंडमधील सरे इथं जन्मलेला ऑल्डस कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता. त्याच्या हुशार आणि अत्यंत उपहासगर्भ लेखनातून त्याची प्रचिती येतेच.

‘क्रोम यलो’ आणि ‘अँटिक हे’ या त्याच्या पहिल्याच दोन कादंबऱ्यांनी त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. यामधून त्याने, त्या काळच्या कळप करून वावरणाऱ्या तथाकथित साहित्यिकांवर बोचरी टीका केली होती.

‘आफ्टर मेनी अ समर डाइज द स्वान’, ‘आयलेस इन गाझा’, ‘पॉइंट काउंटर पॉइंट’, ‘दी डोअर्स ऑफ परसेप्शन’, ‘दी पेरेनिअल फिलॉसॉफी’, ‘दोज बॅरेन लीव्ज’ हे त्याचं लेखन गाजलं.

...पण हक्स्ली ओळखला जातो तो त्याने ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’मधून रंगवलेल्या, पूर्णपणे विज्ञानाच्या आहारी गेलेल्या भविष्यातल्या एका विचित्र आणि भयावह जगताच्या वर्णनाविषयी. ‘सव्विसाव्या शतकातली (इ. स. २५४०) अशी दुनिया, जिथे आई आणि वडील या संज्ञाच नाहीत. माणसं संयोगातून जन्मत नाहीत, तर त्यांना प्रयोगशाळांमधून ‘क्लोनिंग’द्वारे जन्माला घातलं जातं. एकेका बीजापासून पंधरा हजार क्लोन्सची निर्मिती होते. वीस वर्षांत त्यांची पूर्ण वाढ होऊन पन्नासाव्या वर्षी त्यांना मृत्यू येतो. रासायनिक औषधं आणि ध्वनिफितींचा वापर करून त्यांचं ‘कंडिशनिंग केलं जातं. त्यांच्या मोठेपणीच्या भूमिका क्लोनिंगदरम्यान त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात. त्या दुनियेत धर्म, प्रेम, तत्त्वज्ञान या गोष्टींना थारा नाही. सगळे सगळ्यांचे आणि कुणीही कुणाशीही उथळ प्रणय करायला मोकळे. त्यातलाच, पण त्या व्यवस्थेबाहेर राहिलेला ‘जॉन द सॅव्हेज’ त्या व्यवस्थेविषयी बंड करून उठतो; पण त्याचा छळ होतो आणि शेवटी त्याला आत्महत्या करावी लागते’ अशी कथावस्तू असणारी ती अत्यंत उत्कंठापूर्ण कादंबरी चांगलीच गाजली होती आणि हक्स्लीला चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रतिक्रियांना तोंड द्यावं लागलं होतं.

२२ नोव्हेंबर १९६३ रोजी हक्स्लीचा लॉस एंजलीसमध्ये मृत्यू झाला.
...........................

डॉ. मिलिंद गोविंद जोशी
२६ जुलै १९७२ रोजी जन्मलेले प्रोफेसर मिलिंद जोशी हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सध्याचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांची ‘परिघातील विश्व, ‘आठवणीतले शिवाजी सावंत’, ‘नायजेरियात धोंडे पाटील’, ‘शिक्षणातील आनंदयात्री’, ‘हसण्यावारी’, ‘तमाच्या तळाशी’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

मिलिंद जोशी यांना ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार’, ‘अनंत काणेकर पुरस्कार’, ‘साने गुरुजी विचारसाधना पुरस्कार’, ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सह्याद्री पुरस्कार’, तसंच ‘चिं. वि. जोशी पुरस्कारा’ने गौरविण्यात आलं आहे.

ते मृत्युंजय प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणून काम पाहतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अनिल कुलकर्णी About 25 Days ago
जे बी शॉ ची माहिती अजून द्यायला पाहिजे होती त्याचे विनोद जरी फील तरी चालतील। This is my wish.pl not take otherwise thank you sir....Anil.
0
0

Select Language
Share Link
 
Search